ज्यांचा ज्योतिषशास्त्र , पत्रिका , ग्रहदोष यांवर विश्वास आहे त्यांनी कालसर्प दोषाविषयी बहुतेकवेळा ऐकले असतेच. कालसर्प दोष हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात भयंकर ग्रहयोगांपैकी एक समजला जातो. याला सामान्यतः दोष म्हणतात कारण पत्रिकेतील ही स्थिती बहुतेक अशुभ परिणामांना कारणीभूत ठरते. ‘काल’ या शब्दाचा अर्थ काळ आणि ‘सर्प’ म्हणजे साप होय. वैदिक ज्योतिषशास्त्रात, राहु आणि केतू हे ग्रह नागाच्या मुख व शरीराचे प्रतिनिधित्व करतात. सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि हे सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये स्थित असताना काल सर्प दोष तयार होतो. जेव्हा हे सर्व ग्रह, ज्यामध्ये लग्न, राहु-केतू अक्षात संरेखित होतात, तेव्हा ते कुचकामी ठरतात आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेचा परिणाम देत नाहीत. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग असेल त्यांना आयुष्यात खूप चढ-उतारांचा सामना करावा लागतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.
कालसर्प योग हा मागील जन्मातल्या कर्मांशी संबंधित

ज्योतिषाच्या नाडी शाखेत कालसर्प दोषाचा उल्लेख आलेला आहे. राहू व केतू हे ग्रह आपल्या भूतकाळातील कर्मांशी आणि अपूर्ण इच्छांशी संबंधित आहेत. जेव्हा सर्व ग्रह आणि लग्न त्यांच्या तावडीत असतात, तेव्हा आपले हे जीवन बहुतेक आपल्या मागील जन्माच्या कर्मांचे फळ असते. पत्रिकेत जर कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. या दोषास कारणीभूत असलेल्या ग्रहांच्या अशुभ युतीमुळे व्यक्तींचे जीवन समस्याग्रस्त, दुःखी आणि अस्थिर बनते. म्हणूनच कालसर्प योग हा एक घातक दोष मानला जातो आणि त्याचे परिणाम टाळण्यासाठी लोक जमेल तितके उपाय करू इच्छितात.
ज्याच्या पत्रिकेत हा योग असेल त्या प्रत्येकालाच याचा प्रचंड त्रास होईलच असे नाही. अत्यंत यशस्वी लोकांच्या पत्रिकेतही हा योग दिसून येतो. योगांप्रमाणेच योग भंग देखील अस्तित्वात आहेत. त्यामुळेच पत्रिकेत दोष असूनही काही लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात.
कालसर्प दोषाचे परिणाम
कालसर्प योग हा बहुतेक वेळा अशुभच मानला जातो आणि त्यामुळे लोकांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो असाच समज आहे. या दोषाचे परिणाम नकारात्मक व घातक असले तरी ते प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नसतात. एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीवर हे परिणाम अवलंबून असतात. आणि म्हणूनच या दोषामुळे होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. तरीही या दोषाचे पुढीलप्रमाणे काही परिणाम दिसून येतात-

- महत्वाची कामे किंवा उपक्रम याठिकाणी विलंब होणे
- व्यवसायात तोटा होणे
- व्यवसायवृद्धीत अडथळा येणे
- मानसिक शक्ती कमी होणे
- शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधित समस्या
- कुटुंब आणि मित्रांमध्ये प्रचंड अशांतता आणि गैरसमज होणे
- वैवाहिक जीवन दुःखी व असमाधानी असणे
कालसर्प दोषाचे परिणाम कमी करणारे पत्रिकेतील योग
पत्रिकेत जर पुढील योग असतील तर कालसर्प योगाचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर फार नकारात्मक परिणाम होत नाही.
- राजयोग किंवा इतर काही शक्तिशाली शुभ योगाची उपस्थिती.
- जन्मपत्रिकेत दोन किंवा अधिक राजयोग
- दोन किंवा तीन ग्रह त्यांच्या स्वगृहात किंवा उच्च स्थितीत
- लग्न स्वामी आणि 9व्या व 10व्या घरातील स्वामी उच्चेचे असणे
कालसर्प दोषाचे प्रकार
राहू आणि केतूच्या स्थानानुसार 12 वेगवेगळ्या प्रकारचे कालसर्प योग असू शकतात.
- अनंत कालसर्प दोष
- कुलिक कालसर्प दोष
- वासुकी कालसर्प दोष
- शंखपाल कालसर्प दोष
- पद्म कालसर्प दोष
- महापद्म कालसर्प दोष
- तक्षक कालसर्प दोष
- कर्कोटक कालसर्प दोष
- शंखचूड कालसर्प दोष
- घातक कालसर्प दोष
- विषधर कालसर्प दोष
- शेषनाग कालसर्प दोष
या प्रत्येक प्रकारावर काही ना काही उपाय शास्त्रांत आहे त्यामुळे तुमच्या पत्रिकेत असे योग असतील तरी घाबरून जाऊ नये. विद्वान ज्योतिषतज्ज्ञांकडून यावर सल्ला घ्यावा आणि योग्य ते उपाय करावे.
फोटो क्रेडिट – bhagwanjiphotos
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक