पावसाळा हा ऋतू मनाला प्रसन्न देणारा, रोमॅंटिक आणि निसर्गासाठी पूरक असतो. पण जितका तुम्हाला आनंद देतो कधी कधी तितकीच तुमची गैरसोयही करतो. कारण पावसाळ्यात सगळीकडे पाणी असते. प्रवास करणं कठीण होतं, कपडे लवकर सुकत नाही, घरात कुबट वास येतो, भिजल्यावर बराच काळ ओले कपडे घातल्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, फॅशनेबल आणि ट्रेडिंग कपडे तुम्हाला या काळात घातला येत नाहीत. अशा अनेक समस्या पावसाळ्यात तुमच्यासमोर असतात. मात्र जर योग्य टिप्स फॉलो केल्या तर हा पावसाळा तुमच्यासाठी सुखकर आणि आनंददायी नक्कीच ठरू शकतो. यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा.
पावसात भिजावं लागलं तर –
पावसाळा म्हणजे कधी ना कधी तुम्हाला पावसात भिजावं लागणारच. जर तुम्हाला पावसात भिजायला आवडत असेल तर तुम्ही पावसाचा छान आनंद घ्याल. मात्र जर तुम्हाला पावसात भिजणं आवडत नसेल अथवा ऑफिस, कामानिमित्त घराबाहेर जाताना पावसात भिजायचं नसेल तर मात्र तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वीच छत्री, रेनकोट, पावसाळी चपला अशा तयारीने घराबाहेर पडा. शिवाय तुमचा मोबाईल जर वॉटरप्रूफ नसेल तर मोबाईल, पाकीट आणि इतर गोष्टींसाठी प्लास्टिकचे कव्हर वापरा. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल. शिवाय प्रवासात टीश्यू पेपर, रूमाल, एखादा मोठा नॅपकीन अशा वस्तू जवळ ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पावसामुळे जास्त काळ ओलं राहावं लागणार नाही.
पावसाळ्यात घरी कपडे सुकवताना –
पावसाळ्यात कपडे लवकर न सुकणं ही एक खूप मोठी डोकेदुखी असते. बाल्कनी अथवा खिडकीतून पाणी येत असल्यामुळे घराबाहेर कपडे सुकवता येत नाहीत. घरात कपडे सुकत ठेवले असतील आणि अचानक घरात पाहुणे आले तर मग खूपच पंचाईत होते. शिवाय या कपड्यांमुळे घरातील इतर वस्तू जसं की टेबल, खुर्ची ओली होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून आजकाल बाजारात कपडे सुकवण्याचे स्टॅंड मिळते. तुमच्या सोयीनुसार स्टॅंड विकत घ्या आणि घरात कपडे सुकवा.
घरात कुबट वास आल्यावर –
घरात कपडे सुकवणे म्हणजे तुम्हाला दमट कपडे आणि वातावरणातून येणाऱ्या कुबट वासाला सामोरे जावे लागते. उन्हात सुकलेल्या कपड्यांमधून असा वास येत नाही. सहाजिकच यामुळे पूर्ण घरात हा वास येऊ लागतो. यासाठीच कपडे सुकवताना डिटर्जंट सोबत चांगले सुवासिक कन्फर्ट सोल्शुशन वापरा ज्यामुळे कपड्यांना चांगला वास येईल. यासोबतच घरात सुंगधित फुलं ठेवा अथवा धूप, कापूर, अगरबत्ती लावा. ज्यामुळे घरात चांगला वास दरवळू लागेल.
पावसाळ्यात आवडती फॅशन करताना –
पावसाळ्यात तुम्ही तुमचे सिल्क, कॉटनचे कपडे, लेदर बॅग्ज, लेदरचे शूज, लेदर जॅकेट, इमिटेशन ज्वैलरी अशा वस्तू नेहमी घालू नाही शकत. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच ट्रेंडनुसार तुमच्या आवडीचे कपडे, शूज विकत घ्या. आजकाल खास पावसाळ्यासाठी विशेष प्रकारचे कपडे, शूज बाजारात विकत मिळतात. अशा वस्तू ट्रेडिंग असतातच शिवाय त्या पावसामुळे खराब होत नाहीत.
घर निर्जंतूक करण्यासाठी –
पावसाळ्यात बाहेरील वातावरणात झालेल्या बदलामुळे बऱ्याचदा घरात किडे, डास यांचा प्रादुर्भाव वाढतो. रात्री घरातील प्रकाशाकडे अनेक कीटक आकर्षित होतात. अशा जीव जंतूपासून दूर राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी घरातच्या कोपऱ्यात अथवा बाल्कनीत कडूलिंबांच्या पाने किंवा खडे मीठ एका वाटीत भरून ठेवा. तुम्ही मीठाच्या पाण्याने घराची फरशी पुसली तरी माशा, कीटकांचा त्रास कमी होतो.