‘बिटरस्वीट’ चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल

‘बिटरस्वीट’ चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल

जगभरात हाहाःकार माजवलेल्या कोविडमुळे गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीला अचानक खीळ बसली. ज्यामुळे अनेक हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित होता होता राहिले.आता हळू हळू सर्वकाही पुन्हा एकदा नव्याने पूर्ववत होत आहे. कोविडच्या निराशाजनक वातावरणातून बाहेर पडत असतानाच अचानक एक बिटरस्वीट (कडूगोड) बातमी मराठी चित्रपटसृ्ष्टीला मिळाली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अंनत महादेवन यांच्या 'बिटरस्वीट' या चित्रपटाची निवड यंदाच्या मानाच्या अश्या  'बुसान आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल' मध्ये झाली आहे. सहाजिकच यामुळे आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीचे नाव सातामुद्रापार गौरवण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला बुसान फेस्टिव्हलमधील JISEOK या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. 

काय आहे बिटरस्वीट

या चित्रपटाची कथा महाराष्ट्र राज्यातील एका ज्वलंत सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा पटकथा दिग्दर्शन आणि संकलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच आपला ठसा उमटविणारे ख्यातमान दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चार आघाडीवर कामगिरी यशस्वीपणे सांभाळली आहे. या चित्रपटात अक्षया गुरव, अनिल नगरकर, स्मिता तांबे, स्वर्गीय विनायक दिवेकर, असित रेडीज, गुरु ठाकूर, सुभाष जाधव, सुरेश विश्वकर्मा,विवेक चाबुस्कवार,भाग्यश्री पने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अल्फान्सो रॉय यांनी छायाचित्रण तसेच रोहित कुलकर्णी यांनी पार्श्वसंगीत दिले आहे आणि  रमाकांत महाजन हे कला दिग्दर्शक आहेत. नंदू आचरेकर, राहुल सूर्यवंशी हे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत . रोहन गोडांबे हे  कार्यकारी निर्माते  आहेत, तसेच या चित्रपटाच्या विषयाला अनुसरून अर्थपूर्ण असं संवाद लेखन लेखक महेंद्र पाटील यांने केलं आहे. माजलगाव परिसरात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं असून क्वेस्ट फिल्म ची निर्मिती असलेला या चित्रपटाची निर्मिती सुछंदा चँटर्जी ,शुभा शेट्टी यांनी केलेली आहे. 

सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा बिटरस्वीट

अनंत महादेवन यांच्या मते, "महिला उसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात मानवी मुल्यांच्या जागतिक प्रश्नावर भाष्य करण्यात आलेलं आहे. साखर उद्योग क्षेत्रातील वास्तव या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर मांडलं जाणार आहे. या  क्षेत्रातील उस तोड महिला कामगारांची व्यथा आणि समाजाकडून होणारं त्यांचं शोषण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बऱ्याचदा शेतात अहोरात्र मेहनत करण्यासाठी या महिला कामगारांची गर्भाशयच काढली जातात. असं केल्यामुळे त्याच्या कामात येणारा एक शारीरिक अडथळा दूर होतो असं मालकांचं म्हणणं असतं. विशेष म्हणजे असं अमानवी कृत्य करणाऱ्या लोकांविरूद्ध कोणीही उघडपणे बोलतही नाही. त्यामुळे या महिलांना काहिही न बोलताच हे सहन करतच आयुष्य घालावावं लागतं. 'बिटरस्वीट'मध्येही अशाच एका सगुणा नावाच्या नायिकेची कथा दाखवण्यात आली आहे. जी या गोष्टीविरूद्ध संघर्ष करते, बंड पुकारते. सत्य घटनेवर आधारित कथा आणि चित्रपटाची मांडणी यामुळे हा चित्रपट अनेकांची मनं नक्कीच जिंकून घेईल. शिवाय यातून एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाला तोंडही फुटेल असं दिग्दर्शकांना वाटत आहे. त्याचप्रमाणे  येणाऱ्या काळात जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखल होऊन यश मिळवेल असाही विश्वास अनंत महादेवन यांनी व्यक्त केला.