अभिनेता गोविंदाचा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा, पहिलं लग्नही लपवलं होतं

अभिनेता गोविंदाचा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा, पहिलं लग्नही लपवलं होतं

गोविंदा एक असा अभिनेता आहे ज्याने बॉलीवूडमध्ये कायमस्वरूपी आपली एक छाप सोडली आहे. कॉमेडी सिनेमामध्ये गोविंदाचा हात कोणीही धरू शकणार नाही. इतकंच नाही गोविंदाने प्रत्येक स्वरुपाच्या सिनेमामध्ये काम केलं आहे. पण तरीही त्याने 90 च्या दशकात कॉमेडी जॉनरला जो दर्जा आणला तो वेगळ्या उंचावर नेऊन ठेवला. कॉमेडी ही बाब त्यानंतरच निर्मात्यांनीही गंभीरपणाने घेणं सुरु केलं. गोविंदाने नुकतीच एका चॅनेलवर मुलाखत दिली त्यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्यातच त्याने आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दलही खुलासा केला. घाबरू नका. आम्ही तुम्हाला याबद्दल सगळी माहिती देणार आहोत. 

काही वर्षांपूर्वी दुसऱ्या लग्नामुळे आला होता चर्चेत

Instagram

गोविंदा नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला. काही वर्षांपूर्वी पुन्हा एकदा लग्न केल्यामुळेही गोविंदा चर्चेत आला होता. पण त्याने हे लग्न आपलीच बायको सुनीता हिच्याबरोबर 49 व्या वर्षी पुन्हा केलं. यामागे नक्की काय कारण होतं याचाही खुलासा त्याने या मुलाखतीदरम्यान केला. गोविंदाने आपल्या आईच्या इच्छेसाठी पुन्हा एकदा आपली पत्नी सुनीताबरोबर पूर्ण रितीरिवाजांसह पुनर्विवाह केला होता. गोविंदा आपली पत्नी सुनीताला एका पार्टीतून येताना भेटला होता. गाडीतून येताना दोघांचाही हात एकमेकांना टच होत होता. पण दोघांनीही हात मागे घेतला नाही आणि तेव्हापासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली असंही गोविंदाने सांगितलं. गोविंदा आणि सुनीताने 11 मार्च, 1987 मध्ये लग्न केलं. पण त्यावेळी करिअरसाठी गोविंदाला हे लग्न साधारण चार वर्ष लपवून ठेवावं लागलं होतं. त्यामुळे त्याच्या आईची इच्छा होती त्याने पुन्हा धुमधडाक्यात लग्न करावं आणि आईच्या इच्छेसाठी त्याने तसं केलं. गोविंदाने आतापर्यंत आईची कोणतीही इच्छा मोडली नाही. त्यामुळे त्याने तिची हीदेखील इच्छा पूर्ण केली. गोविंदा आणि सुनीता नेहमीच बऱ्याच कार्यक्रमांना आजही एकत्र हजेरी लावताना दिसतात. 

हॉलीवूड सिनेमा ‘अवतार’च्या बाबतीही केला खुलासा

हॉलीवूड सिनेमा ‘अवतार’ हा सर्वात आधी आपल्याला ऑफर करण्यात आला होता आणि आपणच त्याचं नाव सुचवलं असा खुलासा या मुलाखतीदरम्यान गोविंदाने केला आणि त्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरून गोविंदाचे अनेक मीम्सदेखील तयार करण्यात आले आहेत. या सिनेमासाठी 410 दिवस शूटिंगसाठी लागणार होते आणि शिवाय संपूर्ण शरीरावर पेंटिंग करणं गोविंदाला शक्य नसल्याने त्याने या सिनेमाला नकार दिल्याचं त्याने स्पष्ट केलं. तसंच आपणच दिग्दर्शक जेम्स कॅमरेनला या सिनेमासाठी सात वर्ष लागतील असं सांगितल्यावर त्याला राग आला होता असंही त्याने सांगितलं. इतकंच नाही तर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल हेदेखील आपण त्याला सांगितलं असल्याचं गोविंदा म्हणाला. या सगळ्या खुलाशावरून सध्या गोविंदाला खूपच ट्रोल करण्यात येत असून त्याचे अवतारमधील अनेक फोटोही सध्या व्हायरल होत आहेत. कोणीही ही गोष्ट मान्य करण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. गोविंदा गेले कित्येक वर्ष सिनेमांमध्ये दिसलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तर गोविंदा असं करत नाही ना अशा चर्चेलाही आता उधाण आलं आहे.