'रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस'मधून अजय देवगन करणार डिजिटल डेब्यू

'रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस'मधून अजय देवगन करणार डिजिटल डेब्यू

अजय देवगनला बॉलीवूडचा 'सिंघम' म्हटलं जातं. कारण त्याची सिंघम चित्रपटातील पोलीस ऑफिसरची भूमिका चाहते कधीच विसरू शकत नाहीत. अजय देवगनने बॉलीवूडमध्ये सक्षम अभिनयाने अनेक चित्रपट हिट केले आहेत. लवकरच बॉलीवूडचा हा सिंघम ओटीटी माध्यमावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगनने त्याची मुलगी न्यासाच्या वाढदिवशी त्याच्या डिजिटल डेब्यूची घोषणा केली आहे. अजय देवगन लवकरच रूद्र दी  ऐज ऑफ  डार्कनेस या क्राईम वेबसिरिजमधून ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्रमाणेच यात अजय कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. अजयने आजवर अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. मात्र या वेबसिरिजमधील अजयचा अवतार नेहमीच्या भूमिकांपेक्षा थोडा वेगळा असणार आहे.

अजयने केली डिजिटल डेब्यूची घोषणा -

अजय देवगनने त्याचा रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेसमधील फर्स्ट लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अजयने शेअर केलं आहे की, "मला नेहमीच चाहत्यांसमोर निरनिराळ्या कथा सादर करायला आवडतं. त्यामुळे या सिरिजच्या माध्यमातून काहीतरी वेगळं चाहत्यांसमोर सादर केलं जाणार आहे. मी माझ्या डिजिटल डेब्यूसाठी खूपच उत्साही आहे कारण हे माध्यम मला सतत खूणावत होतं. पडद्यावर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं माझ्यासाठी नक्कीच नवीन नाही. मात्र यावेळी भूमिकेमध्ये थोडा बदल केलेला असेल. कदाचित एक वेगळी छटा  तुम्हाला यातून पाहायला मिळेल. मला वाटतं हा रूद्र माझ्या भूमिकेमधील सर्वात जास्त ग्रे कॅरेक्टर असलेला असेल.कारण त्यात अजय एक अंडरकव्हर कॉप साकारणार आहे. जो पोलिसांची वर्दी न घालताच गुन्हेगारांचा पर्दा फाश करण्याचे काम करतो.  शिवाय प्रेक्षकांना ही कथा आवडेल कारण ही एक रहस्यमयी आणि गूढ कथा आहे."

'रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस' कधी होणार प्रदर्शित

या वेबसिरिजवर लवकरच काम सुरू केलं जाणार आहे. ज्यासाठी मुंबईतील काही आयकॉनिक लोकेशन निवडले जात आहेत. ही वेबसिरिज एप्लॉज इंटरटेंटमेंट आणि बीबीसी स्टूडिओ करत आहे. ही सिरिज ब्रिटिश सायकॉलॉजिकल क्राइम ज्रामा लूथर (Luther) चे रूपांतर असणार आहे. या वेबसिरिजचे पाच सीझन प्रदर्शित झालेले आहेत. आता याचे भारतीय रूपांतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. डिस्नी हॉटस्टरावर ही वेबसिरिज प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे यातील रूद्रची भूमिका त्यानुसार डिझाइन करण्यात आलेली आहे.  या वर्षी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरिजमध्ये अजयसोबत इलियाना डिक्रुझ पुन्हा झळकण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अजयने एक निर्माता या नात्याने आधीच ओटीटी माध्यमावर प्रवेश केलेला आहे. त्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये तयार झालेली त्रिभंग यापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ज्यामध्ये काजोल मुख्य भूमिकेत होती. मात्र आता अजय एक अभिनेता म्हणून ओटीटीवरील एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. यासोबतच अजय देवगन अनेक आगामी चित्रपटांमध्ये काम करत आहे. मात्र तो पहिल्यांदा अशा चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्याच महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. यापूर्वी अजय आणि अमिताभ यांनी कलाकार म्हणून एकत्र काम केलं आहे. मात्र मेडेमधून पहिल्यांदा ही दिग्दर्शिक आणि कलाकार जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.