दरवर्षी होणाऱ्या कान्स फेस्टिव्हलची जास्त चर्चा असते ती इथल्या रेड कार्पेटवर झळकणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या लुक्समुळे. पण यंदा कान्सबाबत जास्त उत्सुकता आहे ती 3 मराठी चित्रपटांमुळे. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसणार आहेत तीन मराठी चित्रपट आणि एक लघुपट, ज्यामध्ये मुक्ता बर्वेचा बंदीशाळा, डॉ. मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे यांचा दीठी, ओमकार शेट्टीचा आरॉन आणि नागराज मंजुळे निर्मित बिबट्या. हे सलग चौथं वर्ष आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारने मराठी सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्लोबल मार्केटचे दरवाजे खुले करून दिले आहेत.
कान्स फिल्म फेस्टीव्हल म्हणजेच कान्स फिल्म मार्केटमध्ये यंदा 40 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. त्यापैकी तीन चित्रपट हे मराठी आहेत. या तिन्ही चित्रपटाचं दोनदा स्क्रीनिंग होणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. एक सिनेमा मराठीतील मातब्बर कलाकार आणि निर्मात्यांचा आहे, एक व्यावसायिक चित्रपट आहे तर अगदीच नवख्या दिग्दर्शकाने केलेला पहिला प्रयत्न आहे.
मुक्ता बर्वेचा बंदीशाळा
मिलिंद लेले यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला बंदिशाळा हा चित्रपट महिलाप्रधान आहे. तसंच हा एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा असून याचं लेखन संजय कृष्णाजी पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कान्ससाठी निवड होण्यासोबत या चित्रपटाला 56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्येही सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन आणि अन्य 6 विभागांमध्ये नामांकन मिळालं आहेत. या चित्रपटाच्या कथेसोबतच आकर्षण आहे ते मुक्ता बर्वे साकारत असलेल्या पोलिसाच्या भूमिकेचं. पहिल्यांदाच मुक्ता अशा वेगळ्या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती तुरूंगात सुधारणा करू पाहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
आगाशे आणि भावेंचा दीठी
दीठी म्हणजे दृष्टी. डी.बी. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित आणि मराठीतील नावाजलेल्या चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे आणि डॉ. मोहन आगाशे यांचा दीठी सिनेमा हा आयुष्याचं चक्र आणि मृत्यू यांच्यावर आधारित आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या भूमिकेत स्वतः मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
शशांक आणि ओमकारचा आरॉन
शशांक केतकर अभिनीत ओमकार शेट्टीचा लेखक-दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. आरॉन ही एका किशोरवयीन मुलाच्या प्रवासाची कथा आहे. जो आपल्या काकांच्या मदतीने कोकण ते पॅरीस असा प्रवास आपल्या आईला शोधण्यासाठी करतो.
नागराज मंजुळेच्या लघुपट बिबट्या ची ही निवड
गार्गी कुलकर्णी दिग्दर्शित लघुपट बिबट्या ची कान्समध्ये निवड झाल्याची पोस्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केली होती. नागराज मंजुळे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. गार्गी या सैराट चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या होत्या.
कान्स हा चित्रपटांचा महोत्सव 13 ते 22 मे चालणार आहे.
हेही वाचा –
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला
2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट