हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. अशावेळी वाफाळत्या चहासोबत काहीतरी गरम आणि चटपटीत स्नॅक्स खाण्याची इच्छा होते. संध्याकाळी टी टाईम ब्रेकमध्ये बऱ्याच जणांना खुशखुशीत आणि चविष्ट समोसा खाण्याची लहर येते. कोरोनामुळे सध्या बाहेर मिळणारे विकतचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कारण हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतलेली असेलच असं सांगता येत नाही. मात्र असे चमचमीत पदार्थ स्वतःच्या हाताने घरातच बनवून खाण्यात एक वेगळा आनंद तर आहेच. पण त्यासोबतच असे घरगुती पदार्थ खाणं तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत. जर तुम्हाला संध्याकाळी समोसा खाण्याची इच्छा असेल तर जाणून घ्या समोसा करण्याची पद्धत (Recipe For Samosa In Marathi) यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत विविध प्रकारच्या समोसा रेसिपीज मराठीमध्ये (Samosa Recipe In Marathi) यासोबतच ट्राय करा चकली रेसिपी मराठी, खमंग भाजणी थालीपीठ आणि काही चमचमीत मैद्याचे पदार्थ
Patti Samosa Recipe In Marathi | पट्टी समोसा रेसिपी मराठीतून
घरी समोसा पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही पट्टी समोसा नक्कीच ट्राय करायला हवा. कारण बाजारात समोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या पट्टी विकत मिळतात. त्यामुळे आयत्यावेळी समोसे लगेच बनवू शकता.
साहित्य –
- समोसा पट्टी
- दोन उकडलेले बटाटे
- तळण्यासाठी तेल
- जीरे एक चमचा
- एक चमचा चाट मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला
- एक चिरलेला कांदा
- एक चमचा आल्याची पेस्ट
- चार हिरव्या मिरच्या
- अर्धा कप उकडलेले मटार
- मीठ चवीनुसार
कृती –
- कढईत चमचाभर तेल गरम करा
- त्यात जिरे, कांदा, आल्याची पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे परतून घ्या.
- उकडलेला बटाटा आणि मटार कुक्सरून मिक्स करा.
- बटाटा आणि मटारच्या सारणात मीठ, चाट मसाला, गरम मसाला मिसळा
- सारण कढईत टाकून सर्व साहित्य एकत्र करा आणि थंड होऊ द्या
- कढईत समोसे तळण्यासाठी तेल गरम करा
- तुमच्या सारणानुसार दहा ते बारा पट्टी काढून घ्या
- पट्टी पोळपाटावर घ्या आणि तिच्या कडांना थोडं पाणी लावा.
- सारण पट्टीत भरून त्रिकोणी आकार द्या. कडा व्यवस्थित बंद करा आणि सर्व समोसे बनवून घ्या
- गरम तेलात समोसे डीप फ्राय करा आणि सॉस अथवा चटणीसोबत गरमगरम खा.
वाचा – Misal Pav Recipe In Marathi
Matar Samosa Recipe In Marathi | मटर समोसा रेसिपी मराठीतून
संध्याकाळच्या भुकेसाठी गरम गरम मटास समोसे खूपच मस्त लागतात. मटार करंजीप्रमाणे चमचमीत समोसे तुम्ही घरी कधीही करू शकता.
साहित्य –
- एक वाटी मैदा
- चार चमचे तूप
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
- दीड वाटी उकडलेले मटार
- एक चमचा जीरे
- एक चमचा ग्रीन चिली सॉस
- एक चमचा दालचिनी पावडर
- अर्धा चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा लाल तिखट मसाला
- एक चमचा आमचूर पावडर
कृती –
- मैद्यामध्ये थोडं मीठ घाला आणि पाणी टाकून घट्ट मळून घ्या. तूप लावून पीठाचा गोळा ओल्या फडक्याखाली अर्धा तास झाकून ठेवा.
- एका कढईत तेल अथवा तूप गरम करा आणि त्यात जीरे टाका. जीरे तडतडू लागले की त्यात मटार स्मॅश करून टाका आणि सर्व मसाले, मीठ मिसळून एकत्र सारण करून ठेवा.
- पीठाचा गोळा मळून घ्या पोळी अर्धी कापून त्याला कोनाचा आकार द्या. त्यात मटारचे सारण भरा आणि कडा बंद करून समोसे बनवा
- कढईत तळण्यासाठी तेल गरम करा आणि समोसे तळून घ्या.
- पुदिना चटणी अथवा आंबटगोड खजूराच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Punjabi Samosa Recipe In Marathi | पंजाबी समोसा रेसिपी मराठी
समोसा म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पंजाबी समोसा… बाजारात पंजाबी समोसा सहज उपलब्ध होतो. पण जर तुम्हाला बाजारात मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या समोशाप्रमाणे पंजाबी समोसा घरी करायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करा.
साहित्य –
- पाव किलो मैदा
- दोन चमचे तूप
- चमचाभर ओवा
- चवीनुसार मीठ
- पाव किलो बटाटे
- अर्धी वाटी मटार
- तळण्यासाठी तेल
- चमचाभर हळद
- एक चमचा लाल तिखट
- दोन चार हिरव्या मिरच्या
- एक चमचा आल्याची पेस्ट
- एक लिंबाचा रस
- कोथिंबीर चिरलेली
- एक चमचा जीरे
- एक चमचा गरम मसाला
कृती –
- मैद्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या. तूप लावून अर्धा तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा.
- उकडलेला बटाटा आणि उकडलेला मटार स्मॅश करा.
- कढईत तूप गरम करा आणि त्यात जीरे, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट परतून घ्या
- सर्व मसाले परतून घ्या आणि त्यात बटाटा आणि मटारचे सारण टाका.
- सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र झाले की गॅस बंद करा आणि सारण थंड करा आणि वरून लिंबाचा रस मिसळा.
- पीठाचे एकसमान गोळे करा आणि पोळी लाटून घ्या
- पोळी ओव्हल शेपमध्ये लाटा आणि तिचे मध्यभागी दोन भाग करा.
- अर्धा पोळीला कोनाचा आकार द्या आणि त्यात समोसा सारण भरून कडा नीट बंद करा.
- सर्व समोसे बनवून झाले की तेल गरम करून त्यात तळून घ्या.
Chicken Samosa Recipe In Marathi | चिकन समोसा रेसिपी मराठीतून
नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना व्हेज स्नॅक्सपेक्षा नॉन व्हेज स्नॅक्स जास्त आवडतं. त्यामुळे आजकाल चिकन समोसा अथवा खीमा समोसा असे प्रकारही लोकप्रिय होताना दिसतात. तुम्ही घरी देखील करू शकता चटपटीत चिकन समोसा
साहित्य –
- एक वाटी मैदा
- एक चमचा जीरे
- एक चमचा तूप
- पाव किलो बोनलेस चिकन
- एक चिरलेला कांदा
- एक उकडलेला बटाटा
- चवीनुसार मीठ
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धणे पावडर
- एक ते दोन हिरव्या मिरच्यांची पेस्ट
- एक चमचा आल्याची पेस्ट
- एक चमचा गरम मसाला
- तळण्यासाठी तेल
कृती –
- एका कढईत तूप गरम करा आणि त्यात कांदा आलंमिरचीची पेस्ट परतून घ्या
- त्यात उकडलेला बटाट टाका.
- चिकन स्वच्छ धुवून मीठ आणि तेल टाकून शिजवून घ्या
- चिकन मिक्सरमध्ये वाटून त्याचा खीमा तयार करा
- चिकनमध्ये बटाट्याचे सारण आणि सर्व मसाले, मीठ मिसळा
- सारणामधील पाणी आटेल इतपत सर्व साहित्य गॅसवर शिजवा
- मैद्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून पीठ मळून घ्या, थोडावेळ तूप लावून ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा.
- पीठाचे गोळे करा आणि ओव्हल शेपमध्ये लाटा आणि सुरीने दोन भाग करा
- एका भागाला समोसा बनवण्यासाठी कोनाचा आकार द्या
- चिकनच्या सारणाचे समान भाग करा आणि या कोनामध्ये भरून समोसे तयार करा.
- गरम तेलात समोसे तळून घ्या.
Chinese Samosa Recipe In Marathi | चायनिज समोसा रेसिपी मराठीतून
चायनीज पदार्थ दिवसेंदिवस सर्वांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे भारतीय आणि चायनीज अशा समिश्र पदार्थांची आवड सध्या अधिक वाढताना दिसत आहे. असाच एक पदार्थ म्हणजे चायनीज समोसा
साहित्य –
- समोसा पट्टी साधारण दहा
- एक कप उकडलेल्या न्यूडल्स
- दोन वाटी चिरलेला गाजर, मटार, सिमला मिरची, कोबी
- आल्याची पेस्ट
- लसणाची पेस्ट
- एक ते दोन हिरव्या मिरचीची पेस्ट
- अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
- चवीनुसार मीठ
- एक चमचा रेड चिली सॉस
- एक चमचा ग्रीन चिली सॉस
- अर्धा चमचा काळीमिरी पावडर
कृती –
- एका कढईत तेल टाकून आलं, लसूण, मिरचीची पेस्ट परतून घ्या.
- त्यात कांद्याची पात मिसळा आणि परतून घ्या
- सर्व भाज्या गरम पॅनमध्ये चांगल्या परतून घ्या
- त्यात सर्व मसाले आणि सॉसेस टाका आणि वरून न्यूडल्स टाकून मस्त परतून घ्या.
- समोसा पट्टीला थोडं पाणी लावून त्यात सारण थंड झाल्यावर भरा आणि समोसा प्रमाणे आकार द्या.
- सर्व समोसे तयार झाले की गरम तेलात तळून घ्या.
Poha Samosa Recipe In Marathi | पोहा समोसा रेसिपी मराठीतून
पोह्यापासून बनवण्यात येणारे पोहा समोसे खूपच खुशखुशीत आणि चविष्ट लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अथवा घरी अचानक पाहुणे आले तर स्नॅक्ससाठी तुम्ही ते अगदी झटपट बनवू शकता.
साहित्य –
- एक वाटी पोहे
- समोसा पट्टी साधारण दहा
- दोन चिरलेले कांदे
- चवीनुसार मीठ
- एक चमचा चाट मसाला
- एक चमचा गरम मसाला
- एक चमचा लाल मसाला
- एक चमचा धणे
- एक चमचा जीरे
- थोडी साखर
- एक हिरवी मिरची बारीक चिरलेल्या
- कोथिंबीर
- एक चमचा आल्याची पेस्ट
कृती –
- सर्वात आधी पोहे थोडे भिजवून त्यामध्ये मीठ आणि सर्व मसाले मिक्स करा. चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची देखील मिसळा
- कढईत सर्व मिश्रण थोडं शिजवून घ्या.
- मैदा पट्टीला पाणी अथवा मैद्याची पेस्ट लावून समोसा बनवा.
- त्यात पोह्यांचे सारण भरा आणि समोशाचे तोंड बंद करा.
- गरम तेलात समोसे तळून घ्या.
Mini Samosa Recipe In Marathi | मिनी समोसा रेसिपी मराठीतून
जर तुम्हाला जास्त दिवस टिकणारे मिनी समोसे बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. कारण हे समोसे बनवून ठेवले तर आयत्यावेळी तुम्ही घाई होत नाही.
साहित्य –
- पाव किलो मैदा
- चवीनुसार मीठ
- एक चमचा लाल तिखट
- एक चमचा धणे पावडर
- एक चमचा ओव्याची पावडर
- एक चमचा गरम मसाला
- तळण्यासाठी तेल
- एक ते दोन चमचे तूप
- पाव किलो भाजलेले शेंगदाणे
- एक चमचा चाट मसाला
- एक चमचा जीरे
कृती –
- सर्वात आधी भाजून थंड झालेले शेंगदाणे वाटून घ्या.
- एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जीरे आणि ओवा परतून घ्या
- शेंगदाण्याच्या मिश्रणात मीठ, गरम मसाला, धणे पावडर, लाल तिखट, चाट मसाला टाका आणि जीरे, ओवा टाकून थोडं परतून घ्या.
- मैद्यामध्ये मीठ आणि तूप टाकून पीठ मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा.
- पीठाचे गोळे करा आणि छोट्या आकाराच्या पोळ्या लाटा.
- पोळी दोन भागात कापून घ्या, त्यात सारण भरून छोटे समोसे बनवा
- गरम तेलात तळून घ्या हे समोसे आठ दिवस नक्कीच फ्रेश राहतात.
Kobi Samosa Recipe In Marathi | कोबी समोसा रेसिपी मराठीतून
कोबीची भाजी काही लोकांना खायला आवडत नाही. मात्र अशा लोकांसाठी जर तुम्ही कोबीचे समोसे बनवले तर ते चटपटीतही लागतात आणि त्यामुळे न आवडणारी कोबीची भाजी खाल्ली जाते.
साहित्य –
- समोसा पट्टी साधारण दहा
- एक वाटी बारीक चिरलेला कोबी
- चवीनुसार मीठ
- दोन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- लसणाची पेस्ट
- तेल तळण्यासाठी
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- फोडणीसाठी हिंग, जीरे, मोहरी आणि कडिपत्ता
कृती –
- कढईत थोडं तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य टाका.
- मोहरी तडतडू लागल्यावर लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून परतून घ्या.
- हळद आणि मीठ टाका आणि चिरलेला कोबी टाकून भाजी वाफेवर शिजवा
- शिजलेली भाजी मैद्याच्या पट्टीत भरून तिला समोसा आकार द्या.
- सर्व समोसे बनवा आणि गरम तेलात तळून घ्या.
Samosa Chaat Recipe In Marathi | समोसा चाट रेसिपी मराठीतून
चाटचे विविध प्रकार संध्याकाळी प्रत्येकाला भुरळ घालत असतात. मात्र आजकाल कोरोनामुळे चाटच्या गाडीवर उघड्यावर खाणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. यासाठी घरीच बनवा समोसा चाट
साहित्य –
- वर दिलेली कृती वापरून केलेले पंजाबी समोसा अथवा मिनी समोसा
- चिरलेला कांदा
- चिरलेला टोमॅटो
- हिरवी चटणी
- खजूराची आंबट गोड चटणी
- दही
- शेव
- चाट मसाला
- डाळिंबाचे दाणे
- सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार घ्या.
कृती –
- प्लेटमध्ये समोसा कुस्करून त्याचे तुकडे पसरवा
- त्यावर कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, दही, आंबट चटणी टाका.
- वरून थोडा कांदा, शेव, डाळिंबाचे दाणे, चाट मसालाने सजवा.
Chocolate Samosa Recipe In Marathi | चॉकलेट समोसा रेसिपी मराठीतून
लहान मुलांना चॉकलेट खूप आवडते. त्यामुळे मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा मेन्यू ठरवताना चॉकलेट समोसा हा पर्याय नक्कीच उत्तम ठरू शकतो.
साहित्य –
- पाव किलो मैदा
- एक चमचा वेलची पावडर
- पाव किलो चॉकलेट बार
- एक वाटी रोस्ट केलेले बदाम
- एक वाटी रोस्ट केलेले काजू
- थोडे रोस्ट केलेले पिस्ता
- तळण्यासाठी तेल
- चवीनुसार मीठ
कृती –
- मैद्यात थोडं मीठ आणि वेलची पावडर टाकून पीठ मळून घ्या आणि ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा
- अर्ध्या तासाने पीठाचे समान गोळे करा
- चॉकलेट बार डबल बॉयलरमध्ये वितळवा आणि त्यात सर्व रोस्ट केलेले ड्रायफ्रूट मिसळा.
- मैद्याचे गोळे लाटून त्याचे दोन भाग करा आणि त्यातील एका भागाला कोनाचा आकार देवून त्यात घट्ट झालेले चॉकलेटचे स्टफिंग भरून समोसे बनवा.
- समोसे मस्त गरम तेलात तळून घ्या आणि ड्रायफ्रूट लावून सजवा.
Aloo Samosa Recipe In Marathi | आलू समोसा रेसिपी मराठीतून
बटाटा हा समोसे बनवताना लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्हालाही बटाट्याचे पदार्थ आवडत असतील बनवा हे खास आलू समोसे
साहित्य –
- एक वाटी मैदा
- एक चमचा तूप
- चवीनुसार मीठ
- पाव किलो उकडलेले बटाटे
- अर्धी वाटी उकडलेले मटार
- एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- एक चमचा आल्याची पेस्ट
- एक चमचा धणे पावडर
- एक चमचा जीरे पावडर
- एक चमचा गरम मसाला
- एक चमचा आमचूर पावडर
- तळण्यासाठी तेल
कृती –
- मैद्यात मीठ आणि तूप टाकून पीठ मळून अर्धा तास झाकून ठेवा.
- बटाटे आणि मटार स्मॅश करून घ्या
- कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, आल्याची पेस्ट आणि सर्व मसाले परतून घ्या.
- फोडणीत बटाटा आणि मटारचे मिश्रण टाका आणि परतून घ्या.
- मैद्याचे गोळे करून पोळी लाटा, एका पोळीचे दोन भाग करा आणि त्याला कोनाचा आकार द्या.
- थंड झालेले बटाट्याचे सारण कोनात भरून समोसे बनवा आणि गरम तेलात तळून घ्या.
Samosa Chutney Recipe In Marathi | समोसा चटणी रेसिपी मराठी
समोसा सर्व्ह करताना हिरवी चटणी आणि लाल चटणी असे चटणीचे दोन प्रकार दिले जातात. यासाठीच घरीच बनवा समोसा चटणीचे हे दोन्ही प्रकार
हिरवी चटणी –
हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत लाल रंगाची आंबट गोड चटणी मिक्स करून समोसा सर्व्ह केला जातो.
साहित्य –
- एक वाटी कोथिंबीर
- अर्धी वाटी पुदिना
- तीन लसणाच्या पाकळ्या
- एक आल्याचा तुकडा
- तीन ते चार हिरव्या मिरच्या
- पाव चमचा धणे पावडर
- पाव चमचा जीरे पावडर
- पाव चमचा चाट मसाला
- थोडी साखर
- एक चमचा लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
कृती –
सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी मिसळा. चटणी वाटल्यावर त्यात मीठ आणि लिंबाचा रस टाका.
आंबट गोड चवीची लाल चटणी
समोसा खाताना हिरव्या चटणीसोबत आंबट गोड चटणी असेल तर त्याची चव आणखी छान लागते.
साहित्य –
- पाव वाटी चिंच
- गरजेनुसार साखर
- चवीनुसार मीठ
- एक चमचा लाल तिखट
- हळद पाव चमचा
- दोन चमचे कॉर्नफ्लोअर
कृती –
- कढईत तिप्पट पाणी आणि साखर विरघळवून पाक तयार करा.
- त्यात पाण्यात भिजवून स्मॅश केलेली चिंच टाका.
- मोठ्या आंचेवर पाणी आटेपर्यंत मिश्रण आटवून घ्या
- मिश्रणात मीठ, लाल तिखट, हळद टाकून शिजवा
- कॉर्नफ्लोअर पाण्यात भिजवून मिश्रणात टाका.
- वीस ते तीस मिनीटे शिजून चटणी घट्ट झाली की गॅस बंद करा.
आम्ही शेअर केलेले हे समोसा रेसिपी इन मराठी (Samosa Recipe In Marathi) चे वेगवेगळे खुशखुशीत प्रकार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. यासोबतच आमच्या इतर रेसिपीज नक्की ट्राय करा.