अभिनेत्री समीरा रेड्डी लग्न आणि दोन मुलांच्या जन्मानंतर बॉलीवूडपासून खूपच दूर गेली आहे. मात्र चित्रपटात काम न करताही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. कारण ती सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि स्वतःची मतं खुलेपणाने मांडते. नुकतंच तिने तिच्या अकाउंटवरून #bodypositivity बाबत मत सांगितलं आहे. आजकालच्या ग्लॅमरस दुनियेत महिलांच्या सुडौल बांधा आणि लुक्सला जास्त महत्त्व दिलं जातं. मात्र समीरा नेहमी तिचा खरा खुला नो मेकअप आणि वाढलेल्या शरीरासोबतचे फोटो शेअर करते. तिच्या मते महिलांच्या शरीरात वयाच्या आणि आयुष्याच्या अनेक टप्प्यामध्ये शारीरिक बदल होत असतात. महिलांनी हे बदल खुलेपणाने स्वीकारायला हवेत. कारण आपण जर स्वतःच्या शरीराची घृणा केली तर मनातील नकारात्मकतेचे शरीरावर आणखी वाईट परिणाम होत जातात असं तिचं म्हणणं आहे.
काय म्हणाली समीरा या पोस्टमध्ये
समीराने तिच्या अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या शरीरातील कोणत्या अवयवांचा अथवा भागामुळे तिला बॉडी शेमिंगचा त्रास झाला हे व्यक्त केलं आहे. तिच्या मते अंगावरील स्ट्रेच मार्क्स, पिंपल्स, त्वचेमधील सुरकुत्या, पोट, पातळ झालेले केस, सफेद केस हे तिच्या शरीरातील असे भाग आहेत ज्यामुळे तिला नेहमी संकोच वाटत असे. म्हणून ती सध्या तिच्या शरीरातील या भागांना स्वीकार करण्यावर काम करत आहे. तिला या गोष्टी स्वीकारण्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल. पण तिच्या मते तुमचे शरीर तुमचे ऐकत असते. जेव्हा तुम्ही सतत तुमच्या शरीराबद्दल नकारात्मक विचार करता तेव्हा ते अगणित स्वरूपात तुमच्या शरीरावर परिणाम करत राहतात. म्हणूनच बॉडी पॉझिटिव्हिटीचा सर्वात चांगला व्यायाम हाच आहे की, स्वतःच्या शरीरातील त्या अवयवांकडे लक्ष द्या. ज्यामुळे तुमच्या शरीराला सुरक्षित वाटू लागेल. यासाठी तुमच्या स्वतःवरच थोडं प्रेम करणे हे एखाद्या मंत्रापेक्षा नक्कीच कमी नाही.
समीराने खूप वर्षांपासून सहन केलं आहे बॉडी शेमिंग
समीराने पहिल्यांदाच तिचं बॉडीशेमिंगवरील मत व्यक्त केलेलं नाही. कारण पुर्वीदेखील अनेक वेळा ती यावर भरभरून बोलली आहे. ती आई झाल्यावर तिच्या शरीरात झालेल्या बदलांमुळे तिच्या मनात खूप नकारात्मकता पसरली होती. पहिल्या मुलाच्या वेळी गरोदर असताना तिला प्रेगन्सी शूट करायचं होतं पण तिचं वजन तेव्हा 105 झालेलं होतं. त्यामुळे ती बाळंतपणानंतरही इतकी तणावात होती की तिला तिच्या बाळाच्या सुखरूप प्रसूतीचा आनंदही झाला नव्हता. सगळीकडून बॉडी शेमिंग झाल्यामुळे ती नैराश्यामध्येही गेली होती. मात्र आता दोन मुलांच्या जन्मानंतर तिने स्वतःच्या शरीराला स्वीकारण्यास सुरूवात केलेली आहे. तिची ही बॉडी पॉझिटिव्हिटीवरील पोस्ट वाचून चाहते खूपच खुश झाले आहेत. एकाने तर तिला चक्क ‘तू ओल्ड नाहीच गोल्ड आहेस’ अशी कंमेट दिली आहे. समीराची ही पोस्ट पाहून पहिल्यांदाच गरोदरपण आणि शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करणाऱ्या महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘देवमाणूस’ मालिकेला येणार नवं वळण, नव्या चेहऱ्याची एंट्री
प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र
रिंकू राजगुरुच्या फिटनेसचे फोटो होतायत व्हायरल, असा झालाय बदल