सना खाननंतर आता आशका गोराडियाने घेतला अभिनयातून संन्यास

सना खाननंतर आता आशका गोराडियाने घेतला अभिनयातून संन्यास

काही महिन्यांपूर्वीच सना खानने इस्लाम धर्माचा मार्ग स्वीकारत अभिनयला अलविदा केलं होतं. आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री आशका गोराडियानेही अभिनयातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक काळ असा होता जेव्हा कुसुम, डायन, नागिन, महाराणा प्रताप, बालवीर यासारख्या मालिका आणि नच बलिए आणि बिग बॉस सारख्या शोमधून आशकाने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं होतं. आशका फक्त अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड अंजाज आणि फिटनेससाठीही चर्चेत होती. सोशल मीडियावरही तिचा स्पेशल चाहता वर्ग आहे. मात्र आता अचानक तिने चक्क अभिनयातून रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आहे. आशकाचा हा धक्कादायक निर्णय ऐकून तिचे चाहते मात्र नक्कीच दुखावले आहेत.

आशका का करत आहे अभिनयाला अलविदा

आशका गोराडियाने नुकतंच एका मुलाखतीत हा निर्णय जाहीर केला आहे. ज्यात तीने सांगितलं आहे की, “मी अभिनयापासून दूर जात आहे कारण उद्योग माझ्या रक्तात आहे. अभिनयात संधी योगायोगाने मिळाली आणि माझ्याकडून या संधीचं सोनंही झालं. अभिनयातील दुनियाच मला मेकअपपर्यंत घेऊन गेली. कदाचित त्यामुळेच मला इंडस्ट्रीमध्येही जे करायचं होतं ते करता आलं. माझे पती ब्रॅंटमुळे मला योगाची ओळख झाली. योगाभ्यासामुळे मला जीवनात खरी शांती अनुभवता आली. आता माझा हा प्रवास आणखी एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. मला माझ्या आयुष्यात मिळालेल्या गोष्टींचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला आनंद होते की मी असा मार्ग निवडला तिथे माझी स्वप्न मला सत्यात उतरवता आली. आज मला एक बिझनेसवुमेन म्हणून ओळखलं जात आहे. माझ्या कामाचं कौतुक करण्यासाठी मला पुरस्कार मिळत आहेत. हे सर्व पाहून मला खूप आनंद होत आहे. मी माझ्याा करिअरसाठी सर्वांशी कृतज्ञ आहे. स्ट्रगलशिवाय हे होणं शक्य नव्हतं मात्र यात मला माझ्या पतीची नेहमीच साथ मिळाली. त्याच्या डोळ्यात पाहताना मला जगभरातील प्रेम आणि विश्वासाचा समुद्र दिसू लागतो. त्याच्या विश्वासामुळेच मी आज आयुष्यात पुढे जात आहे. अभिनयापासून मी स्वतःला किती काळ दूर ठेवणार हे आताच सांगता येणार नाही. कारण अजून मी यावर ठाम निर्णय घेतलेला नाही. पुढे भविष्यात जसं जसं घडत जाईल त्यानुसार बघता येईल.” मात्र सध्या तरी तिने हा निर्णय सर्व निर्माते आणि इंडस्ट्रीमधील लोकांना कळवला आहे. त्यामुळे आशकाचा अभिनयप्रवास आता इथेच थांबणार आहे.

आशकाला नव्या करिअरसाठी शुभेच्छा

आशका तिच्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते.  तिचे न्यूड योगा पोझमधले अनेक बोल्ड फोटो आजही व्हायरल होताना दिसतात. तिच्या नवऱ्यामुळे ती योगाच्या प्रेमात पडली. न्यूड योगासाठीही तिचा नवराच तिला नेहमी प्रोत्साहन देताना दिसतो. यावरून ती बऱ्याचदा ट्रोलही झाली होती. मात्र अशा ट्रोलर्सकडे आशका मुळीच लक्ष देत नाही. तिला जे योग्य वाटतं ते ती बिनधास्तपणे करताना दिसते. आता आशका नवऱ्याच्या सपोर्टमुळेच एका नव्या क्षेत्रात प्रगती करत आहे. ज्यामुळे तिला बिझनेसवुमन ही ओळखही मिळाली आहे. अर्थात तिला यासाठी अभिनयाला अलविदा करावा लागत तरी तिची बिझनेसमध्ये खूप प्रगती होवो अशी चाहत्यांची इच्छा आहे.