हसऱ्या व्यक्तीमत्त्वाच्या पर्रिकरांना बॉलीवूडचा सलाम

हसऱ्या व्यक्तीमत्त्वाच्या पर्रिकरांना बॉलीवूडचा सलाम

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. 63 वर्षीय मनोहर पर्रिकरांना मागच्या वर्षी पॅनक्रिएटिक कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर गेल्या वर्षभरापासून उपचार चालू होते. पण अशा स्थितीतही अगदी अखेरच्या श्वासापर्यंत पर्रिकरांनी जनतेसाठी काम केलं आणि कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात घर केलं. बॉलीवूडही याला अपवाद नाही. अगदी अमिताभ बच्चनपासून ते अनुपम खेरपर्यंत सर्वांनीच मनोहर पर्रिकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. पर्रिकर इतक्या सर्व आजारात असूनही नेहमीच हसरे असायचे आणि त्यांचा हसरा चेहराच नेहमी सर्वांच्या लक्षात राहील.


अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी अतिशय भावनात्मक ट्विट माजी संरक्षण मंत्री पर्रिकरांसाठी केलं. ‘गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांचं निधन झालं आहे. अतिशय सद्गृहस्थ, हळूवार बोलणारे आणि साधे व्यक्तिमत्व...आदर आहे या माणसाबद्दल. आपल्या आजाराशी पण त्यांनी त्याच जिद्दीने झुंज दिली. त्यांच्याबरोबर काही वेळा वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. चेहऱ्यावर सतत हसू असणारी व्यक्ती आज राहिली नाही. अतिशय वाईट बातमी.’ तर दुसऱ्या बाजूला त्यांनी अजून एक ट्विट केलं आहे. शशी कपूर यांचा 18 मार्च हा जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘माणसाच्या आयुष्याची ही विडंबना आहे. एका बाजूला मृत्यूची घोषणा आहे तर दुसऱ्या बाजूला जयंती.’ शिवाय अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अतिशय भावनात्मकतेने लिहिलं आहे. ‘आयुष्य खूप विचित्र आहे. बऱ्याचदा आयुष्यात नक्की काय घडतं हेच कळत नाही. याचा काहीच भरवसा नाही. एका बाजूला निधनाची बातमी आहे तर दुसऱ्या बाजूला जयंती.’
अक्षयकुमारनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ‘मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूपच वाईट वाटलं आहे. त्यांना भेटण्याची आणि अशा व्यक्तीला जाणून घेण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. अतिशय चांगल्या स्वभावाचा माणूस. त्यांच्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली.’तर दुसऱ्या बाजूला अभिनेता रणदीप हुडानेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘अतिशय साधा, सरळमार्गी, अप्रतिम, नाकासमोर चालणारा, संरक्षण मंत्री, गोव्याचे तीन वेळा झालेले मुख्यमंत्री, कोणत्याही सत्तेच्या जाळ्यात न अडकणारा असा माणूस, सुस्वभावी, खरा देशभक्त आणि नेहमीच दुसऱ्यांनी आदर्श बाळगावा असा माणूस...सलाम #ManoharParrikar’.मनोहर पर्रिकर हे अतिशय साधे होते. त्यांनी कधीही इतर राजकारण्यांप्रमाणे कोणताही आव आणला नाही. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी कधीही आपला साधेपणा सोडला नाही आणि अगदी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभं राहून प्रवास करण्यापासून ते इतर व्यक्तींमध्ये बसून जेवणापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी केल्या. कधीही कोणताही लवाजमा न बाळगता जनतेसाठी नेहमीच त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी आजारपणातही ते आपलं काम करत होते आणि बऱ्याचदा नाकाला अगदी नळ्या लावूनही काम करताना त्यांना पाहिलं गेलं आहे.


संजय दत्तने लिहिलेल्या ट्विटप्रमाणे, ‘आपल्या देशातील चांगल्या नेत्यापैकी एक नेता गमावला असून अतिशय वाईट वाटत आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांचं कुटुंब आणि मित्रपरिवाराला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हटलं आहे.तर महाराष्ट्राचे अजून एक अप्रतिम नेता असणारे विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखनेही श्रद्धांजली वाहिली आहे. ‘भारतातील सर्वात अप्रतिम असणाऱ्या नेत्यांपैकी एक….#ManoharParrikar यांच्या निधनाच्या बातमीने खूपच वाईट वाटत आहे. त्यांचं कुटुंब आणि मित्रपरिवाराला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली’तर अभिनेता अनुपम खेर यांनी पर्रिकर यांचा फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘#ManoharParrikar यांच्या जाण्याने खूपच वाईट झालं आहे. मी भेटलेल्या माणसांपैकी पर्रिकर हे सर्वात खरे, हुशार, बुद्धिमान, प्रामाणिक व्यक्तींपैकी पर्रिकर हे एक होते. कोणताही प्रयत्न न करता लोकांना प्रभावित करण्याची त्यांच्याकडे ताकद होती. मी नेहमीच त्यांची आठवन काढेन. ओम शांती’तर अभिनेता आर. माधवन यानेदेखील ट्विट केलं आहे. ‘मनोहर पर्रिकरजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूपच वाईट वाटलं. अतिशय सन्मान्य आणि उदार व्यक्तिमत्व. सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो’ शिवाय अत्रिनेत्री यामी गौतम आणि विकी कौशल यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

फोटो सौजन्य - Twiter, Instagram 


हेदेखील वाचा - 


आई तू परत घरी येशील ना?, सीएसटी पूल दुर्घटनेनंतर महिलांमध्ये भीती


राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)


नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स