आजकाल मुलामुलींसमोर अनेक समस्या असतात, पण त्यापैकी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे लग्नाची. अर्थात लग्न होणे अथवा लग्नयोग जुळणे हा प्रत्येकाच्या नशीबाचा एक भाग मानला जातो. आजही आपल्याकडे कुंडली पाहूनही लग्न करण्यात येतात. पण ज्या मुलींचे अथवा मुलांचे एकमेकांवर प्रेम असते. त्यांच्यासाठी एक वेगळीच समस्या आजकाल अधिक दिसून येत आहे. ती समस्या म्हणजे नक्की नात्यात पुढे जायचं तरी कसं? कारण प्रेम करताना तर मुलं कधीच विचार करत नाहीत. मग लग्न करताना आई – वडिलांची संमती नाही असं कारण देऊन ब्रेकअप करण्याची काय गरज असते? आपले आई – वडील कसे आहेत हे प्रत्येक मुलाला अथवा मुलीलाही माहीत असतं. त्यामुळे नात्यात येण्यापूर्वी आता आई – वडिलांना हे नातं मान्य असणार की नाही ही गोष्ट आधीच मुलाकडून अथवा मुलींकडून एकमेकांना क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आजकाल लग्नानंतरही अफेअर्स होण्याचे जे प्रमाण वाढले आहे त्याला चाप बसणं कठीण आहे. काय आहेत नक्की या समस्या आपण पाहूया.
नात्याच्या सुरूवातीला केवळ प्रेमात आकंठ बुडणे
नात्याच्या सुरूवातीला सर्वच कपल्सना केवळ प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिसणे. प्रेमापुढे अन्य काहीही सुचत नाही. तसंच आपल्या घरातील वातावरण माहीत असूनही केवळ आपलं प्रेम आहे आणि आपण आपल्या आई-वडिलांची समजून काढू असं सुरूवातीला सर्वांनाच वाटत असतं. पण जसजसं नातं पुढे जातं. तसंतसं एकमेकांना अधिक ओळखू लागतो आणि बऱ्याचदा ब्रेकअप करण्यासाठी आई वडिलांची पसंती नाही अथवा आई – वडिलांचा होकार नाही हे कारण बहुदा पुढे करण्यात येतं. यामुळे नात्यामध्ये अधिक दुरावा आणि कडवटपणा येतो.
आई – वडिलांची संमती महत्त्वाची
आपल्याकडे भारतीय संस्कृतीनुसार नेहमीच आई – वडिलांची संमत अत्यंत महत्त्वाची असते आणि असायलाही हवी. जे आई – वडील आपल्याला लहानपणापासून मोठं करतात, आयुष्यात महत्त्वाचं पाऊल टाकताना आई – वडिलांच्या संमतीसह त्यांचा आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा असतो. पण मग जर आई – वडिलांच्या संमतीशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही हे प्रत्येक मुलामुलींना माहीत असतं तर मग एखाद्या मुलाला अथवा मुलीला आशेवर ठेऊन त्यांचं आयुष्य पणाला लावलं जातं असं नाही का वाटत? मग हे करण्यापेक्षा प्रेमात पुढे जाण्यापूर्वीच आपल्या आई – वडिलांच्या पसंतीचा अंदाज लक्षात घेऊन पुढचं पाऊल टाकावं हा एकच पर्याय इथे आहे.
फसवणूक करू नये
खरंच नात्यात पुढे जायचं असेल तर आई – वडिलांचं नाव न देता पुढे जावं. आपल्या आई-वडिलांना आपण समोरच्या व्यक्तीपेक्षा अधिक ओळखत असतो. त्यामुळे समोरच्या मुलीला अथवा मुलाला न फसवणं अधिक गरजेचे आहे. केवळ प्रेम आहे या नावाखाली कधीही कोणाची फसवणूक करणं योग्य नाही. कारण कर्माची फळं इथेच मिळतात असं म्हटलं जातं आणि ते खरंदेखील आहे. खरं तर प्रेमात फसवणूक ही कधीच योग्य नाही. पण अनेकांना हे कधीच कळत नाही आणि नातं फार पुढपर्यंत जाऊन नंतर नात्यात अधिक त्रास होतो. त्यामुळे आई – वडिलांची संमती ही समस्या तुम्हाला आधीपासूनच लक्षात ठेवायला हवी. अन्यथा नंतर प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी समजून घेणं आयुष्यात कठीण होऊन बसतं.
आजकाल अनेक ठिकाणी मुलामुलींमधील या चर्चा ऐकू येत असतात. लग्न एकमेकांशी करायचं असतं. पण मग गाडी अडते ती एका ठराविक वर्षांच्या नात्यानंतरही आई – वडिलांची संमती नाही यावर. मग असं असताना सुरूवातीपासूनच एकमेकांना विश्वासात घेऊन नात्यात पुढे जाणं योग्य आहे आणि हाच यावरील एकमेव तोडगा आहे. तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर नक्की कळवा.