मराठी अभिनेत्री प्रिया बापटने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमधून काम केलं आहे. प्रियाचे सौंदर्य आणि अभिनयामुळे तिचा एक खास चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल आहे. आता प्रिया लवकरच हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेबसिरीजमध्ये ती काम करत आहे. यापूर्वीही प्रियाने हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. ‘मुन्नाभाई एमबीएसएस’ या चित्रपटात प्रियाने काम केलं होतं. मात्र या चित्रपटात प्रियाने एक छोटीशी भूमिका साकारली होती. आता ती पहिल्यांदाच हिंदीमध्ये एक महत्तपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही वेबसिरीज राजकारणावर बेतलेली आहे. शिवाय यात चार वेगवेगळी कथानकं एकमेकांमध्ये गुंतवण्यात आली आहेत. त्यामुळे या वेबसिरीजमधील भूमिकेतून प्रियाच्या अभिनयकौशल्याचे विविध पैलू तिच्या चाहत्यांना नक्कीच पाहता येणार आहेत. सिटी ऑफ ड्रिम्सची निर्मिती अॅप्लॉज एंटरटेंटमेंट करीत आहे. नागेश कुकनूर यांनी यापूर्वी इक्बाल, धनक, हैदराबाद लूजसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. नागेशसोबत प्रिया पहिल्यांदाच काम करत आहे. या वेबसिरिजमध्ये अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, इजाज खान, सिद्धार्थ चांदेकर यांच्यादेखील प्रमुख भूमिका असणार आहेत.सध्या वेबसिरीजचा जमाना आहे त्यामुळे टेलीव्हिजन मालिकांपेक्षा वेबसिरीज जास्त प्रमाणात पाहिल्या जातात. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीजनी वेबसिरीजमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे. हॉटस्टारवर सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसिरीजदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या वेबसिरीजमधील प्रिया आणि इतर मराठी कलाकारांच्या भूमिका याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
लहानपणीच मिळालं अभिनयाचं बाळकडू
अभिनेत्री प्रिया बापटने अगदी लहानपणापासूनच अभिनयाला सुरूवात केली. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून काम केलंं आहे. तिच्या अभिनयाचं तिच्या प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केलं आहे. प्रियाने शुभंकरोती या मराठी टेलीव्हिजन मालिकेत काम केलं. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईमपास- 2, टाईमप्लिज, गच्ची, हॅप्पी जर्नी अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कसब जगासमोर आणलं. काकस्पर्शमधील भूमिकेसाठी तिला स्क्रीन अॅवॉर्डदेखील मिळाला. प्रियाच्या ‘नवा गडी नवे राज्य’ या नाटकामधील कामाचेदेखील खूप कौतुक झाले. एवढंच नाही तर ती आता निर्मिती क्षेत्रातदेखील दमदार पावलं रोवत आहे. सध्या प्रिया बापट निर्मित दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी प्रिया आता हिंदीत आपलं नशीब आजमावत आहे. या सर्व प्रवासात तिचा पती म्हणजेच अभिनेता उमेश कामत याचादेखील नक्कीच मोलाचा वाटा आहे. दादा एक गुड न्यूज आहे नाटकाच्या प्रमोशनसाठी उमेश आणि प्रियाने गुडन्यूज आहे अशी पोस्ट टाकत प्रेक्षकांना चकीत केलं होतं. या पोस्टमुळे प्रिया गरोदर आहे असा अनेकांचा समज झाला होता.
‘इन्शाअल्लाह’ आलियाने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद
कसौटीतून कुठेही जाणार नाही कमोलिका, एकता कपूरचा खुलासा
ऊर्मिला कोठारेची बकेट लिस्ट विश झाली पूर्ण
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम