'रेडू' नंतर आता सागर वंजारीचा 'रापण', पहिले पोस्टर आले समोर

'रेडू' नंतर आता सागर वंजारीचा 'रापण', पहिले पोस्टर आले समोर

‘रेडू’ या पहिल्याच चित्रपटातून समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक सागर वंजारीनं नववर्षाच्या मुहुर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली. रापण असं या चित्रपटाचं नाव असून, सागरनं १ जानेवारीला सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच केलं आहे. या पहिल्या पोस्टरमुळे अर्थातच रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली नाही तर नवल. सागर वंजारीचा पहिला चित्रपटदेखील प्रेक्षकांना खूपच भावला होता. त्यामुळे आता या थोड्याशा हटके असं टायटल असलेल्या चित्रपटामध्ये नक्की काय पाहायला मिळणार याची नक्कीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये समुद्राचं जाळं असलेली एक होडी दिसत आहे आणि मग रापण हे नाव दिसत आहे. निसर्ग आवडत असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक माणसाला हा फोटो त्यातील रंगामुळे नक्कीच भावेल. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं लेखन केल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे.


‘रेडू’ला अनेक पुरस्कार प्राप्त


रेडू या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये मानसन्मान प्राप्त झाले होते. सागरला प्रतिष्ठेच्या अरविंदन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्वाभाविकच सागरच्या नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचेही लक्ष लागून राहिलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मराठी चित्रपटासृष्टीत नेहमीच वेगळं कथानक आणि वेगळे विषय हाताळले जातात आणि ‘रेडू’ हादेखील त्यातलाच एक चित्रपट होता. त्यामुळे आता ‘रापण’ या हटके टायटलच्या चित्रपटामध्ये नक्की काय आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे. रापणच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडला जाणार आहे,' असं सागरनं सांगितलं. असं असलं तरीही यामध्ये नक्की विषय काय आहे आणि यामध्ये कोणते कलाकार असणार आहेत याची कोणतीही माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. आजकाल मराठीमध्ये अनेक नवे कलाकार आणि उत्तम कलाकार येत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये नक्की कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. नागराज मंजुळेसारखे दिग्दर्शक नवनवीन कलाकार घेऊन चित्रपट काढून तो हिट करत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये नावाजलेले कलाकार असतील की, कोणते नवे कलाकार या विषयाला न्याय देऊ शकतील हादेखील एक प्रश्न प्रेक्षक म्हणून उभा राहत आहे. लवकरच याची उत्तरं मिळतील.


redu FI
‘रेडू’मुळे ‘रापण’कडून अधिक अपेक्षा


‘रेडू’ या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय उत्सवांमध्ये आपलं नाव केलं. अर्थात या चित्रपटाची खूपच चर्चा झाली आणि समीक्षकांनीही या चित्रपटाची स्तुती केली होती. सागर वंजारीचा हा पहिलाच चित्रपट असल्याचं न जाणवता अगदी योग्य मांडणी आणि हाताळणी त्याने या चित्रपटाची केली होती. मालवणी बोलीतील हा पहिलाच चित्रपट होता. तर यामध्ये एकेकाही कोकणी माणसाच्या आयुष्यात रेडिओला असलेल्या महत्त्वाबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्यकथेवर हा चित्रपट बनवण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता त्याचा नवा चित्रपट ‘रापण’कडून अधिक अपेक्षा निर्माण झाल्य आहेत असं म्हणायला हवं. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग केले जात असून ते यशस्वीदेखील होत आहेत. त्यापैकीच एक ‘रापण’ हा चित्रपट असणार का? अशीही चर्चा आता होत आहे.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम