जेव्हा स्मिताने घेतला होता कंगनाशी पंगा…

जेव्हा स्मिताने घेतला होता कंगनाशी पंगा…

अभिनेत्री स्मिता तांबे हिचा पंगा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टनची भूमिका स्मिता हिने केली आहे. याच भूमिकेच्या निमित्ताने तिच्याशी केलेला हा संवाद.

स्मिताने साकारली स्मिता तांबे

पंगा सिनेमामध्ये स्मिता तांबे ही तिच्याच नावाच्या भूमिकेत झळकली आहे, यामागचं नेमकं कारण काय आहे ते सांगितलं स्मिताने. स्मिता म्हणाली की, पंगा हा सिनेमा मला ऑफर झाला. तेव्हा भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टनची भूमिका मला ऑफर झाली. या भूमिकेचं नाव माझ्याच नावावरून ठेवण्यात आलं होतं, याचं मलाही आश्चर्य वाटलं. ही माझी पहिली फिल्म आहे, ज्यात माझ्या भूमिकेचं नावही स्मिता तांबे आहे. खरंतर लेखकाने माझा उल्लेख संहितेत कॅप्टन एवढाच केला होता. पण सिनेमाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी माझी भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टन या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि मग भूमिकेला माझं खरं नाव देण्याचा विचार केला. मी साकारत असलेल्या या स्मिताचं कबड्डी हे पॅशन आहे. माझ्यात आणि या भूमिकेतलं हेच साम्य पडद्यावर ही भूमिका साकारताना मला उपयोगी पडलं.

कबड्डी खेळण्याचा अनुभव

वरं म्हटल्याप्रमाणे स्मिता यामध्ये कबड्डी टिमच्या कॅप्टनच्या भूमिकेत आहे. मग याआधी कधी स्मिता कबड्डी खेळली होती का?, असं विचारल्यावर स्मिताने सांगितलं की, मी शाळेत असताना कबड्डी खेळायचे. त्यानंतर शिक्षण आणि नंतर अभिनय क्षेत्रात करियर यामुळे कबड्डी मागे राहिली. पण या सिनेमाच्या निमित्ताने माझ्यातली कबड्डी प्लेयर पुनरूज्जीवित झाल्यामुळे मला खूप आनंद मिळाला. सिनेमात आपण जया निगमचा (कंगना रणौत) आपल्या आवडत्या खेळासाठीचा प्रवास पाहतो. तशीच या सिनेमामुळे माझ्यातील जया निगम सुखावल्याचं मला जाणवलं. सिनेमाच्या वेळी आमची कोच गौरी तर आम्हांला एखाद्या खरोखरीच्या स्पर्धेसाठी शिकवत असल्यासारखी कबड्डी शिकवायची. एखाद्या कसलेल्या खेळाडूने जेवढी कबड्डी स्पर्धेसाठी तयारी करावी, तेवढी आम्हाला कोचने करायला लावली होती.

कबड्डीसाठी स्मिताने घेतली अशी मेहनत

स्मिताने जवळपास दिड वर्ष कबड्डीची प्रॅक्टिस केली. याबाबत तिने सांगितलं की, माझी दिनचर्याच कबड्डीमुळे बदलून गेली होती. रोज सकाळी सहा वाजता मैदानात प्रॅक्टिसला पोहोचायचं. एखाद्या खेळाडूसारखाच माझा व्यायाम आणि आहार असायचा. माझ्या सिनेमातल्या बॉडी लँग्वेजमधून ही भारतीय कबड्डी टिमची कॅप्टन असल्याचे जाणवण्यासाठी माझ्या नसानसात हा खेळ भिनणं ही माझी जबाबदारी होती. मला सेटवर सगळे कॅप्टन म्हणूनच संबोधायचे त्यामुळेही मला आपण टिमचे नेत्तृत्व करत असल्यासारखे वाटायचे आणि आपोआप भूमिका साकारायला त्यामुळे मदत झाली.

दिग्दर्शिका आणि कंगनाने केलेल्या कौतुकाने भारावले

दिग्दर्शिका अश्विनीबाबत स्मिता म्हणाली की, अश्विनी मॅमची एक खासियत आहे की, सेटवर शंभर माणसं असतील तरीही, त्यांचे सेटवरच्या प्रत्येकाशी एक वेगळं नातं निर्माण होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वातचं ती एक खासियत आहे. त्या तुमच्याशी खूप आत्मियतेने बोलतात. पंगाच्या शेवटच्या दिवशी तर अश्विनी मॅमने मला स्वहस्ते एक पत्र लिहून दिले. एवढ्या मोठ्या दिग्दर्शिकेने माझं केलेलं कौतुक भारावून टाकणारं आहे. ते पत्र माझ्यासाठी खूप खास आहे. ते मी माझ्या घराच्या भिंतीवर फ्रेम करून आज लावलंय. तर कंगनाबाबत स्मिताने म्हणाली की, कंगना रणौत ही एक प्रगल्भ अभिनेत्री आहे. मी तिच्या अभिनयाची चाहती आहे. तिच्यासोबत सेटवर वावरताना मी तिचे अनेकदा निरीक्षण करायचे. ती खूप तन्मयतेने काम करते. कबड्डी खेळताना फुटवर्क कसं असावं, त्याचवेळी भूमिकेनुसार करावा लागणारा आंगिक अभिनय याचा खूप सूक्ष्म पातळीवर कंगनाचा अभ्यास असायचा. सिनेमामध्ये स्मिता (स्मिता तांबे) आणि जया (कंगना रनौत) यांच्यात एक द्वंद्व दाखवलंय. अशावेळी कॅप्टन स्मिता एका सीनमध्ये जयाला म्हणते की, “चलो कमसे कम इस बहाने तुम मॅट पे तो आयी’. त्यावेळी कंगना मॉनिटरसमोर उभी राहून माझा अभिनय पाहत होती आणि मला सीननंतर ‘तुझे डोळे इंटेन्स आहेत’, अशी कॉम्प्लिमेन्ट तिने दिली. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

रिअल आणि रीलमधील पंगा

स्मिताच्या पंगा सिनेमामध्ये जया निगम समाजव्यवस्थेशी पंगा घेते, तसा पंगा स्मिताने कधी रिअल लाईफमध्ये आयुष्यात घेतलाय का?, यावर स्मिता म्हणाली की, मी सिनेसृष्टीत जेव्हा पाऊल ठेवले होते. तेव्हा ‘सामान्य दिसण्यामुळे’ मला रिजेक्शनला सामोरे जावं लागलं. पण त्यामुळेच स्वत:ला अभिनेत्री म्हणून सिध्द करायचं बळ मला मिळाले. त्यामुळे कुठेतरी जयामध्ये मी स्वत:ला पाहत होते.