केसांना फुटलेले फाटे तुमच्या सौंदर्यात बाधा आणतात. पण एवढंच नाही यामुळे तुमच्या केसांची वाढही थांबते. जेव्हा केसांना व्हिटमिन्सचा योग्य पूरवठा होत नाही तेव्हा पोषणाच्या अभावी केस दुभंगतात आणि त्यांना फाटे फुटतात. बऱ्याचदा हॉर्मोन्सचे असंतुलन अथवा हिमोग्लोबिन कमी होण्यामुळेही तुमच्या केसांना फाटे फुटू शकतात. मात्र याबाबत जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या केसांना फाटे फुटण्याची समस्या नक्कीच कमी करू शकता. यासाठीच या टिप्स अवश्य फॉलो करा.
वरचेवर केस ट्रिम करा –
काही जणींना शॉर्ट हेअरकट आवडतो तर काहींना लांब. एखादा स्पेशल लुक करण्यासाठी तुम्ही निरनिराळे हेअर कट करता. पण ज्यांना केस लांब हवे असं वाटतं ते केस कापण्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं केसांसाठी मुळीच योग्य नाही. कारण केसांच्या योग्य वाढीसाठी ते वरचेवर ट्रिम करणं खूप गरजेचं आहे. केसांना फाटे हे नेहमी टोकांकडील भागावर निर्माण होतात. जर ट्रिम करून तुम्ही असे दुभंगलेले केस कापून टाकले तर केसांची वाढ जोमाने होऊ शकते. यासाठी महिन्यातून एकदा तुमच्या केसांना ट्रिम करा.
Shutterstock
केस ब्लो ड्राय करणं टाळा –
हेअर ड्रायर अथवा कोणतंही केसांना गरम करणारं टूल वापरणं केसांसाठी नुकसानकारकच असतं. आजकाल केस लवकर वाळवण्यासाठी अथवा हेअरस्टाईलसाठी सतत हेअर ड्रायरचा वापर केला जातो. मात्र हेअर ड्रायरमुळे तुमच्या केसांमधील ओलसरपणा आणि मऊपणा कमी होत जातो. ज्यामुळे ते निस्तेज, कोरडे होतात. अशा कोरड्या केसांना पोषण न मिळाल्यामुळे ते दुभंगतात आणि केसांना फाटे फुटतात. म्हणूनच शक्य तितका ड्रायरचा वापर टाळा.
Shutterstock
योग्य आहार घ्या –
शरीराच्या आरोग्याप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही तुम्हाला संतुलित आणि पोषक आहाराची गरज असते. कारण केसांना मिळणारे पोषक घटक शरीराला तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतूनच मिळत असतात. केसांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स असणं गरजेचं आहे. कारण यामुळे केसांची वाढ जोमाने होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. जर तुमच्या केसांना सतत फाटे फुटत असतील तर आहारात सुकामेवा, दही, अंडी, मासे, ओट्स, अॅव्होकॅडो, सोयाबीन, निरनिराळे फळे यांचा समावेश करा.
हेअर ट्रिटमेंटचे प्रमाण मर्यादित ठेवा –
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही सतत केसांवर निरनिराळ्या हेअरस्टाईल आणि हेअर ट्रिटमेंट करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळेही तुमचे केस खराब होऊ शकतात. हेअर ट्रिटमेंट करताना पार्लरमध्ये विविध केमिकल्सचे प्रयोग तुमच्या केसांवर केले जातात. ज्यामुळे तुमचे केस कोरडे होतात आणि केसांना फाटे फुटतात. केसांची निगा राखण्यासाठी महिन्यातून एकदा स्पा अथवा इतर ट्रिटमेंट करण्यास हरकत नाही. मात्र इतर वेळी केसांवर घरातील नैसर्गिक उपचार करा ज्यामुळे केसांचे आरोग्य वाढेल.
Shutterstock
केसांना योग्य पद्धतीने कंडिशनर लावा –
केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. केस तुटणे आणि गळणे थांबवण्यासाठी कंडिशनर करणे आवश्यक आहे. यातून केसांना पुरेसे पोषण मिळते आणि केस हायड्रेट राहतात. ज्यामुळे केस कोरडे होऊन दुभंगत नाहीत. पण केसांवर कंडिशनर लावण्यापूर्वी ते कसं आणि किती प्रमाणात लावावं आणि थंड की गरम पाण्याने केस धुवावे हे अवश्य जाणून घ्या.
यासाठी वाचा –
स्मूथ आणि सिल्की केस हवे, मग हेअर कंडिशनर लावताना टाळा ‘या’ चुका
जाणून घ्या थंड की कोमट, कोणत्या पाण्याने धुवावे केस
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर