2020 मध्ये अचानक आलेल्या सर्वांना कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अनेक लोकांचे नुकसान झाले. या परिस्थितीचा फटका सर्व सामान्याप्रमाणेच मनोरंजन विश्वालाही बसला. अचानक झालेलं लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला आर्थिक मंदीच्या झळा सोसाव्या लागल्या. ज्यामुळे काही निर्मात्यांना सुपरहिट असलेली त्यांची मालिका अचानक बंद करावी लागली होती. यासाठीच जाणून घेऊ या 2020 मध्ये कोणत्या हिंदी मालिका अचानक बंद झाल्या.
नागिन 4 –
एकता कपूरच्या नागिन या मालिकेची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. आता पर्यंत या मालिकेचे अनेक सीझन प्रसारित झाले आहेत. 2020 मध्ये या मालिकेचा चौथा सीझन खूप लोकप्रिय झाला होता. या सीझनमध्ये निया शर्मा, रश्मि देसाई आणि विजयेंद्र कुमार मुख्य भूमिकेत होते.मात्र अचानक आलेल्या लॉकडाऊनमुळे या मालिकेचे प्रसारण थांबवण्यात आले होते. पुढे सर्व काही सुरळीत सुरू झाल्यावर या मालिकेचे शेवटचे काही भाग शूट करून चौथा सीझन संपवण्यात आला. त्यानंतर या मालिकेची लोकप्रियता पाहता पुन्हा पाचव्या सीझनला सुरूवात करण्यात आली.
बेहद 2 –
नागिण प्रमाणेच बेहदच्या सीझनचेही अनेक चाहते आहेत. या मालिकेच्या 2 सीझनमध्ये जेनिफर विंगेट आणि कुशल टंडन मुख्य भूमिकेत होते. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाचा फटका या मालिकेलाही पडला. आर्थिक मंदीमुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही ती बंद करावी लागली.
मेरे डॅड की दुल्हन –
श्वेता तिवारी आणि वरूण बडोला यांच्या मुख्य भूमिका असलेली मेरे डॅड की दुल्हन ही मालिका मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जोरदार प्रमोशन करत सुरू झाली होती. मात्र या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेला बंद करण्यामागे आर्थिक मंदीचे कारण नसून या मालिकेचे कथानक पूर्ण झाले असल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण निर्मात्यांनी पुढे केले.
पटियाला बेब्स –
2018 मध्ये सुरू झालेली पटियाला बेब्स मालिका 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे अचानक बंद झाली होती. या मालिकेत अशनूर कौर, परिधी शर्मा आणि अनिरूद्ध दवे यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर आर्थिक संकट आले आणि त्या काळात ही मालिका बंद करण्यात आली.
कसौटी जिंदगी की 2 –
कसौटी जिंदगी कीच्या पहिल्या सीझनप्रमाणेच या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळत होता. ही मालिका 2020 मध्येच सुरू झाली आणि या वर्षीच ती बंददेखील झाली. खरंतर मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती मात्र अचानक मालिकेची निर्माती एकता कपूरने ती बंद करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याचं कारण या मालिकेतील मुख्य पात्रापैकी पार्थ समाथानला ही मालिका सोडायची होती. मात्र त्याआधीच एकताने मालिकाच बंद केली.
जग जननी मॉं वैष्णवी देवी –
या वर्षी ही एक लोकप्रिय मालिका बंद करण्यात आली. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही मालिका सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये पूजा बॅनर्जी मुख्य भूमिकेत होती. मात्र पूजा गरोदर असल्यामुळे तिच्या जागी परिधी शर्माला घेण्यात आलं. मुख्य पात्र बदण्याचा परिणाम मालिकेच्या लोकप्रियतेवर झाला. ज्यामुळे ही मालिका बंद करावी लागली.
याप्रमाणेच ये जादू है जिन्न का, कार्तिक पूर्णिमा, नजर 2 या काही आणखी मालिका आहेत ज्या यावर्षी बंद करण्यात आल्या. यापैकी काही मालिकांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा फटका बसला तर काहींचा टीआरपी कमी झाल्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण काही असलं तरी त्यामुळे चाहत्यांना या मालिका आता पुन्हा पाहता येणार नाहीत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन