पंचायत वेबसीरिजचा दुसरा सीझन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. प्रेक्षकांना जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता आणि इतर सर्व कलाकारांचे काम खूप आवडलं आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्येही प्रत्येक भागात आता पुढे काय मजेशीर घडणार याची उत्सुकता ताणून धरली गेली आहे. हा सीझन जितका मनोरंजक होता तितकाच त्याचा शेवट भावुक करणारा होता. ग्रामपंचायत हा विषय असल्याने सध्या या वेबसिरिजचं शूटिंग झालेलं गाव सर्वात जास्त चर्चेत आहे. वेबसिरिजमध्ये या गावाचं नाव फुलेरा असं दाखवण्यात आलं होतं. फुलेरा गावच्या ग्राम पंचायत ऑफिसमध्ये घडणारे प्रसंग यात चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळे सध्या मॅपवरून लोकांनी फुलेरा गावाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच जाणून घेऊ या ‘पंचायत 2’ चं शूटिंग नेमकं कुठे आणि कशा प्रकारे झालं. या वेबसिरीजमध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने पंचायत समितीच्या सचिवची भूमिका साकारलेली आहे. नुकतंच जितेंद्रने शूटिंग दरम्यान घडलेले काही किस्से आणि गावचं वातावरण इन्सावर शेअर केलं आहे.
‘पंचायत 2’ चं शूटिंग कोणत्या गावी झालं
पंचायत 2 मध्ये एकूण दहा एपिसोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. पंचायतच्या पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत होते. कारण या दोन्ही सीझनमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन झालेलं आहे. मात्र सीरिजमध्ये दाखवल्याप्रमाणे उत्तर प्रदेशच्या फुलेरा गावातील हे शूटिंग नसून मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील महोदया गावातील आहे. वेबसिरिजमध्ये या गावाचे नाव फुलेरा असं दाखवण्यात आल्यामुळे आता या गावाला फुलेरा अशीच ओळख मिळत आहे. महोदया गाव सिहोर जिल्ह्यापासून नऊ किलोमीटरवर आहे. शिवाय या गावातही खरी खुरी ग्रामपंचायत आहे. एका युझरने तर या गावचा गुगल मॅप देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मंदिर, पंचायत ऑफिस आणि एक छोटा पुल हायलाईट केलेला आहे. जितेंद्र कुमारने या गावातील शूटिंग दरम्यानचे काही मजेशीर किस्से शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो गावातील मुलांची सायकल चोरून चालवताना दिसत आहे. सेटवरची मजामस्ती देखील त्याने इन्स्टावर शेअर केली आहे.
कसं झालं ‘पंचायत 2’ चं शूटिंग
पंचायत वेबसीरिजचं शूटिंग कोणत्याही सेटवर झालेलं नसून खऱ्या खुऱ्या गावात झालेल आहे. जवळ जवळ दोन महिने सर्व कलाकार आणि टीम या गावात शूटिंगसाठी राहिले होते. काही भूमिकांसाठी गावकऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं. ज्यामुळे या वेबसिरिजमध्ये गावरान बाज दिसून आला. पंचायत वेबिसीरिजमध्ये अभिनेता रघुबीर यादव यांनी प्रधान, नीना गुप्ता यांनी प्रधानची पत्नी आणि कागदोपत्री प्रधान असलेली नीना गुप्ता, जितेंद्र कुमारने सचिवची भूमिका साकारली होती. इतर सहकलाकारांनीही या वेबसीरिजसाठी प्रचंड मेहनत घेतली म्हणूनच आज ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक