जेव्हा आजोबांना आले अमिताभजींचे पत्र...

जेव्हा आजोबांना आले अमिताभजींचे पत्र...

प्रत्येकाची कल्पनाशक्ती ही भन्नाट असते. एकदा कल्पना करुन पाहा ना, 'जर तुमच्या आजोबांचे वर्गमित्र हे अमिताभ बच्चन असतील तर...' तर काय? सगळीकडे नुसता आनंदाचा गोंधळ उडेल, कुटुंबातील सदस्यांचे, मित्र परिवारांकडून सतत कुतूहलाचे प्रश्न उपस्थित होतील. ‘तुमच्या मैत्रीचे, शाळेतील किस्से सांगा’, ‘अमिताभजी शाळेत असताना कसे होते’, ‘कसे वागायचे’, ‘नेमके काय बोलायचे’ यांसारखे अनेक शंभर प्रश्न तुमच्या आजोंबाना विचारले जातील. असंच काहीसं घडलंय ‘एबी आणि सीडी’ या सिनेमातील ‘चंद्रकांत देशपांडे’ यांच्या बाबतीत.

आजी-आजोबा आणि नातवंडाचं नातं

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हाताऱ्या व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी ‘एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

'एबी आणि सीडी'चा नवा टीझर

‘एबी आणि सीडी’च्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि ‘आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रं, तसंच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकार, पण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: ‘आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि अमिताभजींच्या दमदार आवाजातील ‘चंदू मी आलोय’ हा डायलॉग’....या सर्व गोष्टी प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात बिलकुल शंका नाही.

अमिताभ यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच ‘अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतूहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर बातच निराळी होऊन जाते. अमिताभजींना ब-याच वर्षांनी मराठी सिनेमात पाहण्याची संधी एबी आणि सीडीच्या निमित्ताने सिनेरसिकांना मिळणार आहे. या आधी बिग बींनी 1994 साली आलेल्या ‘अक्का’ या चित्रपटातील ‘तू जगती अधिपती’ गाण्यात जया बच्चन यांच्यासोबत दिसले होते. त्यानंतर इतक्या वर्षानंतर ते ‘एबी आणि सीडी’ मध्ये दिसणार आहेत.

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आता तुमचीही उत्कंठा खरंच ताणली जातेय ना की, 'येतील का बिग बी उर्फ एबी या सोहळ्याला? अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे उर्फ ‘एबी आणि सीडी’चा याराना बघेल सारा जमाना, 13 मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.