सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आहे. त्यामुळे हे गारगार वातावरण थोडे उबदार करण्यासाठी ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) घेऊन येत आहे एक ‘गरमा गरमा’ (Garma Garam) गाणे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले. तर या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली ती, ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) यांनी. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रवाशांनीही ‘गरमा गरम’वर ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण ‘फील दि हीट’ चा अनुभव घेत होते. पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी.
‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांना श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘छंद लागला’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रील्स बनवण्याचा छंद लावला आहे. त्यातच आता या ‘गरमा गरम’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोहही प्रेक्षकांना आवरता आला नाही. तेही या वेळी ‘तमाशा लाईव्ह’च्या टीमसोबत थिरकले. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह चित्रपटाच्या टीमने मेट्रो स्थानकात प्रवाशांना तिकीट वाटपही केले याशिवाय प्रवाशांसोबत संवादही साधला. या संगीत सोहळ्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
प्रमोशनचा हा एक वेगळा प्रकार
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले, ‘’ प्रेक्षकांच्या, प्रवाशांच्या उपस्थितीत, ‘गरमा गरम’ हे गाणे मेट्रो स्थानकात प्रदर्शित होणे, ही आनंद देणारी गोष्ट आहे. प्रमोशनचा हा एक वेगळा प्रकार आहे. यामुळे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या थेट प्रतिक्रिया मिळतात. ‘तमाशा लाईव्ह’ हा खऱ्या अर्थाने वेगळा चित्रपट आहे. आजच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.”
‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकरने सांगितले, “ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक मेजवानी आहे. प्रत्येक गाण्याचा प्रकार वेगळा आहे. संगीतातील सगळे प्रकार एकाच चित्रपटात वापरल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ‘गरमा गरम’ गाणेही अप्रतिम बनवले आहे. अमितराज (Amit Raj) यांचे संगीत, क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांचे शब्द आणि यात भर म्हणजे उमेश जाधव (Umesh Jadhav) यांचे नृत्य दिग्दर्शन. एवढी तगडी संगीत टीम असल्यावर हे संगीत प्रेक्षकांना आवडणारच. आज मेट्रो स्थानकातील प्रवाशांचे प्रेम पाहता ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटगृहात ‘गरमा गरम’ कमाई करणार हे नक्की.’’
एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) निर्मित ‘तमाशा लाईव्ह’चे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, माऊली प्रॉडक्शन्स , डॉ. मनीषा किशोर टोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहे. येत्या 15 जुलैपासून ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सचित पाटील (Sachit Patil) आणि हेमांगी कवी (Hemangi Kavi) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक