अर्जून कपूरने स्वीकारली हजार मुलांची जबाबदारी, फूडक्लाऊडद्वारे करणार मदत

अर्जून कपूरने स्वीकारली हजार मुलांची जबाबदारी, फूडक्लाऊडद्वारे करणार मदत

अभिनेता अर्जून कपूर मलायका अरोरासोबत असलेल्या रिलेशनमुळे सतत चर्चेत असतो. आता मात्र तो एका चांगल्या कारणासाठी पुन्हा चर्चेत आहे. अर्जुनने काही महिन्यापुर्वीच लैंगिक समानता आणि आर्त्मनिर्भरता विकास करण्यासाठी फूड डिलिव्हरी स्टार्टअप, फूडक्लाऊडमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उद्योगातून त्याने एका सामाजिक कार्यासाठी खूप मोठं पाऊल उचललं आहे. अर्जुनने या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यातून जवळजवळ एक हजार लहान मुलांना महिनाभर भोजन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनच्या मते, कोरोना महामारीच्या काळात समाजाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ज्यामध्ये अनेकांना पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे झालेली उपासमार ही एक मोठी समस्या होती. खरंतर या समस्येचा सर्वात जास्त परिणाम समाजातील अनाथ आणि लहान मुलांवर झाला होता. कोरोना आणि  लॉकडाऊनमुळे अचानक अनेकांचे रोजगार बंद झाले होते. अशा काळात ज्या कुटुंबाचे उत्पन्न अचानक बंद झाले त्या कुटुंबातील मुलांची अक्षरशः उपासमार झाली होती. भविष्यात पुन्हा या समस्येला सामोरं जावं लागू नये  यासाठीच त्याने या उद्योगातून अशा लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली आहे. त्याची टीम आता अशा मुलांच्या महिन्याभराच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. या योजनेला यशस्वीपणे सुरूवात केल्याबद्दल त्याला त्याच्या टीमबद्दल अभिमान वाटत आहे. कारण यातून आता या मुलांचे संरक्षण आणि पोषण अशा दोन्ही गोष्टी केल्या जाणार आहेत. अर्जुनच्या मते हा उपक्रम जितके दिवस कोरोना महामारी असेल तोपर्यंत सुरू ठेवला जाणार आहे. ज्यामुळे यापुढे आपल्या देशातील कोणतेही मुल उपाशी राहणार नाही आणि देशातील मुलांवर कुपोषणाची वेळ कधीच येणार नाही. 

अर्जुन कपूर हिमाचलमध्ये करत आहे शूटिंग

अर्जुन कपूर लवकरच त्याच्या भूत पुलिस या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यावर तो लगेचच त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि यामी गौतमीदेखील असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे. यासाठीच दिवाळी नंतर मलायका अरोरा आणि करिना कपूर यांनी त्यांचं वेकेशन हिमाचलमध्ये प्लॅन केलं होतं. 

काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सैफ अली खान, करिना कपूर आणि तैमूर यांचे हिमाचल प्रदेश मधील धर्मशाला येथे सुट्टीचा आनंद घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अर्जुन कपूरने यावेळी मलायकाचा एक गुपचूप घेतलेला फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने कॅप्शन दिली होती की, "हिला चेकआऊट करत आहे" अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला होता. अर्जुन आणि मलायची जोडी हा सध्या एक चर्चेचा विषय आहे. मागच्यावर्षी अर्जुनने त्याच्या वाढदिवशी हे रिलेशनशिप जाहीरपणे मान्य केलं होतं. सध्या ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र चाहत्यांना ही दोघं लग्न कधी करणार याची घाई झाली आहे. मात्र लग्नाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास ती दोघं सध्यातरी तयार नाहीत. 

Instagram