वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी : गतवर्षाचा आनंद नववर्षात अधिक द्विगुणीत होईल

वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी : गतवर्षाचा आनंद नववर्षात अधिक द्विगुणीत होईल

राशीचक्रातील दुसरी राशी म्हणजे वृषभ राशी होय. मूळ समाधानी प्रवृत्तीच्या या राशीचं हे नववर्षही समाधानाने भरलेलंच असणार आहे. तरीही काही प्रसंगी इच्छाशक्तीचा वापर करुन काही गोष्टींवर नियंत्रणही मिळवायचं आहे. जेणेकरुन तुमचे समाधान भंग होणार नाही. चला तर जाणून घेऊया 2019 हे नववर्ष वृषभ राशीसाठी कसे असणार आहे.


वृषभ राशीचा स्वभावविशेष


2018 या वर्षाला निरोप देत असतांना तुम्ही नक्कीच आनंदात असाल. कारण 2018 मध्ये कर्केचा मानसिक अस्वस्थता देणारा राहू, शत्रू राशीतील शनि आणि बृहस्पती असे एकंदरीतच तुमच्या लग्नेशाचे मित्र असणारे ग्रह शत्रूराशीतून प्रवास करीत होते. वृषभ राशीचं प्रतिक बैल असून शुक्राच्या अधिपत्याखाली येणारी ही राशी आहे. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीचे लोक प्रेम आणि सौंदर्याचे भक्त असतात. रसिकता हा मुख्य गुण त्यांच्या अंगी असतो. एक प्रकारचा कलात्मक दृष्टीकोन त्यांना प्राप्त असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा मनमुरादपणे आनंद लुटतात. रसिकता अंगी असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव शांत आणि स्थिर असतो. त्यामुळेच ते समाधानी वृत्तीचेही असतात. या स्वभावामुळेच त्यांच्या अंगी व्यवहार कुशलता आणि चिकाटी बाणावलेली असते. याच बळावर ते कमीतकमी श्रमात जास्तीतजास्त मोबदला मिळवण्यात पटाईत असतात. शांत आणि स्थिर स्वभावामुळे कुठल्याही समस्येवर उपायही हे लोक चांगल्या प्रकारे शोधू शकतात. जिथेही जातील तेथील वातावरणावर वृषभ राशीचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. या राशीमध्ये लालसा, आपलेच म्हणणे रेटण्याची वृत्ती, आळशीपणा आदी दुर्गुणही दिसतात. या दुर्गुणांमुळे श्रमिक बैलाचं प्रतिक असूनही अधिक श्रमाची कामे करण्याची या लोकांची मानसिकता नसते. रसिकत्व अंगी असल्यामुळे वृषभ राशीचे लोक वैवाहिक जीवनात फारच रममाण होतात.


हे वर्षही आनंददायी


वृषभ राशीला राजयोगकारक ग्रह म्हणजे शनि महाराज होय. ब्रम्हांडात जेव्हा जेव्हा शनिचे भ्रमण स्वराशीतून, मित्र राशीतून किंवा उच्चराशीतून होत असेल तेव्हा तेव्हा कर्मात वाढ होत असते. कर्मात वाढ होणे म्हणजे फलप्राप्तीकडे मार्गक्रमण करणे होय. अशावेळी भाग्य आपल्या पाठीशी उभे असते. मात्र हेच शनि महाराज जेव्हा शत्रू राशीत असतात, तेव्हा आपल्याला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 2018 मध्ये शनि महाराज धनु राशीमध्ये ठाण मांडून बसलेले होते. त्यामुळेच आनंदीआनंद होता. 2019 या नववर्षातही ते तसेच बसलेले आहेत. त्यामुळे गतवर्षाचा तो आनंद तसाच राहणार आहे. सोबतीला ग्रहांची स्थिती बघून आपण योग्य वेळी योग्य कृती केली तर तो आनंद द्विगुणीतही होऊ शकतो.


परिश्रमात सातत्य ठेवा


शनि महाराजांची फळ देण्याची एक पद्धत आहे. ते अगोदर मनुष्याची परिक्षा घेतात. त्याच्याकडून कठोर परिश्रम करवून घेतात. त्यानंतरच योग्य ते फळ देत असतात. त्यामळे कमी श्रमात जास्त फळ मिळविणारी तुमची राशी असली तरी यावर्षी तुमच्यातल्या गुणांचा सदुपयोग करुन तुम्ही परिश्रमात सातत्य ठेवल्यास शनि महाराज तुम्हाला योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. एक तर अष्टमात शनी आणि त्यात भरीस भर म्हणजे दि. 29 जानेवारी 2019 पासून शुक्राचे आगमन धनुराशीत होणार आहे. धनु राशीत होणारी शुक्र आणि शनिची युती ही आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकेत आहे.


हे महिने ठरणार उत्तम काळ


नववर्षात वृषभ राशीचा सर्वात उत्तम काळ मार्च, एप्रिल, मे हा असणार आहे. ग्रह हे सदैव भ्रमण करीत असतात. दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी शुक्र भाग्यात प्रवेश करीत असल्यामुळे भाग्यवृद्धी होणार आहे. तर दि. 21 मार्च 2019 रोजी शुक्र कर्म स्थानात प्रवेश करणार असल्यामुळे कर्माची दिशा दाखवणार आहे. सोबतच दि. 24 फेब्रुवारी ते 10 मे 2019 या कालखंडात लाभ स्थानात उच्च होत तुमच्यावर लाभाचा वर्षाव होणार आहे. एकंदरीतच ही ग्रह स्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी कृती केल्यास तुम्हाला लाभच लाभ होऊ शकतो.


भरभरून यश मिळणार  


दि. 24 फेब्रुवारी ते 10 मे 2019 या कालखंडात लग्न स्वामीची वृषभ राशीवर विशेष कृपादृष्टी राहणार असल्यामुळे या काळात स्पर्धापरीक्षा, परदेश गमन, व्यापार, नोकरी आदी सर्वच क्षेत्रात तुम्हाला भरभरुन यश मिळू शकतं. दि. 23 मार्च 2019 ला कर्क या जलतत्त्वाच्या राशीतून मिथून या उच्च राशीत राहूचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे नोकरीत परिवर्तन आणि प्रमोशन या दोन्ही गोष्टींचा लाभ एकाचवेळी मिळू शकतो.


शब्दांवर नियंत्रण ठेवा


दि. 22 जून 2019 ला मंगळ कर्कराशीत निचीचा होत आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. चुकूनही तुमच्याकडून कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. नाहीतर भाऊ-बहिणींशी दुरावा, भांडणे, मनस्ताप, चिडचिडेपणा याचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या काळात जितकी शांतता तुम्ही ठेवू शकाल तितकी फायदेशीर ठरेल.


चांगला काळ


दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. त्याची दृष्टी थेट तुमच्या कर्म स्थानावर होत असल्याने कर्मात वाढ होणार आहे. ही चांगली बाब असून नोकरीत प्रमोशन, सरकारी कामात यश देणारा हा कालखंड आहे. दि. 28 ऑक्टोबर 2019 ला वृश्चिकेत तुमच्या सप्तमात होणारी गुरु - बुध - शुक्र युती वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदार या दृष्टीकोनातून शुभ फलदायक आहे. दि. 21 नोव्हेंबर 2019 रोजी गुरु महाराज स्वराशीत म्हणजेच धनुमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरु-शनि हे दोन मातब्बर ग्रह तुमच्या अष्टमात असणार आहेत.


थोडक्यात वृषभ राशीसाठी गतवर्षातला आनंदी अबाधित राहणार आहे. मात्र त्या आनंदाला द्विगुणीत करायचे असेल तर ग्रहांच्या योग्य सहकार्याने तुम्हाला कृती करावी लागेल.शुभं भवतू |


लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र