World Cancer Day च्या दिवशीच अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन

World Cancer Day च्या दिवशीच अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन

आज World Cancer Day च्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यांचे निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून उपचार सुरु होते. सत्तर वर्षीय रमेश भाटकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ‘हॅलो इन्स्पेक्टर’ आणि ‘कमांडर’मधून गाजलेले आणि नावारूपाला आलेले रमेश भाटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय नावाजलेले कलाकार होते. गायक आणि संगीतकार वासुदेव भाटकर यांचे सुपुत्र असणारे रमेश भाटकर यांनी आपल्या अभिनयाने अनेक नाटकं गाजवली. रंगभूमीपासूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या रमेश भाटकरांना खरी ओळख दिली ती, ‘अश्रूंची झाली फुले’मधील लाल्याने. अगदी आजही त्यांना या भूमिकेने ओळखले जाते. ‘राहू केतू’, ‘मुक्ता’, ‘अखेर तू येशीलच’, ‘केव्हा तरी पहाटे’ ही रमेश भाटकर यांची गाजलेली नाटकं होती.


माहेरची साडी चित्रपटातील भूमिका आजही अजरामर


रमेश भाटकर यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या तिनही माध्यमांमध्ये काम केले. 1977 मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. तर त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळत गेले. साधारण 90 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये रमेश भाटकर यांनी भूमिका केल्या. केवळ भूमिका केल्याच नाहीत, तर प्रत्येक भूमिका ते जगले. अगदी मालिकेतील इन्स्पेक्टरही त्यांनी असा रंगवला की, रमेश भाटकर हे इन्स्पेक्टरच आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला होता. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अनेक भूमिका केल्या. एकाच प्रकारच्या साच्यातील भूमिकेमध्ये न राहता, विविध चित्रपटांमध्ये विविध भूमिका रमेश भाटकरांना मिळत गेल्या आणि त्यांनी त्या साकारल्या. अगदी नकारात्मक भूमिकांमध्येही त्यांनी तितक्याच समरसतेने काम केले. रमेश भाटकरांनी काम चालू केल्यानंतर त्यांच्याकडे बरेच मराठी चित्रपट केवळ अभिनयाच्या जोरावर आले आणि प्रत्येक चित्रपट वा मालिका या त्यांनी आपल्या अभिनयानेच पेलल्या. 


तसेच मराठ्यात मधुमेह कसा नियंत्रित करावा हे देखील वाचा


भाटकरांच्या मालिकाही गाजल्या


पूर्वी केवळ दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. पण त्यावेळीदेखील रमेश भाटकरांनी केलेल्या मालिकेतील त्यांचे काम नेहमीच गाजले. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर व्यतिरिक्त त्यांनी केलेल्या दामिनी, बंदिनी तसंच युगंधरा यादेखील मालिका गाजल्या. त्यांची संवादफेक अतिशय वेगळी होती. त्यामुळे बरेच कलाकार त्यांची मिमिक्री करतानाही दिसायचे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटामध्ये साकारलेली पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिकादेखील गाजली. भूमिका लहान असली तरीही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आणि तीच त्यांची शेवटची भूमिका ठरली. 


जाहिरातींंमध्येही काम


रमेश भाटकर यांनी मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये काम केलं होतं असं म्हणावं लागेल. त्यांनी अनेक जाहिरातींमधूनही काम केलं. थोड्याच महिन्यांपूर्वी आलेल्या एका दागिन्यांच्या जाहिरातीतही मुलीला लग्नामध्ये समजून घेणाऱ्या बापाची काही सेकंदाची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. रमेश भाटकर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृतीही खालावली होती. रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांची न्यायाधीश पत्नी मृदूला भाटकर आणि त्यांचा मुलगा असा परिवार आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘स्त्री’च्या रहस्यावरुन आता उठणार पडदा, दुसरा भाग लवकरच


दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा


‘आलियाबरोबरच्या नात्यात खूप चढउतार होते’ - सिद्धार्थ मल्होत्रा