बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं

बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं

लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज लग्नाचा सोहळा मात्र थाटामाटात व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय संस्कृतीत पंरपरागत आणि वैदिक पद्धतीने विवाह केले जातात. ज्यामुळे जवळजवळ आठवडाभर लग्नाचे विधी केले जात असतात. महाराष्ट्रात साखरपुडा, केळवण, मेंदी, संगीत, हळद आणि सप्तपदी अशा विधींची भली मोठी रांग असते. एवढंच नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतातही अनेक दिवस लग्नाचे विधी करण्याची पद्धत आहे. सहाजिकच या सर्व परंपरा चित्रपटातही दाखवल्या जातात. बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये लग्नाचा शाही थाटमाट दाखवण्यात आला आहे. जाणून घेऊ या अशाच काही चित्रपटांबद्दल...

हम आपके है कोन -

लग्नाचा विषय आला की आजही हम आपके है कौन हा चित्रपट अनेकांच्या डोळ्यासमोर येतो. याचं खास कारण म्हणजे लग्नाच्या थीमवर असलेली या चित्रपटातील गाणी. या चित्रपटात मोहनिश बहल आणि रेणूका शहाणे यांनी साकारलेल्या भूमिकांचे लग्न दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये लग्नाच्या आधीच्या विधींपासून ते थेट डोहाळजेवणापर्यंतच्या विधींवर खास गाणी रचण्यात आली होती. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की आजही लग्नकार्यांत या चित्रपटातील गाणी लावली जातात. लग्नातील चिडवा चिडवी, बुट लपवणे अशा पद्धती यात खूप रंगवून दाखवण्यात आल्या होत्या. 

विवाह -

विवाह हा असा एक चित्रपट होता ज्यामधून अनेकांना लग्न करावं तर असं  वाटू लागलं होतं. हा चित्रपट पाहून अनेकांनी अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचे सर्व विधी अगदी शाही थाटमाटात दाखवण्यात आले होते. लग्न म्हणजे नुसतीच धमाल नाही तर त्यासोबत समोरच्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणं हेही यात दाखवण्यात आलं होतं. जेव्हा एखाद्याचं अरेंज मॅरेज होतं  तेव्हा त्याच्या मनात नेमके काय विचार सुरू होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवाह चित्रपट

हम साथ साथ है -

हम साथ साथ है या चित्रपटात एका मोठ्या एकत्र कुटुंबाची कथा गुंफण्यात आली होती. ज्यातून विभक्त होत चाललेल्या कुटुंब पद्धतीबाबत फोकस करण्यात आलं होतं. मात्र त्यासोबतच कुटुंबातील तीन भावांच्या लग्नाची धूम यात पाहायला मिळाली होती. जेव्हा असं मोठं कुटुंब एकत्र येतं तेव्हा घरातील कार्यक्रमांना कशी रंगत येते हे यातून दिसलं होतं. लग्न ठरवण्यापासून ते त्यांचा संसार सुखाचा व्हावा इथपर्यंत अनेक गोष्टी यात पाहायला मिळाल्या. थोडक्यात लग्नाचा थाटमाट या चित्रपटात नक्कीच पाहण्यासारखा होता. 

प्रेम रतन धन पायो -

सलमान खान आणि सोनम कपूरची मु्ख्य भूमिका असलेला प्रेम रतन धन पायो हा एक राजेशाही थाट माट असलेला चित्रपट होता. या चित्रपटातील वेडिंग थीम ही राजेशाही असल्यामुळे प्रत्येकाला असा विवाह व्हावा असं नक्कीच वाटलं असेल. यातील सर्व पात्रांनी परिधान केलेले पेहराव या चित्रपटानंतर खूप लोकप्रिय झाले होते. शिवाय या चित्रपटातील गाणीदेखील खूपच गाजली होती. 

शानदार -

शानदार या चित्रपटामध्ये डेस्टिनेशन वेडिंग थीम दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये दोन्ही कुटुंब निरनिराळ्या प्रांतातील असूनही रॉयल असल्यामुळे एकत्र आली होती. या गाण्यातील बॅचलर पार्टीपासून लग्नाची प्रत्येक थीम ही रॉयल होती. या लग्नात अशा काही घटना घडतात ज्यामुळे एकमेकांना न ओळखणारे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतात आणि त्यातून अनेक समस्या आपोआप सुटत जातात.

याचप्रमाणे टू स्टेट्स, हसी तो फसी, सोनू के टीटू की स्विटी, हम्टी शर्मा की दुल्हनिया, मेरे ब्रदर की दुल्हनिया, तनू वेड्स मन्नू, वीरे दी वेडिंग, बॅंड बाजा बारात, डॉली की डोली अशा अनेक चित्रपटांमधून लग्नाचा शाही थाटमाट दाखवण्यात आलेला आहे.