‘भाईः व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील लुक साकारण्यासाठी तिरूपतीहून मागवण्यात आले केस

‘भाईः व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील लुक साकारण्यासाठी तिरूपतीहून मागवण्यात आले केस

 


प्रत्येक व्यक्तिरेखा साकारताना जितकी मेहनत एखादा अभिनेता घेत असतो. तितकीच मेहनत ती व्यक्तिरेखा जशी तशी आपल्या समोर यावी याकरता अनेकजणांचं योगदान असतं. अशाच एका आगळ्यावेगळ्या मेहनत आणि योगदानाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.  नुकताच ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु,ल.देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपट आला होता. आता याच चित्रपटाचा उत्तरार्ध येत्या 8 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांतील पुलंचा लुक परफेक्ट व्हावा म्हणून अभिनेता सागर देशमुख, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि इतर कलाकारांबरोबरच खास मेहनत घेतली आहे ती साळवी बद्रर्सने.


भाईंच्या परफेक्ट लुकसाठी साळवी बद्रर्सचं खास योगदान

या चित्रपटात पुलंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता सागर देशमुखच्या ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणला जात आहे. भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामागे सर्वाधिक योगदान आहे साळवी ब्रदर्सचे सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांचं. या दोन्ही बंधुंनी हा लूक साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातारपणापर्यंतचे विग्स ‘नॅचरल हेअर स्टुडियोज’कडून बनवण्यात आलेले आहेत.


पुलंच्या म्हातारपणीच्या विगसाठी लागले 20 दिवस
भाईंच्या या हूबेहूब विगबाबत सांगताना‘नॅचरल हेअर स्टुडियोच्या जितेंद्र साळवींनी दिलेली ही प्रतिक्रिया,“भाईंच्या तरूणपणीच्या विगपेक्षा त्यांच्या म्हातारपणाचा विग बनवणं जास्त कठीण होतं. तरूणपणीचा विग 8 दिवसांमध्ये झाला तर म्हातारपणीचा विग बनवायला वीस दिवस लागले. सर्वसाधारणपणे म्हातारपणी केस विरळ होत जातात आणि केसांची मुळंही दिसू लागतात. त्यात भाईंचे म्हातारपणीचे फोटो तुम्ही पाहिले. तर लक्षात येईल की, त्यांचे केस कुरळेही असणं आवश्यक होतं” एवढंच नाहीतर भाईंच्या हूबेहूब लुकसाठी अभिनेता सागर देशमुखचे कपाळ मोठे दिसण्यासाठी त्याचे पुढचे केसही कापावे लागले. पुलंच्या म्हातारपणीच्या लुक डिझाईनसाठी जितेंद्र साळवींना खास तिरूपतीहून केस मागवायला लागले आणि त्या केसांपासून एक-एक केसांचा विग बनवण्यात आला.


कोण आहेत साळवी बद्रर्स?


बॉलीवूडमध्ये गेली 38 वर्ष काम करणा-या सुरेंद्र साळवी आणि 16 वर्ष काम करणा-या जीतेंद्र साळवी यांच्या ‘नॅचरल हेअर स्टुडिओ’ने बॉलीवूडच्या जवळ-जवळ 95 टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन केले आहेत. जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या भाई, उरी, ठाकरे या सर्व मोठ्या सिनेमांसाठी त्यांनीच विग डिझाइन केले आहेत.


भाईंप्रमाणेच ठाकरेंचा लूकही होता कठीण
भाई चित्रपटांप्रमाणेच महाराष्ट्राचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमाच्या वेळीही नवाजुद्दीन सिद्दिकीचा लुकसुद्धा साळवींनी डिझाईन केला होता. हा लुक डिझाईन करणं खूप चॅलेंजिंग होतं, असं जितेंद्र साळवी यांनी सांगितलं. “अभिनेता नवाजुद्दीनचं कपाळ ‘व्ही’ आकाराचं आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचं कपाळ सरळ आणि मोठे होतं. त्यामुळे ‘ठाकरें’चा लुक देताना बॉल्ड कॅप, हेअर पॅसेचा वापर करून नवाजुद्दीनचा लुक बदलण्यात आला.