कॅन्सरचे नाव ऐकले की आपल्या पोटात गोळा येतो. कारण हा असा प्राणघातक आजार आहे, जो कोणत्याही स्त्री-पुरुषाला होऊ शकतो. महिलांना होणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनाचा कर्करोग, ओव्हरीज आणि गर्भाशयाचा कर्करोग याविषयी बऱ्याच जणांना माहिती आहे. पण याशिवाय महिलांना व्हल्व्हर कॅन्सरचाही त्रास होऊ शकतो. व्हल्व्हर कर्करोग हा दुर्मिळ कर्करोगांपैकी एक आहे. हा कर्करोग स्त्री जननेंद्रियाच्या बाह्य पृष्ठभागावर विकसित होतो. हा असा एक कर्करोग आहे जो सहसा हळूहळू विकसित होतो आणि त्याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे याला अत्यंत घातक कर्करोग म्हटले जाते. म्हणूनच व्हल्व्हर कॅन्सर आणि त्याची लक्षणे आणि उपचार याबद्दल जाणून घ्या.
व्हल्व्हर कर्करोग म्हणजे काय
बऱ्याच जणांना व्हल्व्हर कॅन्सरबद्दल फारसे माहिती नाही. हा कर्करोग योनिमार्गावर, स्त्रीच्या जननेंद्रियांच्या बाहेरील भागावर परिणाम करतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या जीवनशैलीत अचानक बदल झाल्याने आणि धूम्रपानासारख्या अयोग्य सवयींमुळे हा कर्करोग होण्याची शक्यता असते. व्हल्व्हर कार्सिनोमा बहुतेक योनीच्या बाह्य भागावर परिणाम करतो. योनीमार्गात सुरू होणाऱ्या कर्करोगाला प्रायमरी व्हल्व्हर कर्करोग म्हणतात. जेव्हा कर्करोग शरीराच्या इतर कोणत्याही भागातून योनीमध्ये पसरतो तेव्हा त्याला सेकंडरी व्हल्व्हर कर्करोग म्हणतात.
व्हल्व्हर कॅन्सरची लक्षणे
जेव्हा व्हल्व्हर कॅन्सर होतो तेव्हा त्याची थोडी लक्षणे दिसतात, कारण व्हल्व्हर कॅन्सर खूप हळू विकसित होतो आणि त्यामुळे त्याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. सहसा, पहिले लक्षण म्हणजे त्या जागी गाठ येणे किंवा अल्सर विकसित होणे. याबरोबरच त्या जागी खाज सुटणे, अस्वस्थता किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय या कॅन्सरची लक्षणे वेदनादायक संभोग, डिस्कलरेशन, लघवी करताना वेदना, चामखीळ सारखी वाढ , योनीमार्ग अतिसंवेदनशील होणे , अल्सर , तेथील त्वचा जाड होणे ही असतात. व्हल्व्हर कर्करोगाची लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये भिन्न असू शकतात. तसेच काही प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसतही नाहीत.
व्हल्व्हर कर्करोगाचे टप्पे
व्हल्व्हर कर्करोग स्टेज 0 ते स्टेज 4 पर्यंत असू शकतो.
स्टेज 0 – कर्करोग फक्त त्वचेच्या पृष्ठभागावर दिसून येतो.
स्टेज 1 आणि 2 – कर्करोग योनीमध्ये पसरतो आणि 2 सेमी पर्यंत वाढतो.
स्टेज 3 – कॅन्सर गुदद्वार किंवा योनी सारख्या जवळपासच्या ऊती आणि लिम्फ नोड्समध्ये पसरलेला आढळतो.
स्टेज 4 – मांडीच्या दोन्ही बाजूंच्या लिम्फ नोड्समध्ये पसरल्यानंतर, कर्करोग आतडे, मूत्राशय किंवा मूत्रमार्गात पसरलेला असू शकतो, ज्या मार्गाने मूत्र शरीरातून बाहेर पडते.
व्हल्व्हर कर्करोगावर उपचार
शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि बायोलॉजिक थेरपी हे व्हल्व्हर कर्करोगासाठी सर्वात सामान्य उपचार आहेत. व्हल्व्हर कर्करोगावरील उपचारांची प्राथमिक पद्धत म्हणजे शस्त्रक्रिया. कर्करोग प्राथमिक अवस्थेत असतानाच लक्षात आल्यास केवळ किरकोळ शस्त्रक्रियेने त्यावर उपचार करता येतात. कर्करोग जर पसरला तर म्हणजेच पुढील टप्प्यात जेव्हा कर्करोग मूत्रमार्ग, योनी किंवा गुदाशय यांसारख्या अवयवांमध्ये पसरतो तेव्हा शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट होते.
व्हल्व्हर कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय
कर्करोगाच्या बाबतीत उपचारापेक्षा प्रतिबंध करणे जास्त फायदेशीर असते. काही उपाय करून या कर्करोगाला बऱ्याच अंशी आळा घालता येतो. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, धूम्रपान न करणे, HPV लस घेणे आणि गर्भाशय ग्रीवेची पॅप स्मीअर चाचणी करून घेणे हे काही मार्ग आहेत जे व्हल्व्हर कर्करोगास प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. या कर्करोगाची जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि शरीरात काही बदल आढळल्यास त्वरित चाचणी करून घेणे. वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर वर्षातून किमान एकदा तरी स्त्रियांनी संपूर्ण शरीर तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन स्त्रीला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या येण्याआधीच ओळखता येईल.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक