वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच

वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच

तूळ (Libra) राशीचे लोक म्हणजे समजूतदार लोक 2019  या नववर्षामध्ये अधिक समजूतदार होणार आहेत. कारण तूळ राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभाचं ठरणार आहे. फक्त जून ते ऑगस्ट या कालखंडामध्ये आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. बाकी संपूर्ण वर्ष तूळ राशीसाठी लाभाचंच ठरणार आहे. मधल्या कालखंडात काळजी का घ्यावी लागणार आहे आणि इतर कालखंडात तूळ राशीचं ग्रहमान कसं असणार आहे, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.


सर्वात आधी आपण तुळ राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊया.


आधी सांगितल्याप्रमाणे या राशीचे लोक हे अत्यंत समजूतदार असतात. हातात तराजु घेतलेला पुरुष हे तूळ राशीचं प्रतिक आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्ट तोलून-मापून करणं हा या राशीच्या लोकांचा स्वाभाविक गुण ठरतो. ही वायुतत्त्वाची राशी आहे. सदैव प्रसन्नता, मधुर बोलणे, वागणे यामुळे हे लोक प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी समोरच्याला जिंकून घेतात. या राशीच्या लोकांचं अजून एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोकांचा वावर खूप सा-या क्षेत्रांमध्ये असतो. त्यांना विविध क्षेत्रांमध्ये रस असतो. फक्त रसच नाहीतर विविध क्षेत्रांमधील ज्ञान या लोकांकडे असते. जीवनामध्ये कला, काव्य, नाटक, आध्यात्मिकता यांचा सुरेख संगम हे लोक साधत असतात. त्यामुळे तूळ राशीचे लोक उत्तम श्रावण, दर्शक, श्रोता आणि ग्रहण करणारेही असतात. समोरच्या वक्तीला अगदी उत्तम पद्धतीने समजून घेण्याची कला या राशीच्या लोकांना अवगत असते. आपली मर्यादा न सोडता ते प्रत्येक गोष्टीचा समतोल साधत असतात. म्हणूनच ते इतर राशींच्या लोकांच्या तुलनेत अधिक समजूतदार ठरत असतात.


हेही वाचा वार्षिक भविष्य 2019 : मेष रास


2019 हे वर्ष लाभाचं


2019 हे नववर्ष तूळ राशीसाठी लाभाचं ठरणार आहे. कारण ग्रहांची शानदार बैठक या राशीसाठी वर्षभर असणार आहे. त्रिक  स्थानात पापग्रह शुभ फळ देत असतात. शनि तृतीयात, मंगळ षष्टात यांच्या जोडीला दशमातून राहू तुळ राशीच्या लोकांना कर्मप्रधान बनवित आहे. सोबतच धनस्थानात गुरु आणि शुक्र यांचा शंखयोग आणि राहू - गुरु यांचा नवपचंम योग आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. थोडक्यात 2019 या नववर्षाच्या सुरुवातीलाच सर्व ग्रहाचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. फक्त काही कालखंड वगळता सर्व ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असेच आहेत. तेच तुमच्या कर्माची दिशा आणि तुमचं भाग्य ठरवणार आहेत.


हेही वाचा वार्षिक भविष्य 2019 : वृषभ रास


प्रगतीसाठी अनूकुल शुभयोग


तूळ लग्नाचे भाग्य ठरवणारे ग्रह म्हणजे शनि, बुध आणि शुक्र होय. तर कर्माचे कारक शनि, शुक्र, चंद्र आणि मंगळ होय. सर्व ग्रह आपल्यासाठी प्रगतीचा अनुकूल असे शुभयोग घेऊन येणार आहेत. तूळ राशीच्या लग्नाचे राजयोगकारक शनि महाराज तृतीय स्थानात वर्षभर राहणार आहेत. त्रिक स्थानातील पापग्रह शुभफळ देत असतात. त्यास अनुसरुन शनि महाराजांची कृपादृष्टी आप­ल्यावर वर्षभर निरंतर राहणार आहेत. शनि महाराजांच्या या कृपेमुळे व्यवसाय, नोकरी, पदोन्नती, आर्थिक लाभ या सर्वच दृष्टीने 2019 हे नववर्ष तूळ राशीसाठी लाभदायक असणार आहे. दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च 2019 या कालखंडात मंगळ तुमच्या सप्तमात राहणार आहे. मंगळ हा व्यापार स्थानाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय यांना या काळामध्ये नवी दिशा मिळू शकते. सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी या ग्रहयोगाचा योग्य तो लाभ करुन घ्यायला हवा. दि. १५ एप्रिल २०१९ ला तुमचा राशीस्वामी मीन राशीत उच्चीचा होतोय आणि याच दिवसापासून ते दि.15 मे 2019 पर्यंत सर्व प्रकारचे लाभ देणारा तुमचा लाभेष ग्रह रवि उच्चीचा होतोय. ग्रहांची ही बैठक व्यापार, नोकरी, व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रामध्ये फार मोठा लाभ देणारी आहे.


वार्षिक भविष्य 2019 : मिथुन रास


काळजी घ्या बेसावध राहू नका


दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात तुमच्या व्यवसायाचा व जोडीदाराचा स्वामी मंगळ दशमात निचीचा होतोय. हाच तो कालखंड ज्यामध्ये तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. थोडी सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण या कालखंडात व्यापारात नुकसान, पैसे फसणे, चुकीचे निर्णय घेतले जाणे, जोडीदाराशी वादविवाद अशा अनर्थ घडवणा-या सर्वच घटना घडण्याचे योग आहेत. काळजी घ्या, बेसावध राहू नका. दि. 9 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2019 या कालखंडात तुमचा राशीस्वामी व्ययात निचीचा होतोय. ज्यामुळे अतिरिक्त कारणांवर खर्च, घरासह ऑफिसमध्येही वादविवाद, छान-छौकीत राहणे, प्रवासावर भरमसाट खर्च, परदेशी जाण्याची संधी आदी गोष्टी घडण्याचे योग जुळून येत आहेत. आता यातील आपल्यासाठी फायद्याचे काय व तोट्याचे काय? हे आपल्याला ठरविता येणे गरजेचे आहे. ते ठरविता आले म्हणजे या कालखंडाचाही योग्य तो लाभ आपण मिळवू शकता.


वार्षिक भविष्य 2019 : कर्क रास


विदेशात जाण्याची संधी


दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी होणारा गुरुबदल हा तुमच्या पराक्रमात वाढ करणारा आहे. गुरु महाराजांची ही कृपादृष्टी आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कारण गुरु महारांची ही कृपा आपल्याला देशात आणि विदेशात भ्रमणाची संधी तर देतच आहे, सोबतच इतरही लाभ संभवू शकतात. फक्त तुम्ही काय पदरात पाडून घेता, ते तुमच्यावरच अवलंबून आहे.


वार्षिक भविष्य 2019 : सिंह रास


थोडक्यात जून ते ऑगस्ट फक्त या कालखंडात थोडी काळजी घेतली, थोडी सावधानता बाळगून संवाद व्यवस्थित ठेवल्यास  2019 हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभ देणारेच ठरणार आहे.


आयुष्यात संधी नेहमी मिळत असतात. काही वेळेला भाग्याची साथ नसेल तर पात्रता असूनही फळ मिळत नाही. मात्र हे नववर्ष आपल्यासाठी संधी व भाग्याची साथ असं दोघं घेऊन आलेला आहे. आता त्याचा तुम्ही किती लाभ घेता, हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे.


शुभं भवतू|


लेखिकेचा संपर्क : श्री ज्योतिष संशोधन केंद्र