आपल्यापैकी बऱ्याच लोकांना चहाऐवजी कॉफी आवडते. कॉफी मध्यम प्रमाणात म्हणजे दररोज जास्तीत जास्त 4 कप प्यायल्यास बहुतेक निरोगी प्रौढांना त्याचा फार त्रास होत नाही. पण अति प्रमाणात कॉफीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. कॉफीमध्ये कॅफिन असल्यामुळे त्याचे निद्रानाश, अस्वस्थता, पोटदुखी, मळमळ, ऍसिडिटी, उलट्या, हृदय आणि श्वासोच्छवासाची गती वाढणे हे आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात. जर मर्यादित प्रमाणात सेवन केले तर कॉफीचे फायदे सुद्धा अनेक आहेत.

कॅफिनेटेड कॉफी दररोज 4 कपपेक्षा जास्त घेतल्यास ती शरीरासाठी असुरक्षित असते. जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने डोकेदुखी, चिंता, कानात आवाज होणे आणि हृदयाचे ठोके अनियमित होणे, छातीत दुखणे हे त्रास होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही जर कॉफी पिणे पूर्णपणे सोडून देण्याचा किंवा कॉफीचे सेवन कमी करण्याचा विचार करत असाल तर कॉफीऐवजी ही पौष्टीक पेये तुम्ही घेऊ शकता.
डिकॅफ
तुम्ही कॉफी कमी करण्याचा विचार करत असाल, तर हा पर्याय तुम्हाला कमी कॅफिनमध्ये कॉफीची चव देतो. कॉफीमधील उत्तेजक घटक काढून टाकण्यासाठी कार्बन डायऑक्साइड सारखी रसायने किंवा वायू वापरला जातो. स्विस वॉटर मेथड मध्ये फक्त पाणी वापरले जाते. डीकॅफिनेटेड कॉफी तयार करण्यासाठी कॉफी बीनमधून 97% कॅफिन काढून टाकणे आवश्यक असते. त्यानंतर, एका कपमध्ये 100 मिलीग्रामच्या तुलनेत प्रति कप फक्त 3 मिलीग्राम ते 12 मिलीग्राम कॅफिन असते जे शरीरात गेल्यास त्रासदायक ठरत नाही.
ग्रीन टी

जर तुम्ही कॉफीचे सेवन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ते अचानक करू नका. असे केल्यास तुम्हाला थकवा वाटणे ,बधिर होणे, ब्रेन फॉग आणि चिडचिड होणे हे त्रास होऊ शकतात. कॉफी पिणे अचानक कमी किंवा बंद केल्यास डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा वेळी ग्रीन टी तुमची मदत करू शकतो. ग्रीन टी मध्ये पेशींचे संरक्षण करणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सच्या व्यतिरिक्त एक कप कॉफीच्या तुलनेत एक चतुर्थांश कॅफिन असते. ज्यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही. कॉफी कमी करून त्याऐवजी ग्रीन टी पिणे सुरु करा.
हळद घातलेले दूध
आपल्याकडे पूर्वीपासूनच तब्येत बरी नसताना हळद घालून दूध पिण्याची पद्धत आहे. हळद घातलेले दूध पिण्याचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. हे दूध तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते तसेच संधिवाताच्या वेदना कमी करू शकते आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे होणारी त्वचेची सूज व जळजळ दूर करू शकते. तुम्ही यासाठी फक्त गाईचे किंवा म्हशीचेच दूध नव्हे तर आमंड मिल्क किंवा नारळाचे दूध देखील घेऊ शकता.या दुधात हळदीबरोबर थोडेसे जायफळ घातले तयार त्याची चव तर वाढेलच शिवाय ते अधिक पौष्टिक होईल. गोडीसाठी तुम्ही त्यात साखरेऐवजी मध घालू शकता. पण हे दूध साखर घातली नाही तरीही छान लागते.
नारळपाणी

नारळपाणी हे अनेक एनर्जी ड्रिंक्सपेक्षा चांगले आहे कारण त्यात कॅफीन नसते आणि साखर कमी आहे. त्यातून इलेक्ट्रोलाइट्स नावाची आवश्यक खनिजे देखील मिळतात जी घाम आल्यावर शरीरातून निघून जातात.
लिंबूपाणी
हिवाळ्यात, आपण गरमागरम रिफ्रेशिंग लेमन टी घेऊ शकतो व उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत घेऊ शकतो. फक्त यात जास्त प्रमाणात साखर घालू नका. इतर लिंबूवर्गीय फळांप्रमाणे लिंबू देखील फ्लेव्होनॉइड्स या पेशी-संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट्सने व व्हिटॅमिन सीने परिपूर्ण आहे. काही अभ्यासात असे आढळले आहे की दररोज आहारात लिंबाचा रस घेतल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
म्हणूनच कॉफी कमी करा आणि ही पौष्टिक पेये सुरु करा.
Photo Credit- unsplash
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक