अभिनेत्री ‘सुकन्या कुलकर्णी मोने’ म्हणजे जणू सळकळता उत्साहच. आभाळामायामध्ये साकारलेली तिची जिगरबाज ‘सुधा जोशी’ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सुकन्या ताईने नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमधील भूमिकांमधून नेहमीच तिचं वेगळेपण जपलं आहे. सुकन्या मोने एक ‘हरहुन्नरी व्यक्तिमत्व’ आहे त्यामुळे ती तिच्या जीवनात सतत नवनवीन प्रयोग करत असते. आता तिचं नृत्यकलेवरील प्रेम जगासमोर आलं आहे. सुकन्या ताईने तिचं ‘अरंगेत्रम’ सादरीकरण पूर्ण केलं आहे. कोणत्याही भरतनाट्याम नर्तिकेसाठी अरंगेत्रम पूर्ण होणं हे एक स्वप्नं असतं. त्यानंतर भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण होत असतं. आता २८ वर्षानंतर सुकन्या मोनेने तिचं हे शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनेत्री ‘ऊर्मिला कोठारे’ने तिच्या इन्स्टावरुन सुकन्या मोने आणि लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर यांच्यासह एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्येे सुकन्या मोने भरतनाट्यम वेशभूषेत दिसत आहेत. ऊर्मिलाने या पोस्टमध्ये सुकन्या ताईला तिच्या अरंगेत्रम सादरीकरणासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
‘अरंगेत्रम’ सादरीकरण शिष्यासाठी एक अभिमानास्पद क्षण
शास्त्रीय नृत्य शिकताना शिष्याला ‘त्या’ नृत्यशैलीमध्ये जवळजवळ सात वर्ष गुरुंच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घ्यावं लागतं. नृत्यकलेत पारंगत झाल्यावर आपले गुरु आणि इतर सर्वांसमोर आपल्या कलेचं सादरीकरण करणं याला ‘अरंगेत्रम’ असं म्हणतात.अरंगेत्रम सादरीकरण हा नृत्यांगणा आणि तिच्या गुरुसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. या सादरीकरणानंतरच गुरु प्रसन्न होऊन शिष्याला एकल नृत्याच्या परफॉर्मन्ससाठी परवानगी देतात.
सुकन्या ताईच्या ‘जिद्द आणि चिकाटी’ला सलाम
सुकन्या ताईने जवळजवळ अठ्ठावीस वर्षांच्या भल्यामोठ्या ब्रेकनंतर तिचं अरंगेत्रम सादरीकरण पूर्ण केलं आहे. अठ्ठावीस वर्षापूर्वी सुकन्या ताईला तिच्या अरंगेत्रम परफॉर्मन्स आधी अपघात झाला होता. ज्यामुळे त्यानंतर ती पुन्हा नृत्य करू शकली नाही. पण आता तिने खूप मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा तिच्या नृत्यसाधनेला सुरुवात केली आहे. अरंगेत्रमच्या सादरीकरणात ती अगदी सराईतपणे नृत्य करत होती. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा नृत्य करणं हे केवळ अशक्य असू शकतं. पण सुकन्या मोनेनं अशक्य ते शक्य करुन दाखवलं आहे. सुकन्या ताईच्या नृत्यप्रेमाला आणि प्रचंड इच्छाशक्तीला खरोखरच सलाम. आता लवकरच सुकन्या मोनेच्या चाहत्यांना तिचा एक सर्वोत्तम नृत्याविष्कार पाहायला मिळेल यात शंका नाही.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम