गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रिलीज होणाऱ्या ‘सावट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अजून एक नवीन अभिनेत्री पदार्पण करत आहे. ती अभिनेत्री म्हणजे श्वेतांबरी घुटे. ‘सावट’ या पहिल्याच चित्रपटात ती एक चॅलेजिंग रोल करत आहे. जो ग्लॅमरस नसला तरी अनेक छटा आहेत. त्यामुळे श्वेतांबरीला पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनयाचं नाणं किती खणखणीत आहे ते दाखवता येईल. श्वेतांबरीने या आधी साऊथच्या अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा चेहरा हा खूपच कॅमेरा फ्रेंडली आहे.
‘सावट’ नक्की कशाचं?
‘सावट’ या सुपर नॅचरल थ्रिलर या थीमवर आधारित चित्रपटाबद्दल श्वेतांबरीला विचारलं असता ती म्हणाली की, ‘हा चित्रपट म्हणजे पुरुष संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे ज्या संकुचित वृत्तीने पाहिलं जातं किंवा एकीकडे स्त्रियांना देवी म्हणून पूजलं जातं तर दुसरीकडे चेटकीण म्हणून लगेच वाळीत टाकलं जातं. या वृत्तीवर सावट हा चित्रपट भाष्य करतो. एकीकडे गावातली मुलगी मी साकारत आहे, तर अभिनेत्री स्मिता तांबे यामध्ये अदिती देशमुख या डॅशिंग पोलिस ऑफिसरची भूमिका करते आहे. जी शहरी भागातून आहे. पण कुठेतरी या दोघींची परिस्थिती ही एकच आहे. त्यांच्या दोघींच्याही समस्या एकच आहेत. या सर्वांवरही हा सिनेमा भाष्य करतो.’
श्वेतांबरीची भूमिका काय आहे?
‘माझं जी भूमिका आहे ती एका टीपिकल गावच्या टीपिकल रूढी परंपरांमध्ये वाढलेली मुलगी आहे. माझ्या भूमिकेला अनेक छटा असल्याने ही भूमिका करताना मला खूप मजा आली. या चित्रपटाआधी आमची वर्कशॉप्स घेण्यात आली होती आणि तसंच आपण आपल्या आसपास अशा घटना होताना अनेकवेळा ऐकतो. त्यामुळे या सगळ्याची ही भूमिका करताना मदत झाली.’ श्वेतांबरी ही तिच्या या पहिल्या सिनेमाबद्दल फारच उत्सुक आहे. कारण थ्रिलर हा तिचा आवडता जॉनर आहे. तसंच तिला येत्या काळात रिएलिस्टीक भूमिका करायची ईच्छा असल्याचं ही तिने #POPxoMarathi शी बोलताना सांगितलं.
‘सावट’चं गूढ कायम
‘सावट’ची ही कथा आहे एका गावाची. ज्या गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात आणि त्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे आणि प्रत्येक साक्षीदाराने कोणाला तरी पाहिलंय. पण कोणाला? याबाबत मात्र गूढ कायम आहे. याचं तिसरं टीझरही नुकतंच रिलीज करण्यात आलं. जे पाहून कोणाच्याही मनात भरपूर प्रश्न निर्माण होतील. टीझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो.
सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करत आहे. ‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ या चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपटआधी २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार होता पण काही कारणास्तव याची रिलीज डेट आता 5 एप्रिल करण्यात आली आहे.
हेही वाचा –
अभिनेत्री अदिती द्रविडचा ‘राधा’मय नृत्यविलास
अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण
‘तुला पाहते रे’ फेम ईशा ‘कोल्हापूर डायरीज’मधून झळकणार एका नव्या भूमिकेत