अंकिता लोखंडेची अपार्टमेंट झाली सील, कोरोनामुळे घरात भितीचं वातावरण

अंकिता लोखंडेची अपार्टमेंट झाली सील, कोरोनामुळे घरात भितीचं वातावरण

कोरोना व्हायरस सध्या जगभरात थैमान घालत आहे. ज्यामुळे देशात सर्वत्र भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. देशभरातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र तरिही परिस्थिती अधिकाधिक गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाग्रस्त विभागांमध्ये वाढ होताना आढळत आहे. अनेक दिवसांपासून घराबाहेर पडून सुद्धा आता संकट उंबरठ्यापर्यंत पोहचल्याने घरोघरी भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नुकतंच अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या अपार्टमेंटला सील करण्यात आलेलं आहे. अंकिताच्या अपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सिद्ध झालं आहे. 

अंकिताच्या अपार्टमेंट का झाली सील

अंकिता लोखंडे मालाडमधील एका प्रसिद्ध अपार्टमेंटमध्ये राहते. या अपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. ज्यामुळे या संपूर्ण सोसायटीला सध्या सील करण्यात आलेलं आहे. अंकिताच्या अपार्टमेंटला पाच विंग असून त्यामध्ये अनेक सेलिब्रेटीज राहतात. ज्यामुळे आता या अपार्टमेंटमधील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. या अपार्टमेंटमध्ये अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा या सेलिब्रेटीज राहतात. मात्र या सर्वांना जीवनाश्यक गोष्टींच्या खरेदीसाठीदेखील बाहेर पडता येणार नाही. अपार्टमेंट सील झाल्यामुळे आता या भागातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती अंकिताच्याच विंगमध्ये आढळली आहे. ज्यामुळे सध्या अंकिताच्या घरात भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

सुरक्षेसाठी काय घेण्यात आहे खबरदारी

अंकिता लोखंडे राहत असलेल्या अपार्टमधील एका व्यक्तीची नुकतीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला सतत फिरण्याची आवड आहे. पर्यटनाची आवड असल्यामुळे तो  सतत देशविदेशात प्रवास करायचा. नुकताच तो स्पेनमधुन भारतात आलेला होता. भारतात आल्यावर त्याच्यावर करण्यात आलेल्या चाचणीत तो निगोटिव्ह सिद्ध झाला होता. 12 व्या दिवशीपासून त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली. या व्यक्तीमुळे इतरांनादेखील कोरोना संक्रमणाची लागण होऊ शकते. त्याच्या घरातील इतर लोकांची टेस्ट सध्या निगेटिव्ह आलेली आहे. मात्र पोलिसांनी आता सावधगिरी बाळगण्याठी संपूर्ण अपार्टमेंटच सील केलेली आहे. अंकिताच्या अपार्टमेंटच्या मुख्य गेटजवळ आता कोरोनाग्रस्त विभागाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे.  शिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे अपार्टमेंट निर्जंतूक करण्यात आलेली आहे. शिवाय महापालिकेचे अधिकारी वेळोवेळी येऊन या सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहितीदेखील घेत आहेत. या आधीदेखील काही सेलिब्रेटीज राहत असलेल्या विभागांना अशाप्रकारे सील करण्यात आलेलं आहे. मात्र आता हे प्रमाण वाढतच चाललेलं असल्याने लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात येऊन हे संकट कायमचं दूर व्हावं अशीच सर्व नागरिक इच्छा व्यक्त करत आहेत.