स्वयंपाक घर सध्या अत्याधुनिक साधनांनी भरलेले असते. मात्र तरिही मन पूर्वीच्या काळातील नैसर्गिक साधनांमध्ये गुंतलेले राहते. याचं कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे जरी साधनसामुग्रीमध्ये अनेक बाबतीत प्रगती झाली असली तरी त्यामुळे माणसाचा फक्त वेळ वाचत आहे. या आधुनिक बदलांमुळे माणसाच्या आरोग्यावर चांगला बदल होण्याऐवजी माणसाचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. यासाठीच मग पुन्हा जुन्या साधनसामुग्रीचा वापर होताना दिसू लागला आहे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व नक्कीच पटून गेलं आहे. सध्या सोशल मीडियवर दगडी पाटा वरंवटा पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हा दगडी पाटा वरंवटा चक्क ऑनलाईन विकत घेणारे ग्राहक आहेत. यासाठीच जाणून घ्या दगडी पाटा वरंवट्यावर वाटलेल्या चटणीमुळे आरोग्यावर नेमका काय फायदा होतो.
पाटा वरंवट्यावर वाटलेल्या चटणीची पारंपरिक चव
स्वयंपाक घरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मिक्सर, मिक्सी, फूट प्रोसेसर यांचा वापर गेल्या काही वर्षांपासून नक्कीच वाढला आहे. पण या साधनांमध्ये वाटलेल्या पदार्थांना हवी तशी पारंपरिक चव नक्कीच येत नाही. वेळेअभावी आतापर्यंत लोक या सर्व साधनांचा वापर करतच वाटण अथवा चटणी करत होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांना घरात राहणे, स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ काढणे आणि आरोग्याची काळजी घेणे या गोष्टींचे महत्त्व पटले आहे. सहाजिकच गेल्या वर्षी पासून दोनदा झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांनी आपला मोर्चा दगडी पाटा वरंवटा, खलबत्ता अशा पारंपरिक साधनांकडे वळवला आहे. जे लोक या साधनांचा वापर करत आहेत त्यांनी पुन्हा आईच्या,आजीच्या हातच्या चटणीची अनुभूती घेतली. शिवाय पाट्यावर वाटलेल्या पदार्थांमधील पोषक मुल्ये खराब होत नसल्यामुळे ते शरीरासाठी अतिशय लाभदायक ठरत आहेत. जेव्हा पाट्यावर एखादी चटणी बनवली जाते तेव्हा दगडी वरंवट्याच्या दाबामुळे त्या पदार्थांमधील नैसर्गिक तेल आधी बाहेर पडते. ज्यामुळे चटणीला छान रंग, सुंगध आणि चव येते. मिक्सरमध्ये ही प्रक्रिया काही सेंकदांमध्ये होत असल्यामुळे पदार्थ फक्त बारीक होतात त्याच्या चव आणि सुंगधामध्ये फआर बदल होत नाहीत. पाट्यावर वाटलेल्या पदार्थांच्या सुंगधामुळे तुमची भूक वाढते. तो सुंगध नाकातून शरीरात जातो आणि पदार्थाबद्दल तुम्हाला रस निर्माण होतो. सेलिब्रेटी आहारतज्ञ्ज ऋजुता दिवेकर यांनी बऱ्याचदा त्यांच्या सोशल मीडिया व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. फिटनेस राखण्यासाठी त्या लोकांना पाट्यावर वाटलेली चटणी खाण्याचा सल्ला देतात.
दगडी पाटा वरंवटा होतोय व्हायरल
ज्यांना याचा चांगला अनुभव आला त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरूवात केली. याचा परिणाम असा झाला दगडी पाटा वरंवटा कुठे मिळतो, त्याचे फायदे काय याची चौकशी सुरू झाली आणि जुन्या काळातील दगडी पाटा वरंवटा आता ऑनलाईन मिळू लागला. या पाटा वरंवटामध्ये आधुनिक स्वयंपाक घराप्रमाणे कॉम्पॅक्ट साईज देखील निर्माण केल्या जाऊ लागल्या. ज्यामुळे लोक पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या काळाकडे वळू लागल्याचं दिसून येत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे
लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या तांब्याच्या भांड्यातून पाणी
लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवण्याचे फायदे