स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी केलं फक्कड जेवण

स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी केलं फक्कड जेवण

आपली लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशीही सध्या सूर नवा ध्यास नवाच्या माध्यमातून आपल्याला दर आठवड्याला भेटतेय. पण गेले काही दिवस स्पृहा तिच्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज फिर से या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण नुकतंच मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झालं. रंगबाज फिर से च्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने आपल्या सर्व युनिटसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.

स्पृहा शिरली शेफच्या भूमिकेत

मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये रंगबाजची टीम राहत असलेल्या किला कोठी हॉटेलध्येच स्पृहाने सर्वांसाठी फक्कड जेवण बनवलं. झणझणीत चिकन करी आणि मस्त भेंडीच्या भाजीचा घाट घातला. रंगबाजच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे दिसल्यावर स्पृहाचाही चेहरा फुलला. पाहा तिच्या कुकिंगचा हा व्हिडिओ

युनिटसाठी करायचं होतं काही खास

या कुकींगच्या खास अनुभवाबद्दल अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितलं की, “गेले कित्येक महिने आम्ही रंगबाजसाठी मेहनत घेत होतो. या काळात एकमेकांसोबत भोपाळ, चंदेरी आणि मध्यप्रदेशच्या इतर भागांमध्ये चित्रीकरणादरम्यान आम्ही सर्वच कलाकारांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे सर्वांसोबतच माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल करावंस वाटलं. त्यामुळेच चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी माझ्या हातचं काहीतरी सर्वांना बनवून खायला घालावं, असं मनात आलं. म्हणूनच मग शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मी घाट घातला.” स्पृहाने केलेला हा बेत नक्कीच स्पृहणीय आहे. याबाबत ती पुढे म्हणाली की, “मला सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवायचा जेवढा आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद सर्वजण पोटभर जेवून तृप्त झाल्यावर वाटला.”

रंगबाज फिर से च्या निमित्ताने

रंगबाज फिरसेच्या माध्यमातून स्पृहा पहिल्यांदाच क्राईम थ्रिलर वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिच्या वेबसीरिजमधील भूमिकेबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाही. पण या क्राईम थ्रिलरच्या पहिल्या पार्टमध्ये गोरखपूरच्या नामवंत बदमाश श्री प्रकाश शुक्लाची खरी कहाणी दाखवण्यात आली होती. शाकिब सलीमने यातील मुख्य भूमिका करून वाहवा मिळवली होती. आता दुसऱ्या पार्टमध्ये राजस्थानच्या सर्वात चर्चित बदमाशची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.

रंगबाज फिर से मध्ये नामवंत कलाकार

रंगबाजच्या दुसऱ्या भागात स्पृहासोबतच हिंदीतील अनेक नामवंत कलाकार आहेत. मुख्य भूमिकेत अभिनेता जिमी शेरगिल दिसणार आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री गुल पनाग, सुशांत सिंग, जीशान अय्युब आणि मराठी अभिनेता शरद केळकरही महत्‍वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचे एकूण 9 एपिसोड आहेत.

रंगबाजसोबतच येणार स्पृहाचा अजून एक चित्रपट

रंगबाज फिर से ही वेबसीरिज 20 डिसेंबरला रिलीज होणार आहेत तर त्या आधी स्पृहाचा विक्की वेलिंगकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ती या चित्रपटात विद्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपटही गूढ प्रकारातला आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.