बालिका वधू फेम अविका गौर ‘आनंदी’ या पात्रामुळे घराघरात पोहचली होती. त्यानंतर ती ससुराल सिमर का आणि खतरो कें खिलाडी अशा अनेक शोज आणि जाहिरातींमधून झळकली. काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानी सोबत असलेलं नातं तिने सोशल मीडियावर खुलेपणाने स्वीकारलं होतं. अशा अनेक कारणांवरून सतत सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या अविकाने आता एक खूप मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अविकाने वर्षांनूवर्ष गोरेपणा किती महत्त्वाचा आहे आणि गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रिम वापरणं गरजेचं आहे यावर स्वतःचं मत मांडलं आहे. यासाठीच तिने तीन फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींची ऑफर धुडकावून लावली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर अविका परत एकदा चाहत्यांच्या कौतुकाची पात्र ठरली आहे.
काय म्हणाली याबाबत अविका गौर
अविकाने एका मुलाखतीत याबाबत स्वतःचं परखड मत व्यक्त केलं आहे. तीने शेअर केलं आहे की, मी फेअरनेस क्रिमची जाहिरात करणार नाही. कारण फेअरनेस क्रिमने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात बिंबवलं आहे की, गोरे असणं म्हणजेच सुंदर असणं, यशस्वी असणं आणि त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. मात्र वास्तवात हे मुळीच खरे नाही. त्यामुळे या मताशी मी सहमत नाही. माझ्यामते आत्मविश्वास माणसाच्या कामातील प्रामाणिकता आणि ज्ञानातून येतो. त्यामुळे समाजाचा एक भाग म्हणून आपण प्रत्येक रंगाचा सन्मान करायला हवा. गोरेपणाबाबत असलेल्या या बुरसट विचारसरणीमध्ये आता बदल व्हायला हवा. अविकाच्या मते अशा गोष्टींचा अथवा अशा विचारांचा समाजावर वाईट परिणाम होतो. यासाठी तिने अशा उत्पादनांच्या तीन जाहिरातींमध्ये काम करणं नाकारलं आहे. अविकाला समाजातील या मानसिकतेला प्रोत्साहन द्यायचे नाही.
अविकाने केलं तेरा किलो वजन कमी
सुंदर दिसण्यासाठी फेअरनेस क्रिम नाही तर स्वतःमधील आत्मविश्वासाची गरज आहे याबाबत अविका ठाम आहे. यासाठी नुकतंच तिने तिच्या फिटनेसवर जास्त भर दिला आहे. एका पोस्टमधून तिने तिची वेलसॉस जर्नी चाहत्यांसोबत शेअर केली होती. शरीराची फिटनेस राखण्यासाठी ती व्यायाम आणि डाएटवर लक्ष देत आहे. मेहनत करून तिने आजवर स्वतःचं 13 किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी केल्यावर अविकाने स्वतःचे काही दिलखेचक अंदाजमधील बिकिनी फोटोज शेअर केले होते. मात्र तिच्यामते वजन कमी करण्याचा उद्देश हा बॉडीशेपमध्ये येण्यासाठी नाही तर निरोगी राहण्यासाठी असायला हवा. कारण अती वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या मागे लागू शकतात.फिटनेसकडे लक्ष दिल्यानंतर आता सौंदर्याची खरी परिभाषा व्यक्त करणारा निर्णय घेतल्यामुळे अविकाचे सगळीकडून कौतुक होत आहे. कारण सुंदर दिसण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास रंग आणि रूपातून मिळत नाही मेहनतीतून मिळतो हेच अविकाला व्यक्त करायचं आहे. अनेकवर्षे फेअरनेस क्रिमच्या जाहिरात पाहून लोकांच्या मनात गोरेपणाविषयी निर्माण झालेलं मत बदलण्यासाठी समाजातील अशा सेलिब्रेटीजचे मत नक्कीच फायदेशीर ठरू शकते. कारण यातून हळू हळू का होईना रंग,रूपाबाबत असलेलं लोकांचे मत बदलू शकेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
रिंकू राजगुरुच्या फिटनेसचे फोटो होतायत व्हायरल, असा झालाय बदल
‘राधे’ चित्रपटाच्या कमाईपेक्षाही चर्चेत आहे हा पॅरडी व्हिडिओ
तेजश्री- आशुतोषच्या त्या फोटोमुळे होतेय प्रेमाची चर्चा, लवकरच करणार का घोषणा