गंगूबाई काठियावाडीनंतर आलिया झळकणार भन्सालीच्या आणखी एका चित्रपटामध्ये

गंगूबाई काठियावाडीनंतर आलिया झळकणार भन्सालीच्या आणखी एका चित्रपटामध्ये

संजय लीला भन्सालीची ओळख ही पिरिएड ड्रामा चित्रपटांसाठी केली जाते. ज्यामुळे त्यांच्या चित्रपटांचे सेटही अगदी भव्य दिव्य असतात. लवकरच संजय लीला भन्सालीचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारत आहे अभिनेत्री आलिया भट. गंगूबाई काठियावाडीमुळे संजय आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. संजय लीला भन्सालीसारख्या लोकप्रिय दिग्दर्शकासोबत काम करण्याची आलियाची खूप दिवसांपासून इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. पण एवढंच नाही आलियाच्या कामावर आता संजय लीला भन्साली एतके फिदा झाले आहेत की त्यांनी चक्क त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटासाठी आलियाचीच निवड केली आहे. ज्यामुळे आलियासाठी ही नक्कीच एक खूशखबर आहे.

आलिया गंगूबाई काठियावाडीसाठी घेत आहे खूप मेहनत -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया भट 'गंगूबाई काठियावाडी'साठी प्रचंड मेहनत घेत आहे. तिचा हा चित्रपट भविष्यात तिच्या कारकिर्दीतील एक बेस्ट चित्रपट असणार आहे. तिची मेहनत आणि तिच्या अभिनय कौशल्याने तिने शूटिंग दरम्यानच दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना भूरळ पाडली आहे. संजयच्या मते तिचं या चित्रपटातील काम इतकं बेस्ट झालं आहे की तिला या वर्षी या चित्रपटासाठी नॅशनल पूरस्कार मिळायला हवा. कारण आलियाने या  चित्रपटासाठी तिने तिचा पेहराव, दिसणं, असणं, देहबोली आणि भाषा सगळं काही गंगूबाई काठियावाडीप्रमाणे केलं आहे. ज्यामुळे तिचं या चित्रपटातील काम नक्कीच कौतुकास्पद असणार आहे. 

कोण आहे ही गंगूबाई काठियावाडी

आलिया या चित्रपटात एका महिला माफिया डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट एस. हुसैन जैदी यांच्या माफिया क्विन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटातील गंगूबाई यांना कामाठीपूराची राणी असंही म्हटलं जायचं. गंगूबाई सेक्स वर्कर्स साठी गॉडमदर होती. ज्यांना या व्यवसायातील महिला गंगू मॉं या नावाने ओळखत असत. गंगूबाईची ओळख मुंबईतील सर्व माफिया आणि राजकीय नेत्यांसोबत होती. ज्यामुळे तिची दहशत सर्वत्र पसरली होती. वास्तविक गंगूबाई परिस्थितीमुळे या व्यवसायात अडकली होती. तिचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. ती पूर्वी गुजरातच्या काठियावाडी येथे राहत असे. एका मोठ्या आणि संपन्न घरातील मुलगी होती. मात्र गंगाला मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याची हौस होती. ज्यामुळे ती मुंबईत आली आणि त्यानंतर तिला परिस्थितीमुळे या व्यवसायात जावं लागलं. आलियाला या चित्रपटात पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे. 

संजयच्या आणखी कोणत्या आगामी चित्रपटात झळकणार आलिया

संजय लीला भन्सालीच्या आगामी 'हीरामंडी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा  सुरू आहे. आणि या चित्रपटात पुन्हा एकदा  आलिया भट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात आलियासोबत आणखी एक मोठी अभिनेत्री असण्याची शक्यता आहे. ज्यासाठी ऐश्वर्या रॉय, माधुरी दीक्षित अथवा दीपिका पादूकोण यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. आलिया या व्यतिरिक्त  'ब्रम्हास्त्र'मध्येही दिसणार आहे. ब्रम्हास्त्रचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. या चित्रपटात ती तिचा बॉयफ्रेंड रणवीर कपूरसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. हा चित्रपट बिग बजेट असल्यामुळे चाहत्यांना तो कधी एकदा प्रदर्शित होईल असं झालं आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट चांगलाच रखडला आहे. मात्र त्याचं शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच तो प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे वर्ष आलियाच्या करिअरसाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार असं म्हणायला काही हरकत नाही.