मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांच्या खांद्याला खांदा लावून थिएटरमध्ये चालतात. अनेक दर्जेदार अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होत आहे. लॉकडाऊननंतर एका मागून एक नवे मराठी चित्रपट आलेले आहेत. आता एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे ‘धर्मवीर’. या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली असेल पण साऊथमध्येही त्याचे चाहते होतील असे काहीसे घडले आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी देखील या चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यानंतर तेही थक्क झाले आहेत. एका मोठ्या दिग्दर्शकाकडून दाद मिळाल्यामुळे धर्मवीरच्या टीमलाही आनंद झाला आहे.
धर्मवीरच्या टीमला मिळाली पोचपावती
धर्मवीर मु. पो. ठाणे या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांची हैदराबाद येथे एस. एस. राजमौली सोबत भेट झाली. यावेळी त्यांनी या चित्रपटाचा टिझर राजामौली यांना दाखवला. चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून ते ही थक्क झाले. त्यांना ट्रेलर आवडला. यातच सारे काही आले. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करुन दाखवल्या आहेत. ते म्हणाले की, “राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यांनी आमच्याशी अतिशय सहृदयतेने संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली.”
चित्रपटाची उत्सुकता
ज्या दिवसापासून आनंद दिघे यांच्यावर चित्रपट येणार हे त्यांच्या चाहत्यांना कळाले. त्या दिवसापासून याची उत्सुकता चांगली वाढली होती. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारेल असे झाले होते? ज्यावेळी प्रसाद ओकला या भूमिकेत पाहिले त्यावेळी अनेकांना सुखद धक्का बसला. अभिनेता म्हणून एखाद्या अशा व्यक्तीची भूमिका साकारणे जे कोणाच्या गळ्याचे ताईत असेल तर त्यावेळी अभिनेत्याची जबाबदारी वाढते. ही भूमिका प्रसादने खूपच उत्तमरित्या साकारली अशावी असा अंदाज चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की येईल.
13 मे ला होणार प्रदर्शित
चित्रपटाने इतका बझ केला आहे की, आता हा चित्रपट कधी रिलीज होईल याची प्रतिक्षा अनेक जण पाहत आहेत. हा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता ताणली आहे.
तुम्ही धर्मवीरचा ट्रेलर पाहिला का? तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा