पेराल ते उगवते ही उक्ती आपण सगळेच जाणतो. तुम्ही जसे वागता त्याचे तसे परिणाम तुम्हाला भविष्यात मिळत असतात किंवा त्याक्षणीही तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकतो. आपण काय वागतो ते पाहून आपल्याकडून आपली मुलं शिकत असतात. त्यामुळे तुम्ही कोणती कृती करता ते देखील ते पाहात असतात. उदा. सासूचा छळ करताना तुमच्या मुलाने पाहिले असेल आणि ज्यावेळी तुम्ही सुनेच्या भूमिकेतून सासूच्या भूमिकेत जाता आणि तुमचा छळ होताना मुलाने पाहिला तर त्याला फारसे काही वेगळे वाटणार नाही. कारण त्याने त्या गोष्टी तुम्हाला करताना पाहिले आहे.आता या उदाहरणावरुन आजच्या विषयाचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. चला आता कोणत्या चुका करु नये या गोष्टी जाणून घेऊया.
मत्सर निर्माण करु नका
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडत नसेल तर कदाचित तुम्हाला तो स्वभाव पटत नसावा. पण घरातील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत त्या व्यक्तीचा स्वभाव असाच असेल असे अजिबात सांगत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्याबद्दल मत्सर मनात पसरवताना खूप विचार करा. कारण मत्सर ही अशी गोष्ट आहे जिला पसरण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण पुन्हा सगळे नाते पुर्ववत होताना खूप अडचणी येतात. तुमच्या द्वेषामुळे दुसऱ्यासाठीही ही परिस्थिती अधिक कठीण होता कामा नये.
उदा. एकाच ऑफिसमध्ये किंवा घरात एखाद्या व्यक्तिचे वागणे दुसऱ्यासोबत खूप चांगले असते. पण दुसऱ्यासोबत तसे नसेल म्हणजे त्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम नाही असे अजिबात नाही. फक्त तुम्हाला ती भिती असते.
एकमेकांबद्दल बोलणे
एखाद्याबद्दल बोलणे हे फारच सोपे असते. पण जर तुमच्याबद्दल कोणी बोलत असेल तर तुम्हाला त्रास होऊ लागतो. तुमच्या मुलांमध्ये किंवा जवळच्यांमध्ये ही सवय अजिबात लावू नका. जर तुम्हाला मुलांसमोर असे काही बोलायची सवय असेल तर ती सवय आताच बंद करा. एकमेकांबद्दल बोलण्यामुळे नको ते गैरसमज वाढू लागतात. कधी कधी काही गोष्टी बोलायच्या नसतात. पण तरी देखील अशा गोष्टी बोलल्या जातात. एखादी व्यक्ती ज्यावेळी तुम्हाला खूप विश्वासाने काही सांगत असेल तर त्या गोष्टी इतरांसमोर सांगण्याची चुकी अजिबात करु नका.
दुसऱ्याचे यश पचवण्याची ताकद असू द्या
यश हे कधीही कोणाला मिळू शकते. एखाद्या यश खूप आधी मिळते. कधी नंतर मिळते किंवा मिळायला खूप वेळ जातो. एखाद्या व्यक्तीला खूप पटकन यश मिळते आणि कितीही मेहनत करुन आपल्याला काही केल्या यश मिळत नाही. अशावेळी दुसऱ्याला यश मिळाले असेल तर त्याच्या आनंदात सहभागी व्हा. त्याचे यश पचवा. तुम्ही दुसऱ्याच्या यशात सामील व्हाल तर तुमच्या यशातही दुसऱ्या व्यक्ती सहभागी होतील. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाचा जळफळाट होण्यापेक्षा आहे त्यात आनंदी राहा आणि मार्गक्रमण करत राहा.
आता तुम्ही वागताना एकदा तरी विचार करा. कारण बुमरँग होऊन ते सगळे तुमच्यावर उलटू शकते.