सिम्बा’नंतर रणवीर ‘गल्ली बॉय’ लुकमध्ये येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

सिम्बा’नंतर रणवीर ‘गल्ली बॉय’ लुकमध्ये येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

रणवीर सिंगसाठी 2018 हे वर्ष अप्रतिम ठरलं असंच म्हणावं लागेल. या वर्षाची सुरुवात रणवीरसाठी धमाकेदार झाली. ‘पद्मावत’मधील अभिनयाने रणवीरने आपल्या चाहत्यांचं आणि प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आणि वर्षाचा शेवटही त्याच्या धडाकेबाज ‘सिम्बा’ चित्रपटानेच झाला. या चित्रपटाने त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. बॉलीवूडचा नेक्स्ट सुपरस्टार असंही आता प्रेक्षक रणवीर सिंगला म्हणू लागले आहेत. केवळ व्यावसायिकच नाही तर त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातही हे वर्ष अप्रतिम ठरलं. सहा वर्ष दीपिकाला डेट केल्यानंतर याचवर्षी दोघे विवाहबद्ध झाले. नवीन वर्षाची सुरुवातही रणवीरच्या ‘गल्ली बॉय’ने होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


first look
‘सिम्बा’ च्या यशानंतर ‘गल्ली बॉय’चं प्रमोशन सुरु


सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीरचा ‘सिम्बा’ धुमाकूळ घालत आहे. रणवीर आणि रोहित शेट्टीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. आता रणवीर ‘सिम्बा’च्या यशानंतर आपला पुढचा चित्रपट ‘गल्ली बॉय’ घेऊन आला आहे. यामाध्ये पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रणवीर आणि आलिया भटची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. नव्या वर्षाची ही भेट रणवीरने वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोस्टर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना दिली आहे. पोस्टरच्या फर्स्ट लुकबरोबरच नक्की यामध्ये काय असणार याचीही उत्सुकता रणवीरने वाढवली आहे. पोस्टर शेअर करताना, ‘गल्ली बॉय - अपना टाइम आएगा’ अशी कॅप्शन पोस्ट केली आहे. या चित्रपटासाठी रणवीरने आपलं बरंच वजन कमी केलं होतं. बॉलीवूडमध्ये एन्ट्री करताना ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातील रणवीरच्या लुकशी हा लुक मिळताजुळता आहे असं वाटत आहे.  येत्या 14 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून झोया अख्तरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून चर्चा आहे. या चित्रपटाची रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांनी निर्मिती केली आहे.


gully boy
‘गल्ली बॉय’ची कथा काय आहे?


‘गल्ली बॉय’ एक बॉलीवूड म्युझिकल ड्रामा स्वरूपाचा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ही रिअल लाईफ अर्थात रोजच्या आयुष्यावर आधारित असून हा चित्रपट लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल असं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये रणवीरनं सांगितलं होतं. शिवाय या चित्रपटाचं संगीतदेखील थोडं वेगळं असून प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. रणवीर प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळी व्यक्तीरेखा आजपर्यंत साकारत आला आहे. त्याच्या मते या चित्रपटामध्ये तो स्वतः जसा आहे तसंच त्याने काम केलं आहे. त्यासाठी त्याला वेगळा अभ्यास करण्याची गरज भासली नाही. या चित्रपटामध्ये आलियाबरोबर पहिल्यांदाच रणवीर काम करत असून त्याच्याबरोबर कलकी कोचलिनचीदेखील प्रमुख भूमिका असणार आहे. आलियानेदेखील यावर्षी ‘राझी’ चित्रपटातून आपली दखल घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडलं आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात दिसणार असल्याने प्रेक्षकांनाही त्यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. दरम्यान आलिया आणि रणवीरने दोघांचा फोटो असलेले एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. आता पुढच्याच महिन्यात हा चित्रपट येणार असून नक्की या चित्रपटामध्ये आलिया आणि रणवीर कसा अभिनय करत आहेत हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक आहेत.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम