मराठी मालिकांमध्ये वेगळे विषय आता चांगल्या तऱ्हेने हाताळले जात आहेत. सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’ ही त्यापैकीच एक मालिका आहे. शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. शिक्षण हा संस्कारांंचा पाया असतो असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. शिक्षणाने माणूस प्रगत तर होतोच. शिवाय एक स्त्री शिकली की, ती सर्व कुटुंबाला शिकवते असंही म्हटलं जातं आणि हे बहुतांशी खरं आहे. स्त्री शिकल्यामुळे संपूर्ण कुटुंब शिकतं. या सगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या ‘ती फुलराणी’च्या माध्यमातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करत घेतलेलं शिक्षण…ही आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची गोष्ट. त्यामुळे ही गोष्ट सध्या प्रेक्षकांना भावत असून उत्तरोत्तर ही कथा फुलत चालली आहे. मयुरी वाघने ही भूमिका अप्रतिम साकारली आहे. सध्या वेगळ्या विषयांना हाताळण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि प्रेक्षकही असे विषय अगदी आवडीने पाहतात. त्याच – त्याच सासू – सुनांच्या विषयांना फाटा देत असे विषय प्रेक्षकांसमोर आणणंही गरजेचं आहे. शिवाय समाजाशी निगडीत हे विषय असल्यामुळेही या मालिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे असं म्हणावं लागेल.
शिक्षणाची चिकाटी कायम ठेवत मंजूची प्रगती
आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, “नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेली चिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन आली आहे. अर्थात शिक्षणाने आत्मविश्वास येतोच. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. शिवाय मयुरीने भाषेचा एक वेगळा लहेजा पकडत मंजू ही व्यक्तिरेखा चांगली रंगवली आहे. या मालिकेतील कलाकारही अगदी सहज अभिनय केल्यामुळे प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहेत. त्यामुळे ही मालिका बघायला प्रेक्षकांनाही आवडत आहे.
शौनकचा जीव जडला मंजूवर
आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनकचा जीव जडला आहे. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? शिकून देशमुखांना जिद्दीने उत्तर देणार का? या सगळ्यात मंजू शिकून स्वतःला सिद्ध करणार का? सगळेच प्रश्न आता प्रेक्षकांनाही पडायला लागले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच प्रेक्षकांना हवी असणार. त्यामुळे आता मंजू पुढे काय करणार आणि शिक्षणाने तिचा आत्मविश्वास वाढून ती देशमुखांना कशी सामोरी जाणार हे लवकरच आपल्याला कळेल.