रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ने 100 कोटी कमावत त्याच्या नावे अजून एक विक्रम केला आहे. 100 कोटी क्लबमध्ये सलग आठवा चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीचं नाव आता घेता येणार आहे. हिंदी चित्रपटामध्ये नक्की काय मसाला हवा आणि प्रेक्षकांना कशा तऱ्हेचे चित्रपट आवडतात याचं गणित रोहित शेट्टीला चांगलंच जमलं आहे. गोलमाल सिरीज, सिंघम आणि आता सिम्बा यासारखे मसालेदार चित्रपट देत रोहित शेट्टीने हा विक्रम केला आहे. करण जोहरने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टावर पोस्ट करत रोहितचं कौतुक केलं आहे. रोहितने नेहमीच अॅक्शनपॅक्ड आणि कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणले आहेत आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ‘सिम्बा’कडूनदेखील प्रेक्षकांना अशाच मनोरंजनाची पर्वणी मिळण्याची अपेक्षा होती आणि ती अपेक्षादेखील रोहितने पूर्ण केली आणि त्याला साथ मिळाली ती रणवीर सिंगची.
‘सिम्बा’ची बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ची अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड आहे. अगदी नववर्षाच्या पहिल्या दिवशीदेखील थिएटरमध्ये ‘सिम्बा’ हाऊसफुल होता. दुसऱ्या आठवड्यातदेखील ‘सिम्बा’ने आपली कमाई चालू ठेवली आहे. पूर्ण मसाला असलेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाला संपूर्ण मराठी बॅकग्राऊंड असून यामध्ये अकरा मराठी कलाकारांचंही काम आहे आणि केवळ नावापुरतं नाही तर, प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे एकावेळी अकरा मराठी कलाकार बॉलीवूडमध्ये काम करत असलेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
रणवीरची एनर्जीचा योग्यप्रकारात केला वापर
रोहित शेट्टी हा प्रेक्षकांचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. निखळ मनोरंजन करणारे रोहित शेट्टीचे चित्रपट असतात. रणवीर सिंगने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना नक्कीच आपल्या अभिनयाने आपलं करून घेतलं असलं तरीही त्याचादेखील अशा प्रकारचा हा पहिलाच चित्रपट आहे. रणवीर सिंगला एनर्जीचा खजाना म्हटलं जातं आणि त्याचा हा उत्साह, एनर्जीचा वापर योग्य प्रकारे रोहितने आपल्या चित्रपटातून करून घेतला आहे. ‘सिम्बा’ बघताना कदाचित दुसरा कोणताही अभिनेता ही भूमिका साकारू शकत नाही असंच प्रत्येक प्रेक्षकाला वाटल्याशिवाय राहात नाही.
पहिल्यांदाच करण आणि रोहित एकत्र
करण जोहरनेदेखील निर्माता म्हणून आतापर्यंत कधीही रोहित शेट्टीबरोबर काम केलं नव्हतं. ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच करण जोहरनेदेखील निर्माता म्हणून रोहित शेट्टीबरोबर काम केलं आहे. करणने प्रत्येक मुलाखतीमध्ये रोहितबद्दलचा विश्वास बोलून दाखवला होता. शिवाय रणवीर सिंगच्या अभिनयाबद्दलही करणने नेहमीच कौतुक केले आहे. नवोदित सारा अली खानदेखील पडद्यावर अजिबात नवोदित वाटली नाही. साराच्या वाट्याला जितकी भूमिका आली आहे त्यातही ती भाव खाऊन गेली आहे आणि रणवीर आणि साराच्या जोडीलाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. एकंदरीतच रोहित शेट्टीला प्रेक्षकांची नस योग्यरित्या सापडली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम