बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे त्याच्या कुटुंबावर असलेले निस्वार्थी प्रेम सर्वांनाच माहीत आहे. सलमानने अजून लग्न केलं नसलं तरी तो कुटुंबवत्सल नक्कीच आहे. त्याचं त्याचे आईवडील, भावंडे आणि भाचेमंडळीं यांच्यावर खूप प्रेम आहे. आईवडीलांच्या प्रेमापोटी तो आजही त्यांच्यासोबत एकाच घरात राहतो. एवढंच नाहीतर त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदात तो स्वतःचा आनंद मानताना दिसतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे त्याच्यावर वडीलांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. जवळजवळ गेल्या तीन आठवड्यांपासून तो त्याच्या वडिलांना भेटलेला नाही.
सलमानने निर्वाण खानसोबत शेअर केला व्हिडिओ
अर्पिता खानचा मुलगा आहिलचा चौथा वाढदिवस करण्यासाठी सलमान खान त्याच्या घरातील काही लोकांसोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर गेला होता. काही दिवसांपूर्वी या फार्म हाऊसवर सलमान खान, त्याची आई सलमा खान, बहीण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा, आणि सोहेलचा मुलगा निर्वाण खान गेले होते. मात्र त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सलमानसह या लोकांना फार्महाऊसवरच राहावं लागलं. सलमानचे वडील आणि इतर मंडळी मात्र सध्या त्याच्या मुंबईतील घरात आहेत. ज्यामुळे सलमान गेल्या तीन आठवड्यापासून त्याच्या वडिलांना भेटला नाही. सलमानला सध्याची बाहेरची भीषण परिस्थिती पाहून त्याच्या वडिलांनाची खूप आठवण येत आहे. त्याने त्याच्या इंन्स्टा अकाउंटवरून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडियोमध्ये त्याने त्याच्या पुतण्यासोबत संवाद साधला आहे. सलमानचा भाऊ सोहेल खान याचा मुलगा निर्वाण खानदेखील सध्या त्याच्यासोबत आहे. ज्यामुळे ते दोघंही आपापल्या वडिलांना खूपच मिस करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून सलमानने त्याच्या चाहत्यांना एक भावनिक संदेश देखील दिला आहे.
का एवढा घाबरला आहे सलमान खान
सलमान खानने त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे की ‘जो डर गया वो मर गया’ हा डायलॉग कितीही जबरदस्त असला तरी आताच्या परिस्थितीत त्याचा काहीच फायदा नाही. कारण कोरोना व्हायरसला न घाबरून मुळीच चालणार नाही. यासाठी “कोरोना व्हायरसला घाबरा आणि कृपा करून घरातच बसा” असं सलमानने सांगितलं आहे. “मी आणि माझा पुतण्या सध्या खूप घाबरलेले आहोत आणि आम्ही अगदी प्रामाणिकपणे आणि धैर्याने तुम्हाला हे सांगत आहोत. होय, कारण आम्ही खरंच कोरोनाला घाबरलेले आहोत. सध्या जो घाबरला तोच या परिस्थितीतून वाचू शकतो आणि इतर अनेक लोकांचेही जीव वाचवू शकतो. तेव्हा माझ्याप्रमाणे तुम्हीही घाबरून घरातच बसा यातच शहाणपण आहे.” सध्या काही लोक सरकारच्या लॉकडाऊनच्या नियमांना धाब्यावर बसवत सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामध्ये अनेकजण सलमान खानचे चाहते असू शकतात. यासाठीच सलमानने या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश दिलेला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
लॉकडाऊनच्या काळात ‘या’ बॉलीवूड कलाकारांचे टिक टॉक व्हिडिओ व्हायरल
लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये
महानायकाने केला #weareone चा संकल्प, एक लाख मजुरांना दिला मदतीचा हात