फुलं हा लग्नसराईचा महत्वाचा भाग आहेत. ताजी, मनमोहक आणि वातावरण सुगंधित करणारी फुलं कोणाला आवडणार नाहीत. त्यामुळे लग्नाच्या वेळी फुलांना खूप महत्त्व असते. लग्नाची शॉपिंग, लग्नासाठी मराठी उखाणे पाठ करणं असो लग्नाचं पॅकींग असो या सगळ्या गोष्टींसोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती लग्नाचं डेकोरेशन. ज्यासाठी फुलांचा वापर जास्त करून केला जातो. पण आता नवीन ट्रेंड येत आहे, तो आहे फुलांच्या दागिन्यांचा. खरंतर आपल्याकडे डोहाळे जेवणाला फुलांची वाडी असते. पण आता लग्नाच्या विविध कार्यांमध्ये जसं हळद, मेहंदी यामध्ये फुलांच्या दागिन्यांचा वापर होतो आहे.
नववधू आता जुन्या पद्धती आणि दागिन्यांच्या कल्पनांना मागे टाकून नवं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यातून सुरूवात झाली आहे फ्लोरल स्टाईल स्टेटमेंट ला. या कल्पनेतंर्गत फुलांचा वापर अगदी हटके पद्धतीने नववधू करत आहेत. उदा. लेहंग्याची सुंदरता वाढवण्यासाठी, फुलांची ओढणी किंवा फुलांचे कलीरे यासाठी फुलांचा वापर केला जात आहे. जुन्या गोष्टींना अशा प्रकारे नवं रूप दिलं जातंय. चला पाहूया काय आहे हा ट्रेंड आणि तुमच्या लग्नासाठी तुम्हालाही तो कसा वापरता येईल.
फ्लोरल हेअर बुके (Floral Hair Bouquet)
लग्नात करा फुलांची सुंदर बुके हेअरस्टाईल
आपल्या लग्नांमध्ये फुलांचा गजरा किंवा फुलांची वेणी अशी हेअरस्टाईल दिसतेच. पण तुम्हाला केसांमध्ये फुलांचा बुकेच कॅरी करता आला तर आहे ना युनिक. मोठे मोठे गुलाब, लिलीची फुलं अशा सुंदर फुलांनी तुमच्या हेअरस्टाईल मस्त लुक येईल. तुम्ही लग्नाच्या दिवशी जणूकाही परीच वाटाल. हा फ्लोरल हेअर बुके ट्रेंड अभिनेत्री अनुष्काने सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. अनुष्काने तिच्या डेस्टीनेशन वेडिंगमध्ये पांढऱ्या आणि फिकट गुलाबी रंगाची छान हेअरस्टाईल केली होती. तिच्या लेहंग्याला मॅचिंग फुलं फारच सुंदर दिसत होती. तुम्हीही तुमच्या वेडिंग आऊटफिटला मॅचिंग फुलं निवडून अशी सुंदर हेअरस्टाईल करू शकता.
फ्लोरल पैंजण (Floral Anklets)
फुलांचे पैंजण असा विचार तुम्ही केलेलात का? पण हे फारच मनमोहक दिसतात. जर तुम्हाला चांदीचे किंवा इमिटेशन पैंजण घालायची इच्छा नसल्यास तुमच्यासाठी फ्लोरल पैंजणचा ऑप्शन बेस्ट आहे. कारण आजकाल तसंही आपण चांदीचे पैंजण रोज वापरत नाही. त्यामुळे फुलांचे हलके आणि सुंदर पैंजण तुम्ही करून घेऊ शकता. तसं शक्य नसल्यास मोगऱ्याच्या गजऱ्याचा पैंजणासारखा करू शकता.
फ्लोरल मुकुट किंवा हेडबँड (Flower Headband)
प्रत्येक मुलीसाठी लग्न हे स्वप्नवत असतं. एकीकडे लग्नाचा आनंद असतो तर दुसरीकडे माहेराहून सासरी जाण्याची घालमेल सुरू असते. प्रत्येक मुलगीही आईबाबांसाठी परी किंवा राजकन्या असते. त्यामुळे या परीसाठी असा सुंदर फुलांचा मुकुट किंवा हेडबँड तर मस्टच आहे. बॉलीवूडची बाँग ब्युटी बिपाशा बासूने तिच्या मेहंदीला असा छान आणि नाजूक फुलांचा फ्लोरल मुकुट घातला होता. सध्या फोटोशूट आणि लग्नसराईत याचं खूप आकर्षण आहे. यामध्ये तुम्ही एक किंवा अनेक प्रकारच्या फुलांचा वापर करू शकता.
लेहंगा सजावट (Lehenga Decor)
लेहंगा दिसेल अजूनच उठून फुलांनी
मेहंदी किंवा संगीत सेरेमनीसाठी तुम्हाला अगदी भरजरी लेहंगा घालायचा नसेल पण नववधू म्हणून उठूनही दिसायचं असेल तर फ्लोरल सजावट तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमच्या लेहंग्यावर अशाप्रकारे तुम्ही फुलांची सजावट करून घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला भरजरी कपड्यांमध्ये वावरावंही लागणार नाही आणि वधू म्हणून उठूनही दिसता येईल. आहे ना खास आयडिया.
फुलांचे कलीरा (Floral Kalira)
पंजाबी लग्नांमध्ये कलीरा घालण्याची पद्धत असते. पण आजकाल इतर लग्नातही कलीरे हौस म्हणून घातले जातात. आता तुमची हौस पूर्ण करण्यासाठी अगदीच टिपिकल कलीरे नाही मिळाले तर नो टेन्शन. फ्लोरल कलीरा ऑप्शनला आहेतच. तुम्हाला हव्या रंगाचे आणि हव्या तेवढ्या लांबीचे कलीरा बनवून घ्या आणि मेंदी सेरेमनीला टिपीकल फ्लोरल दागिन्यांऐवजी असं कलीरा घाला. जे तुमच्या लुकला बनवेल एकदम परफेक्ट.
फुलांचा दुपट्टा (Floral Dupatta)
नववधूसाठी फुलांचा शेला किंवा दुपट्टा
आता आपल्याकडेही बऱ्याच लग्नात हा फ्लोरल शेला किंवा दुपट्ट्यांचा ट्रेंड दिसू लागला आहे. पण तो अजूनही तितका कॉमन नाहीयं. फ्लोरल शेला-दुपट्टा किंवा फुलांची चादर ही तुमच्या आउटफिटला अजूनच खुलवेल. नाजूक फुल तुमच्या लुकसाठी कधीही बेस्टच नाही का. तुमच्या फंक्शनला आलेल्या पाहुण्यांचे लक्ष त्यामुळे नक्कीच वेधलं जाईल, यात शंका नाही.
फ्लोरल हेअर स्टाईल (Floral Hair Style)
आहे ना मेहंदी, हळदी किंवा वेडिंग फोटोशूटसाठी हटके हेअर स्टाईल आयडिया. मग नेहमीची टिपीकल फ्लोरल ज्वेलरी टाळा आणि ही हटके फ्लोरल हेअर स्टाईल नक्की करा. अशी हेअरस्टाईल केलीत तर तुमचा हा लुक कोणीही विसरू शकणार नाही, एवढं मात्र नक्की.
मग तुम्हीही हा हटके फ्लोरल ट्रेंड तुमच्या लग्नासाठी नक्की करा आणि सुंदर नव्या प्रवासाला सुंगधित सुरूवात करा.