महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जगभरात ‘महिला दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वास्तविक आज महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने करियर घडवत विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलं आहे. पण तरिही आजही कितीतरी महिलांच्या जीवनात नैराश्य घर करून आहे. नैराश्याच्या आहारी जावून दरवर्षी कितीतरी स्त्रीया आत्महत्येला बळी पडतात. मात्र आपलं जीवन हे अनमोल आहे. यासाठीच या महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला जीवन आनंदाने जगण्याचा फंडा सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
खरंतर पुरूष असो वा महिला प्रत्येकाने आपले जीवन आनंदानेच जगायला हवे. तुमच्याकडे जरी भरपूर धनदौलत, नावनौलिक, यश असेल पण जर तुम्हाला मानसिक स्वास्थ नसेल या सुखवस्तूंचा जीवनात काहीच उपयोग होत नाही. जगात आजही अनेक जणी दुःख, चिंता काळजी करत आपलं जीवन जगत असतात. जर तुमचे मन प्रसन्न नसेल तर हळूहळू या गोष्टीचा विपरित परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होऊ लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा मानसिक स्वास्थ हे जीवनात फार महत्त्वाचं आहे. जगात कितीही पैसे खर्च केले तरी मनःशांती विकत घेता येत नाही. जीवन ही एक अमुल्य गोष्ट निसर्गाने आपल्याला सहज दिलेली आहे. या जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगणं हा आपला हक्क आहे. त्यामुळे आपले जीवन हे आनंदाने जगण्यासाठीच आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जीवनातील प्रत्येक क्षण फार महत्वाचा आणि अमुल्य आहे. आपण मात्र हे जीवन विनाकारण चिंता काळजी करण्यात व्यर्थ घालवत असतो.
विशेषतः महिलांना विनाकारण चिंता, काळजी करण्याची फारच सवय असते. या चिंता काळजीचा त्यांच्या मनावर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम होत जातो. मन प्रसन्न नसेल तर आत्मविश्वासही आपोआप कमी होऊ लागतो. शिवाय कुटूंब आणि इतरांची काळजी घेता घेता महिला स्वतःच्या आनंदाकडे नकळत दुर्लक्ष करू लागतात. काही दिवसांनी जेव्हा त्यांना याची जाणिव होते तेव्हा त्यांचे मन निराश होऊ लागते. कुटूंबातील प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही किंवा सतत दुर्लक्षपणाची भावना त्यांच्या मनात घर करू लागते. खरंतर महिलांकडे अनेक कौशल्य असतात, विविध कलागुण असतात. मात्र इतरांची काळजी करता करता त्यांना त्यांच्या छंद आणि कलांकडे लक्षच देता येत नाही. मनासारखं जगता न आल्याने त्यांच्या जीवनात नैराश्य, निद्रानाशासारख्या मानसिक समस्या निर्माण होऊ लागतात. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे याचे गंभीर परिणामदेखील भोगावे लागू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही हेच सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत. जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून तुम्ही सहज आनंदी आणि समाधानी राहू शकता. यासाठी स्वतःमधील कौशल्ये आणि क्षमतांना ओळखा आणि अगदी काही छोट्या – छोट्या गोष्टी करून आनंदी राहायला शिका.
आनंदाने आणि सन्मानाने जगायचे असेल तर या दहा गोष्टी जरूर करा.
1. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
आजारपणांमुळे जीवन हैराण होऊन जातं. आजकाल आयुष्य ऐवढं जलद झालं आहे की त्यासोबत धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवयच अनेकजणींना लागली आहे. शिवाय आरोग्याचा विषय आला की महिला प्रथम प्राधान्य आपल्या कुटूंबालाच देतात. नवरा, मुलं, आई – वडील आणि सासु -सासरे यांची तर तुम्ही काळजी घेताच पण त्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेदेखील मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण जर तुम्ही निरोगी आणि प्रसन्न असाल तरच तुम्ही तुमच्या कुटूंबाची नीट काळजी घेऊ शकता. यासाठी नियमित व्यायाम, योगासने, मेडीटेशन यासाठी वेळ द्या. वर्षातून एकदा स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्या. आजारी पडल्यावर ते आजारपण अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांकडे जा. असं म्हणतात आरोग्य हिच खरी धनसंपत्ती आहे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुमचे मन आपोआप आनंदी राहील. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा ‘हे’ थोडेसे बदल करा
2. आत्मसंरक्षणाचे शिक्षण घ्या
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाययोजना इतरांनी नाही तर महिलांनी स्वतःच करण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्री ज्याप्रमाणे शिक्षि्त असणं गरजेचं आहे अगदी त्याचप्रमाणे आत्मसंरक्षणाचे शिक्षणही तिला मिळायलाच हवं. यासाठी आत्मसुरक्षेचे धडे देणाऱ्या एखाद्या प्रशिक्षण शिबीरात सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची हिंमत तुम्हाला मिळेल. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही नेहमीच आनंदी राहाल.
3. स्वत:मधील कलागुणांना ओळखा
घर आणि संसार सांभाळता सांभाळता महिला स्वतःच्या ईच्छा आकांक्षांना अक्षरशः दाबून टाकतात. खरंतर हे मुळीच चांगलं नाही कारण यामुळे त्या नेहमी मनातून दुःखी राहतात. आनंदी जीवन जगण्यासाठी तुमच्यातील कौशल्य ओळखून त्याला योग्य आकार द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जीवनातील खरा आनंद उपभोगता येईल. शिवाय तुमचे कलागुण भविष्यात तुमच्या क्षमता ठरू शकतात. एखाद्या कौशल्यामुळे तुम्हाला
4. स्वयंपाकात तरबेज व्हा
स्वयंपाक करणं ही एक कला आहे. स्वादिष्ट स्वयंपाकाने कोणाचंही मन जिंकता येऊ शकतं. जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःसाठी आणि इतरांसाठी उत्तम स्वयंपाक करता येणं गरजेचं आहे. कधी कधी मूड खराब असेल तर एखादा आवडता पदार्थ करून खाण्याने तुम्ही आनंदी होऊ शकता.
5.आर्थिक गोष्टींमध्ये लक्ष द्या
आजही अनेक कुटूंबांमध्ये आर्थिक व्यवहार पुरुषच बघतात. पण जर तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुमचे आर्थिक निर्णय तुम्हाला स्वतःच घेता यायला हवे.यासाठी आर्थिक नियोजनाचे योग्य प्रशिक्षण घ्या. शिवाय घरातील आर्थिक व्यवहारामध्येही यामुळे तुम्हाला तुमचं मत मांडता येऊ शकतं. आर्थिक समस्या नसतील तर तुम्ही नक्कीच जीवनात आनंदी राहू शकता. जेव्हा तुमच्या मनात जगण्यासाठी पुरेसा पैसा आहे ही भावना असते तेव्हा तुम्ही मनातून समाधानी आणि आनंदी राहता. यासाठी श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत
6. एकटीने प्रवास करा
प्रवास सर्वांनाच आवडत असतो. मात्र महिला बऱ्याचदा एकटीने प्रवास करण्यास तयार नसतात. प्रवासासाठी त्या नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात. त्यामुळे जेव्हा एकटीने प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा त्या निराश होतात. आनंदी राहण्यासाठी आणि प्रवासातील खरा आनंद लुटण्यासाठी एकटीने प्रवास करायला शिका. एकटीने प्रवास करता आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही समाधानी राहू लागाल.
7. देशात घडणाऱ्या घडामोडीची माहिती मिळवा
दररोज वर्तमानपत्र अथवा इतर माध्यमांमधून जगाविषयी ज्ञान मिळवा. जर तुम्हाला देशात चालणाऱ्या घडामोडी माहित असतील तर कोणत्याही चर्चेमध्ये तुम्हाला सहज सहभागी होता येऊ शकतं. तुमचं मत तुम्हाला परखडपणे मांडता आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. लोक तुमच्या मतांचा सन्मान करू लागतात. ज्ञानाच्या प्रकाशामुळे तुमचं जीवन उजळून निघतं. इतरांकडून होणारी प्रशंसा आणि सन्मानामुळे तुम्ही नक्कीच खूश राहता.
8. नम्र आणि शांतपणे संवाद साधा
तुम्ही कसे बोलता, कसे वागता यावरून लोक तुम्हाला प्रतिसाद देत असतात. जर तुम्ही इतरांशी शांतपणे आणि नम्रपणे संवाद साधला तर तेही तुम्हाला तशाच पद्धतीने प्रतिसाद देतात.जेव्हा जीवनात मतभिन्नता असूनही मतभेद नसतात तेव्हा तुम्ही नक्कीच आनंदी असता. त्यामुळे आरडा- ओरड करून मन निराश करण्यापेक्षा नम्र आणि विनयशील राहून स्वतःचा सन्मान वाढवा.
9. भल्या-बुऱ्या गोष्टींना ओळखा
महिला फारच भावनाप्रधान असतात.प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहतात. यापुढे भावनिक न होता एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहायला शिका.ज्यामुळे तुम्हाला चांगल्या – वाईट गोष्टींची समज येईल. भावनिक होऊन घेतलेले निर्णय नंतर महागात पडू शकतात. त्याऐवजी प्रसंगी कठीण होऊन घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही भविष्यात आनंदी राहू शकाल. शिवाय तडकाफडकी कोणत्याही निकर्षापर्यंत जाण्यापेक्षा आधी नीट तपासून मग त्याबाबत निर्णय घेणे नेहमीच चांगले.
10. नाही म्हणायला शिका
प्रत्येकाला खूश करण्याच्या नादात कधीकधी तुम्ही स्वतःवरच अन्याय करत असता. मला कोणाला नाही म्हणता येत नाही असंं म्हणत इतरांना हवं तसं वागत राहता. पण तुमच्या या स्वभावामुळे नकळत तुम्ही दुःखी आणि निराश होता. त्यामुळे वेळीच नाही म्हणायला शिका ज्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही.
आम्ही तुम्हाला जीवनात आनंदी राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचा तुम्हाला जीवन जगताना नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. या दहा गोष्टी फॉलो करा करा आणि जीवनाचा खरा आनंद लुटा.
अधिक वाचाः
तुमच्या आयुष्यातील तणावा (Stress )ला करा बाय-बाय
फोटोसौजन्य – इन्साग्राम