आदित्य चोप्राने 'वायआरएफ 50' बाबत घेतला महत्वाचा निर्णय

आदित्य चोप्राने 'वायआरएफ 50' बाबत घेतला महत्वाचा निर्णय

बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान देणाऱ्या यशराज फिल्मला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. यशराज फिल्मचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा वायआरएफ 50 निमित्त त्यांच्या सर्व आगामी चित्रपटांची यादी सप्टेंबरमध्ये जाहीर करणार होते. कारण येत्या 27 सप्टेंबरला यशराज फिल्मचे संस्थापक यश चोप्रा यांची जयंती आहे. या निमित्त आगामी चित्रपटांची नावे आणि कलाकारांची नावे जाहीर केली जाणार असं आधी सांगण्यात आलं होतं.  मात्र आता सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या चित्रपटांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे येत्या  27 तारखेला कोणताही मोठा कार्यक्रम केला जाणार नाही. यश चोप्रा यांच्या जयंती निमित्त फक्त दोन मोठ्या प्रोजेक्टची अनाऊंसमेंट केली जाणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांत हळूहळू इतर चित्रपटांची नावे जाहीर केली जाणार आहेत. 

आदित्य चोप्राने का बदलला निर्णय

बॉलीवूडसाठी आदित्य चोप्राचा हा निर्णय खूप मोठा आणि महत्वाचा असणार आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला सध्या कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली आहे. त्यामुळे चित्रपटगृह कधी सुरू होतील याबाबत आताच ठामपणे सांगणं कोणालाच शक्य नाही. अशा कठीण आणि संभ्रमावस्थेमुळे आदित्य चोप्रा यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आहे. त्यामुळे आदित्य चोप्रा आता त्यांच्या पुढील सर्व आगामी चित्रपटांची नावे तेव्हाच जाहीर करतील जेव्हा चित्रपटगृह पुन्या पूर्वीप्रमाणे सुरू होतील. आदित्य चोप्रा सध्या चित्रपटगृह मालकांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटत आहे की यशराज फिल्मस या देशातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसची विशाल कार्ययोजना त्यांनी मोठ्या पडद्यावरच पाहावी. 

'वायआरएफ 50' साठी अशी केली जात आहे तयारी

यशराज फिल्मच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आधी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची नावे 27 सप्टेंबरला सलमान खान, शाहरूख खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार, ऋतिक रोषन या बॉलीवूडच्या मोठमोठ्या कलाकारांच्या हस्ते जाहीर केली जाणार होती. मात्र आता हा निर्णय आदित्य चोप्रा याने बदलला आहे.  ज्यामुळे लोकांना आता हे चित्रपटांची नावे केवळ चित्रपटगृह सुरू झाल्यावरच ऐकायला मिळू शकतात. प्रेक्षकांच्या मतेही यशराज फिल्मसचे भव्य दिव्य चित्रपट हे केवळ मोठ्या पडद्यावर पाहण्यातच खरी मौज आहे. त्यामुळे या प्रॉडक्शन हाऊसचा कोणताही चित्रपट ओटीटी माध्यमातून प्रदर्शित होणार नाही. या क्षेत्रातील तज्ञ्जांच्या मते येत्या काळात आदित्य चोप्राने घेतलेला हा निर्णय योग्य आणि निर्णयक ठरेल. आदित्य चोप्रा सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांवर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मात्र ते चित्रपट कोणते आहेत हे प्रेक्षकांना चित्रपटगृह सुरू झाल्याशिवाय समजू शकणार नाही. आदित्य चोप्राने यशराज फिल्मच्या सुर्वणमहोत्सवी वर्षानिमित्त खास प्लॅनिंग केलं आहे. यासाठी त्यांनी एक खास फिल्मदेखील तयार केली आहे. ज्यातून यशराज फिल्मचा पन्नास वर्षांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. चित्रपटगृह सुरू झाल्यावर हा प्रवास आणि आगामी चित्रपटांची नावे प्रेक्षकांसमोर जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्व काही सुरळीत व्हावं आणि चित्रपटगृह सुरू व्हावेत अशी अपेक्षा यशराज फिल्मचे चाहते करत आहेत.