चमकदार आणि तरूण त्वचेसाठी महिला नेहमी स्किन केअर रूटीनचा वापर करतात. पण प्रत्येक महिलांचा स्किन टाईप हा वेगवेगळा असतो. महिला आपल्या स्किन टाईपनुसार, सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. पण संवेदनशील त्वचेच्या महिलांना कोणतेही उत्पादन पटकन वापरता येत नाही. कारण संवेदनशील सत्वचेवर कोणत्याही उत्पादनाचा वापर केल्यास, जळजळ, त्वचेवर लालिमा येणे अथवा अंगाला खाज सुटणे अशा समस्या होताना दिसतात. इतकंच नाही तर कधीतरी जुनी उत्पादनेही संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिलांना त्रासदायक ठरतात. संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असणाऱ्या महिलांना परफेक्ट स्किन केअर रूटीन नसेल तर चेहऱ्यावरील चमक कमी होते. या त्वचेसाठी परफेक्ट स्किन केअर रूटीन सेट करणे तसे तर कठीण आहे. कधीतरी काळजी घेऊनही चेहऱ्यावर जळजळ आणि रॅशेस होतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिलांना आपल्या चेहऱ्यावर काहीही उत्पादन वापरण्यासाठी त्रासदायक ठरते. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? संवेदनशील त्वचेवर नेमकी जळजळ का होते अथवा त्वचा लालसर का होते? तुम्ही नक्की अशा काय चुका करते ज्यामुळे तुम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागते हे आपण जाणून घेऊया.
संवेदनशील त्वचा नक्की कशी असते?
बऱ्याच जणांना आपल्या त्वचेबाबत माहिती नसते. आपली त्वचा नक्की कोणत्या पद्धतीची आहे हेच अनेकांना माहीत नसते. बऱ्याच महिला या आपल्या स्किन टाईपच्या माहितीशिवाय स्किन केअर उत्पादनांचा वापर करतात. कोणतेही सौंदर्य उत्पादन अथवा स्किन केअर रूटीन फॉलो करण्याआधी तुम्हाला तुमची त्वचा नक्की कोणत्या पद्धतीची आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर कोणत्याही उत्पादनाचा वापर केल्यानंतर त्वरीत लालसर होते. तसंच त्वचेवर लाल चकते दिसून येतात. तसंच संवेदनशील त्वचा ही अत्यंत कोरडी आणि ओढलेली दिसून येते. अशा त्वचेसाठी कधीही अल्कोहोलमुक्त उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
चुकीच्या पद्धतीने स्क्रब करणे
त्वचेची काळजी घेण्यासाठी स्क्रब करणे अत्यंत गरजेचे आहे. पण चुकीच्या पद्धतीने आणि गरजेपेक्षा अधिक स्क्रब केल्याने त्वचा खराब होते. तुम्हाला चांगली त्वचा राहायला हवी असेल तर स्क्रब हाताने करायला हवे. बऱ्याचदा महिला त्वचेवर स्क्रब जोरात करतात. त्यामुळे त्वचा फाटते. तसंच आठवड्यातून 4-5 वेळा स्क्रब केल्यास, मुरूमं येऊ शकतात अथवा ब्रेकआऊट होऊ शकतात. हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी तुम्हाला आठवड्यातून केवळ एकदाच स्क्रब करायला हवे. संवेदनशील त्वचेवर माईल्ड उत्पादनांचा वापर करायला हवा हे लक्षात ठेवा.
केमिकल आणि सुगंधी उत्पादनांचा उपयोग
संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिला या कळत नकळत केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर सुगंधी परफ्युम, अल्कोहोल आणि रंग अथवा केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापासून दूर राहा अन्यथा त्वचेचा कोरडेपणा वाढतो आणि एक्झिमासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. संवेदनशील त्वचेसाठी नेहमी केमिकलमुक्त उत्पादनांचा वापर करावा लागतो. अन्यथा जळजळ होणे साहजिक आहे.
चुकीच्या सनस्क्रिनचा वापर
सनस्क्रिन त्वचेसाठी योग्य आहे यामध्ये काहीच शंका नाही. मात्र जेव्हा संवेदनशील त्वचा असते तेव्हा तुम्ही सनस्क्रिन चेहऱ्याला लावणे शक्य नाही. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना माईल्ड सनस्क्रिन (Mild Sunscreen) वापरायला लागते. यामध्ये जिंक ऑक्साईड आणि टायटेनियम डायऑक्साईड असते, त्यामुळे त्वचेची जळजळ होत नाही. अन्यथा त्वचेची जळजळ होते. त्यामुळे तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रिनचा वापर करावा.
अँटिएजिंग सीरमचा वापर
सध्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सीरमचा अधिक प्रमाणात वापर करण्यात येत असलेला दिसून येतो. अँटिएजिंग फेस सीरममध्ये रेटिनॉलचा वापर करण्यात येतो. रेटिनॉल हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. मात्र, संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी नाही याची तुम्ही काळजी घ्या. रेटिनॉलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने संवेदनशील त्वचा कोरडी होती आणि त्वचेची अलर्जी येते. तसंच त्वचा निघूही शकते. त्यामुळे कोणत्याही अशा उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ला न घेता वापर केल्यास, त्वचेची जळजळ होतेच.
संवेदनशील त्वचेसाठी योग्य स्किन केअर रूटीन
संवेदनशील त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सोप फ्री फेस वॉश (Soap Free Face Wash) आणि अल्कोहोलमुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर करायला हवा. तसंच त्वचा तुम्ही हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दिवसातून किमान 8-9 ग्लास पाणी प्यावे. चेहऱ्यावर नैसर्गिक उत्पादनांचा जसा कोरफड जेल आणि काकडीचा वापर करावा. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने पीएच संतुलन चांगले राहाते. संवेदनशील त्वचा कोरडी असते त्यामुळे लाईटवेट मॉईस्चराईजरचा वापर करावा. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत मिळते. तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी टोनर वापरायचा असेल तर त्यासाठी अल्कोहोलमुक्त टोनर वापरावा. यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते.