मुलं आमचं ऐकत नाहीत अशी तक्रार अनेक पालक करत असतात. पण त्यांना हे माहीत नसेल की मुलं जरी तुमचं ऐकत नसली तरी ती तुमचंच अनुकरण करत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी बोलताना आणि वागताना नेहमीच सावध राहायला हवं. मुलांसाठी त्यांच्या आयुष्यातील आदर्श व्यक्ती नेहमी त्यांचे आईबाबाच असतात. त्यामुळे मुलांना लहानपणापासून स्वतःच्या आईवडिलांसारखं व्हायचं असतं. तुम्ही मुलांसमोर जी भाषाशैली वापरता, जसं बोलता आणि वागता त्याचा नकळत तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. जरी लहानपणी याचा तुम्हाला अंदाज नाही आला तरी मुलं मोठी झाल्यावर हळू हळू त्याची झलक तुम्हाला पाहायला मिळू शकते. यासाठीच मुलं लहान असतानाच त्यांचे जबाबदारीने संगोपन करा.
जाणून घ्या लहान मुलांसमोर काय बोलू अथवा वागू नये
अगदी मुलांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही त्यांसोबत गोड गोड बोलता. पण तुमच्याही नकळत कधी कधी तुम्ही असं काही बोलता ज्याचा तुमच्या मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. कारण त्यांना फक्त बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा नाहीतर रोजच्या आयुष्यातही तुमची गरज भासत असते.
तुझ्यासाठी मला खूप कष्ट करावे लागतात
पालक म्हणून मुलांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत सुखसुविधा देणं हे आपलं कर्तव्यच आहे. मात्र या कर्तव्याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी सतत त्यांच्यासमोर तुमच्या कष्टाचा पाढा वाचणं कमी करा. कारण यामुळे तुमच्या मुलांना तुम्ही केलेल्या प्रेमापेक्षा उपकारांचे ओझे वाटू लागेल. मुलांना तुमच्या कष्टाची जाणीव व्हावी असं वाटत असेल तर त्यांना कष्ट करण्याचे महत्त्व पटवून द्या पण त्यासाठी तुम्ही केलेले कष्ट वारंवार काढू नका. कारण आईवडिलांचे प्रेम हे पवित्र, शुद्ध असते आणि त्याची तुलना अशी पैसे अथवा कष्टासोबत केली जाणं योग्य नाही.
ही गोष्ट आपण कधीच खरेदी करू शकत नाही
लहान मुलं नेहमी तुमच्याजवळ खाऊ, खेळणी अथवा एखाद्या महागड्या वस्तूसाठी हट्ट करतात. एखादी गोष्ट गरजेची नसेल तर तुम्ही आपण ती खरेदी करू शकत नाही असं बोलून वेळ मारून नेता. पण असं केल्यामुळे तुमच्या मुलांच्या मनात आर्थिक परिस्थितीबद्दल चुकीचा समज निर्माण होतो. शिवाय मुलं पैशांबद्दल चुकीचा विचार करतात. ज्याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होऊ शकतो. जर तुमच्या मुलांचे विचार भविष्यात समृद्ध आणि ऐश्वर्याचे हवे असतील. तर ती गोष्ट त्यांना आता खरेदी न करण्याचे खरे कारण सांगा. शिवाय यासाठी लागणारे पैसे कमवण्यासाठी आधी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. भरपूर पैसे मिळाले की आपण ते नक्कीच खरेदी करू अशा आशावाद निर्माण करा. यासोबत पैसे कमवण्यासाठी चांगले शिक्षण, चांगले संस्कार महत्त्वाचे आहे पटवून द्या.
तुला हे जमणार नाही
एक पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतेची चांगलीच जाणीव असते. मात्र यासाठी ती गोष्ट मुलांना सांगणं योग्य नाही. जर तुमच्या मुलांना एखाद्या स्पर्धेत अथवा एखाद्या परिक्षेत भाग घ्यायचा असेल तर घेऊ द्या. यश मिळो अथवा न मिळो त्यांना स्पर्धेसाठी तयार करणं हे तुमचे काम आहे. याउलट अपयशाच्या भीतीने जर तुम्ही मुलांना तुला हे जमणार नाही असं सांगून भाग घेण्यास परावृत्त केलं तर तुमची मुलं त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतील. जाणून घ्या सर्वांसमोर का हट्ट करतात लहान मुलं, करा हे उपाय
तू अजून लहान आहेस
तू अजून एखादी गोष्ट करण्यास लहान आहेस असं बोललेलं कोणालाच नाही आवडत. अगदी तुम्हाला सुद्धा…कारण तुम्हीदेखील काहीतरी करण्यासाठी तुमच्या वयोमानाने लहान असू शकता. मात्र बऱ्याचदा मुलांचे प्रश्न टाळण्यासाठी प्रत्येक घरात हे वाक्य मुलांना सांगितलं जातं. ज्याचा चुकीचा परिणाम मुलांवर होतो. उत्सुकता आणि जाणून घेण्याच्या प्रचंड इच्छेमुळे मुलं मग इतरांच्या मदतीने ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांना समजवताना काही वाक्यरचना आणि वागणं आवर्जून टाळा. मुलांशी अशी करा मैत्री, फॉलो करा या पॅरेंटिंग टिप्स
मुलांसमोर जोडीदाराला कमी लेखणे
मुलांना त्यांचे आईवडील एकसमान प्रिय असतात. त्यामुळे जर तुम्ही मुलांसमोर सतत तुमच्या जोडीदाराला कमी लेखलं अथवा भांडण केलं तर याचा त्यांच्या मनावर परिणाम होत जातो. अशा प्रकारच्या वातावरणात वाढलेली मुलं मोठेपणी प्रेम, लग्न, रिलेशनशिप, मैत्री करू शकत नाहीत. अशा प्रकारे वागल्यामुळे तुम्ही मुलांचा तुमच्यावरील विश्वास हरवून बसू शकता. त्यामुळे तुमचे वैयक्तिक वाद मुलं घरात नसताना सोडवा.
बाळाच्या जन्मानंतर ‘या’ गोष्टींमुळे येऊ शकतो पतीपत्नीमध्ये दुरावा