स्मिता पाटील…आजही जिच्या अभिनयाची भुरळ अनेकांच्या मनावर आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ‘प्रतिभावंत अभिनेत्री’ म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख अगदी लहान वयातच निर्माण केली. मात्र जीवनपटातून अचानक झालेली त्यांची ‘एक्झीट’ अनेकांच्या काळजाला घर करुन गेली. प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजविणा-या स्वर्गीय अभिनेत्री स्मिता पाटील यांची यंदा 32 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2018’ जाहीर झालाय. हा पुरस्कार यंदा स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तर ‘स्मिता पाटील पाटील कौतुक पुरस्कार 2018’ अभिनेती मुक्ता बर्वेला जाहीर झालाय.
दीनानाथ नाट्यगृहात होणार पुरस्कार सोहळा
स्वर्गीय स्मिता पाटील पुरस्कार सोहळा दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.जैत रे जैत चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, निर्माती उषा मंगेशकर, संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर, अभिनेते मोहन आगाशे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर स्वर्गीय स्मिता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘अस्मिता’ हा खास कार्यक्रम देखील केला जाणार आहे. स्मिता पाटील स्मृती पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष आहे.
पहिल्या पुरस्काराची मानकरी रेखा आणि अमृता
‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2017’ अर्थात पहिला पुरस्कार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांना प्रदान करण्यात आला होता. तर ‘स्मिता पाटील पाटील कौतुक पुरस्कार 2017’ ची मानकरी मराठी अभिनेत्री अमृता सुभाष ठरली होती.
मुक्तावर कौतुकाचा वर्षाव
यंदा हा पुरस्कार मुक्ताला जाहीर झाला असल्याने तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुक्ताचा नुकताच ‘मुंबई-पुणे-मुंबई-3’ प्रदर्शित झालाय. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच मुक्ताला या पुरस्काराने आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम