सध्या ऐकावं तिथे चर्चा आहे ती रणवीरची. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बाच्या ट्रेलरची सर्वच आतुरतेने वाट बघत होते आणि त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं हे नक्की कशाला म्हणतात तेच ‘सिम्बा’च्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. सिंघमची छाप असलेला तरीही आपला वेगळेपणा जपलेला भालेराव ‘सिम्बा’चं अर्थातच प्रमुख आकर्षण आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटाची छाप या चित्रपटावरही आहे. यावेळी हिरोच्या रूपात रणवीर सिंह हा नवा चेहरा रोहितच्या चित्रपटातून दिसत असला तरीही हा संपूर्ण चित्रपट रोहित शेट्टीच्या बाजाचा आहे हे ट्रेलरवरूनच लक्षात येत आहे.
लालची पोलिसाच्या भूमिकेत रणवीर
रणवीर सिंग यामध्ये भालेराव या लालची पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. गेले सहा महिने या चित्रपटाची चर्चा होती. या वर्षातील सर्वात मोठा आणि धमाकेदार चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. मात्र सारा अली खान या ट्रेलरमध्ये केवळ काही सेकंदासाठीच दिसली आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम’मधील संवादानाचे ट्रेलरची सुरुवात आहे आणि अजय देवगणच ट्रेलरच्या शेवटीही दिसतो. मात्र अर्थातच भाव खाऊन जात आहे तो रणवीर सिंग. रणवीर जी भूमिका करतो ती भूमिका जगतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणारी नाही. रणवीर यामध्ये एका मराठी पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याचे काही संवाद मराठीतही आहेत. यापूर्वीही बाजीराव – मस्तानीसाठी मराठी रणवीर बोलला होता. त्यामुळे कदाचित या चित्रपटातही त्याला त्याचा फायदा झाला असावा.
ट्रेलरमधील संवाद लक्षवेधी
ट्रेलमधील काही संवाद लक्षवेधी आहेत. रणवीरचा ‘ये कलयुग है कलयुग, यहा लोग सिर्फ एक ही मतलब के लिए जिते है अपने मतलब के लिए’ हा संवाद नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. तर सोनू सूदही रणवीरसमोर चांगलाच टक्कर देत आहे. ‘तीन कुत्ते बांधके रखे है मैंने, उनको पेडीग्री देता है और चौथा कुत्ता तू, नोट देता है तेरेको’ असं म्हणत सोनू आणि रणवीरमध्ये नक्की काय नातं असेल हे ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.
वर्षाच्या शेवटी होणार प्रदर्शित
सिम्बा यावर्षाच्या शेवटी अर्थात २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सारा अली खानचा ‘केदारनाथ’ ७ डिसेंबरला प्रदर्शित होत असून एकाच महिन्यात तिचा हा दुसरा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सारासाठी हे वर्ष अतिशय चांगलं असून रणवीरचाही दीपिकाशी लग्न झाल्यानंतर हा पहिलाच चित्रपट आहे.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम