रामायण, महाभारतप्रमाणेच आता 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रामायण, महाभारतप्रमाणेच आता 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

देशभरात सध्या लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आलेलं आहे. सहाजिकच यामुळे टेलिव्हिजनवरील मालिकांचे पुढील भाग प्रसारित करणं अशक्य झालं आहे. टेलिव्हिजनवरील मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतूट नातं असतं.  कारण दररोज या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असतं. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी आता टेलिव्हिजनवर पुन्हा जुन्या मालिकांचे प्रसारण सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही प्रेक्षकांचे मनोरंजन सुरूच राहणार आहे. सध्या टेलिव्हिजनवरील दूरदर्शन वाहिनीवर नव्वदच्या काळातील रामायण आणि महाभारत या मालिका पुनःप्रसारित करण्यात येत आहेत.  या मालिकांमुळे प्रेक्षकांना त्याच्या बालपणातील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे. या मालिका पाहिल्यावर आचा सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्या काळातील त्यांच्या जुन्या मालिका प्रसारित करण्याची मागणी सुरू केली आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ नंतर ‘शक्तिमान’ या मालिकेच्या प्रसारणाची मागणी सध्या वाढलेली आहे. यासाठीच या मालिकेच्या प्रसारणाबाबत या मालिकेमध्ये ‘शक्तिमान’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मुकेश खन्ना यांनी एक खास खुलासा केला आहे.  

मुकेश खन्ना यांचं मुलांसाठी खास सरप्राईझ

मुकेश खन्ना यांनी नव्वदच्या काळात शक्तिमानच्या रूपात अनेक मुलांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती.ज्यामुळे त्याकाळी शक्तिमान ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेचा प्रभाव इतका होता की आजही या मालिकेद्दल अनेकांना तितकंच जिव्हाळा आणि प्रेम आहे. आता या मालिकेच्या पुनः प्रसारणाबाबत मुकेश खन्ना यांनी खुलासा केला आहे की, “वेळ पडल्यास लवकरच शक्तिमान या मालिकेचं पुनःप्रसारण देखील करण्यात येईल. मात्र एवढंच नाही तर लवकरच या मालिकेचा सिक्वल म्हणजेच पुढील भाग देखील प्रसारित होणार आहे. सर्व चाहते आणि प्रेक्षकांना हे ऐकून नक्कीच आनंद होईल की लवकरच शक्तीमान एका वेगळ्या आणि आधूनिक रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे ” मुकेश खन्नाने शेअर केलं आहे की, मागील तीन वर्षापासून या मालिकेच्या नवीन भागांवर काम करण्यात येत आहे. या मालिकेचा सिक्वल हा आजच्या काळ आणि जीवनशैलीनुसार असेल. लोकांना शक्तिमानचं पुढे काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा आहे यासाठीच हा सिक्वल आम्ही तयार करत आहोत. मात्र लॉकडाऊनमुळे आता सर्वत्र शूटिंग बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शक्तिमानच्या सिक्वलसाठी थोडा विलंब होत आहे. मात्र तोपर्यंत लोकांच्या मागणीनुसार जुन्या शक्तिमान मालिकेचं पुनःप्रसारण नक्कीच केलं जाऊ शकतं. 

शक्तिमान विषयी आजही चाहत्यांना उत्सुकता

शक्तिमान ही नव्वदीच्या दशकात भारतीय लोकांची एक आवडती टेलिव्हिजन मालिका होती. ज्यामध्ये मुकेश खन्ना यांनी मुलांच्या ‘शक्तिमान’ या सुपरहिरोचं काम केलं होतं. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी 'गंगाधर' या सामान्य माणसाची आणि 'शक्तिमान' या सुपरहिरोची अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. शक्तिमान ही मालिका त्या काळी एवढी लोकप्रिय झाली की आजही या सुपरहिरोबद्दल लोकांना उत्सुकता आहे. जवळ जवळ आठ वर्ष शक्तिमानच्या रूपात मुकेश खन्ना यांनी मुलांचे मनोरंजन केलं होतं. मात्र 2005 साली काही अडचणी आल्याने मुकेश खन्ना यांना ही मालिका बंद करावी लागली होती. या मालिकेचं दिग्दर्शन सौमित्र रानडे यांनी केलं होतं. आता लॉकडाऊनमुळे ही मालिका पुन्हा प्रसारण करण्याची मागणी वाढत आहे. दूरदर्शनवर आता पुनःप्रसारित केल्या जाणाऱ्या महाभारत या मालिकेतदेखील मुकेश खन्ना यांनी पितामह भीष्म यांची भूमिका साकारली होती. त्यामुळे जर आता शक्तिमान मालिका पुन्हा सूरू झाली तर चाहत्यांना मुकेश खन्ना यांना यांच्या दोन जुन्या मालिकांमधून पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

Corona : पद्मिनी कोल्हापुरेने केली प्रिन्स चार्ल्स बरे होण्यासाठी प्रार्थना

डॉक्टर डॉनने घरात राहण्यासाठी केला आहे असा 'फुलप्रूफ प्लॅन'

ऑनलाईन #quarantineantakshari लावले सगळ्या सेलिब्सला वेड, तुम्ही ट्राय केले का?