अनेकदा स्वप्न ही असबद्ध असतात. काहीही विचार केला नसताना देखील आपल्याला काही गोष्टी अचानक स्वप्नात येतात. एखादे स्वप्न पाहिल्यानंतर ओठांवर नाजूक हसू येते. तर काही स्वप्न पाहिल्यानंतर दरदरुन घाम सुटतो. स्वप्न ही जाणीवेच्या पलिकडील कल्पना आहे. आपण दिवसभरात जे विचार करतो. त्याच्याच संबंध स्वप्नाशी असतो असे विज्ञान सांगते. पण यापलीकडे जाऊन काही स्वप्न हे आपल्याला आयुष्यातील काही महत्वाचे संकेत देत असतात. कधी तरी आपल्या स्वप्नात काही अशी माणसे येतात त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. माणसांच्या गोष्टी आपण समजू शकतो. पण असे काही प्राणी देखील आपल्या स्वप्नात दिसतात की त्याचा नेमका अर्थ काय ते आपल्याला कळत नाही. आता सापच बघा ना! सापाला न घाबरणारी व्यक्ती विरळच असेल. स्वप्नात साप दिसला तर एखाद्याची बोबडी वळणार नाही असे मुळीच होणार नाही. तुम्हालाही स्वप्नात साप दिसला असेल तर त्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊया.
भगवान शंकराच्या जवळ
आता जर तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर त्यांनी गळ्यात परिधान केलेला नाग तुम्हाला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे हा सरपटणारा प्राणी या देवाच्या अत्यंत जवळ आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी सापांची पूजा देखील केली जाते. नागपंचमी हा सण आपण खास साजरा करतो. त्यावेळीही नागाची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते. सापाला ऐकू येते का? साप दूध पितो का?, खरंच सापावर नागमणी असतो का? असे अनेक वादातित प्रश्न आहेत. पण स्वप्नात साप येण्यामागे नेमके कारण कोणते ? त्यामागील संकेत काय ते देखील जाणून घ्यायला हवेत.
स्वप्नात साप दिसला म्हणजे
आपल्या शास्त्रामध्ये विभिन्नता आढळते. यामध्ये अनेक तर्क-वितर्क देखील आहेत. पण सर्वसाधारणपणे साप दिसला की, खालील काही गोष्टी संकेत देत असतात असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया या गोष्टी
- समुद्रशास्त्रानुसार स्वप्नात साप दिसणे हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. तुम्हाला आलेली एखादी समस्या, तुमच्या आर्थिक अडचणी या आता सुटणार आहेत. असा याचा अर्थ असतो. इतकेच नाही तर तुम्हाला अनेक लाभ मिळण्यासही त्यामुळे मदत मिळते. तुमच्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण असे असले तरी तुम्ही या सगळया गोष्टीला हुरळून जाता कामा नये.
- स्वप्नात साप तुमचा पाठलाग करत असेल आणि तुम्ही घाबरला असाल तर हे असे दिसणे अशुभ आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला साप चावला तर तुम्हाला काहीतरी आजारपण येणार असल्याचे हे संकेत असतात.
- स्वप्नात मेलेला साप दिसणे देखील शुभ मानले जाते. कारण याचा अर्थ तुमच्या पत्रिकेत असलेला राहूदोष हा निघून गेलेला आहे.
- साप आणि मुंगूस यांची जंगी लढाई तुम्हाला स्वप्नात दिसली तर अशी लढाई देखील अशुभ मानली जाते. तुम्हाला काही कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता यामध्ये असते.
- नागिणीची जोडी दिसणे अशुभ मानले जाते. कारण याचा अर्थ तुमच्या पूर्वजांची तुम्ही अवहेलना केली आहे आणि त्यांचा योग्य पद्धतीने मान राखायला हवा.
आता तुम्हाला स्वप्नात साप दिसला की घाबरुन जाऊ नका. तर वरील गोष्टी लक्षात ठेवा.