“कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई...”

“कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई...”

संपूर्ण जगावर ओढवलेलं कोरोनाचं संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या वाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी अभिनेत्री अलका कुबल मांढरदेवच्या काळुबाईला साकडं घातलं.

Instagaram

सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील नवसाला पावणाऱ्या काळुबाई देवीचं पुरातन मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तसंच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला मांढरदेवी यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली होती आणि ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं. परंतु यात्रेनंतर पुढील दोन महिन्यांतच कोरोना नावाचं संकट संपूर्ण जगासमोर ठाण मांडून उभे राहिलं आणि यातून सुखरूपपणे सर्वांची सुटका व्हावी, देवीचा आशिर्वाद पाठीशी सतत भक्कमपणे राहावा, यासाठी अलका कुबल यांनी काळुबाईला नवस केला आणि साकडे घालत म्हटलं की “कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई काळुबाई, मी स्वतः मांढरदेवला येऊन खणानारळाने तुझी ओटी भरेन.”

या संकटाशी दोन हात करायला सर्व क्षेत्रांतील सर्व कुशल मंडळी त्यांचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान फार प्रगत झाले आहे...पण युक्तीला भक्तीची आणि शक्तीची जोड असेल, तर तिची ताकद अधिक वाढते. शास्त्र आणि विज्ञान एकत्रच काम करत असतात, आपण माणसांनी देव आणि इतर गोष्टी असा भेदभाव निर्माण केला आहे.. जसे विज्ञान श्रेष्ठ आहे, तसेच देव किंवा आध्यात्मिक शक्तींमध्येदेखील ताकद आहे. ही सध्याची परिस्थिती सुधारावी म्हणून आपणही स्वत:हून किंवा कधीकधी नकळतपणे प्रार्थना करतच असतो. देव त्याचे अस्तित्व जाणवून देतोय माणसांमधून… देवळात दर्शन देणारा देव आता डॉक्टर्स, नर्सेस, आपल्या काळजीपोटी रस्त्यावर उतरलेली पोलीस यंत्रणा, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळवून देण्यासाठी धडपड करणारी माणसं या सगळ्यांमध्ये दिसतो आहे.

आई काळुबाईची कृपा होईल, आई या संकटातून सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढेल या विश्वासाने आणि श्रध्देने, अलका कुबल यांनी साकडे घातले आहे आणि सर्वांनी आपापली काळजी घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

अलका कुबल या काळूबाई देवीवरील मालिकाही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. लवकरच सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे काळूबाईच्या नावानं चांगभल या चित्रपटातही अलका कुबल यांनी देवीचा भूमिका साकारली होती. ज्यामुळे अनेकजण देवी म्हणून त्यांच्याच पाया पडू लागले होते. त्यामुळे अलका कुबल यांनी अशा भूमिका नाकारल्या होत्या. मात्र त्यानंतर दर्शन या कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांना महाराष्ट्रातील देवळांची सफर घडवली होती आणि आता त्या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून आता अलका कुबल यांना छोट्या पडद्यावर पाहता येईल. या मालिकेचं टीझरही अलका कुबल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं होतं. नुकतंच अलका कुबल यांनी मल्टीस्टारर 'धुरळा' या चित्रपटात दमदार अभिनय केला होता.